‘इंडी’ आघाडीत स्थान मिळावे यासाठी विविध पद्धतीने खटाटोप करणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) (Thackeray) गटाचा ‘साथीदार’ प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडी बाबत काँग्रेसने अद्याप कोणतीही भूमिका घेतली नसून त्यांना अजूनही वेटिंग वरच ठेवले आहे. ‘वंचित’ला आघाडीत सामावून घेण्याबाबत काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व अजूनही चिडीचूप आहे. ‘वंचित’ ला सोबत घेण्याबाबत काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीचा (NCP) अंतर्गत विरोध असल्याने अद्याप निर्णय होत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
वंचितचे शक्तीप्रदर्शन
वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात (शिवाजी पार्क) ३ डिसेंबरला मोठा मेळावा आयोजित केला होता. हे शक्ती प्रदर्शन दाखवण्यासाठी आंबेडकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Gandhi) यांना निमंत्रित केले होते. मात्र राहुल गांधी यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले.
ठाकरेंची मध्यस्थी
त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी जुने वैर विसरून मुंबईत शरद पवार यांची भेट घेऊन इंडी आघाडीत स्थान देण्याबाबत विनवणी केल्याचे बोलले जाते. तसेच उबाठा (UBT) गटाशी जवळीक साधून मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांनीही पवारांना विनंती करून आंबेडकरांना आघाडीत सामावून घेण्याबाबत शिफारस केली.
(हेही वाचा-Accident : पंढरपूरमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू)
१२ जागांचा प्रस्ताव
चार दिवसांपूर्वी आंबेडकर यांनी राज्यातील लोकसभेच्या ४८ जागा लढवणार असल्याचे जाहीर करुन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तर काल मंगळवारी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत १२-१२ जागांचा प्रस्ताव ठेवला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उबाठा आणि वंचित बहुजन आघाडी यांनी प्रत्येकी १२ जागा लढवाव्या, असा प्रस्ताव ठेवून आपले महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्याप त्याला यश आले नाही.
वंचित भाजपची ‘बी’ टीम
मुळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील काही नेत्यांनी यापूर्वीही वंचित बहुजन आघाडी ही भाजपची ‘बी’ टीम असल्याचा आरोप केला होता. त्यांचा आजही वंचितला सोबत घेण्यास विरोध आहे. उबाठा गटाने आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.
वंचितला संविधानाचे महत्त्व जास्त
आज ऊबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “प्रकाश आंबेडकर हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असून संविधानाचे महत्त्व सगळ्यात जास्त त्यांना माहित आहे. वंचितला नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाही विरुद्ध लढायचे आहे आणि त्यांची ही भूमिका देशासाठी फार मोठा मंत्र आहे,” असेही ते म्हणाले. वंचितला सोबत घेण्याबाबतचा निर्णय दिल्लीतून होणार असल्याने सध्या तरी आंबेडकरांना थोडे दिवस आणखी वाट पहावी लागणार असल्याचे दिसून येते.