कोरोनाची वाढती रुग्ण संख्या आणि त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांची वाढलेली संख्या, त्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची वाढलेली गरज पाहता आता राज्यातील सर्व खासगी आणि सरकारी रुग्णालये हे त्यांच्याकडे कधी रेमडेसिवीर इंजेक्शन येतात याची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यातील खासगी आणि सरकारी रुग्णालये ६० आहेत, त्यातील १९ रुग्णालयांसाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात केवळ ८० रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा आला आहे. वस्तुतः यातील प्रत्येक रुग्णालयाची किमान १०-१५ इंजेक्शनची मागणी गृहीत धरली, तर त्या तुलनेत आलेला हा साठा अपुराच आहे, मात्र ही स्थिती केवळ रायगड जिल्ह्याचीच नाही तर अवघ्या राज्यातील जिल्ह्यांची स्थिती आहे. तरीही काहीच नसण्यापेक्षा काही तरी येतेय, अशी भावना रुग्णालयांची आहे.
सध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा थेट वितरकांना येत आहे, त्यात किती इंजेक्शन कोणत्या रुग्णालयांना देण्यात यावीत हे स्पष्ट लिहून देण्यात आलेले असते. त्यामुळे काळाबाजार होण्याची शक्यताच नाही. कारण त्याचा सर्व हिशेब जिल्हाधिकारी आणि एफडीएला आम्हाला द्यावा लागत आहे. त्यात जर अनियमितता आढळून आली तर कारवाई होणार आहे. त्यामुळे यात गैरप्रकार होण्याची शक्यता नाही. सध्या मागणी अधिक आणि पुरवठा कमी आहे. हे वास्तव आहे. आम्ही १५०० इंजेक्शनची मागणी केली होती, परंतु केवळ ८० बाटल्या आल्या आहेत. मात्र तरीही या व्यवस्थेमुळे हे इंजेक्शन गोरगरिबांना मिळेल. काही दिवसांनी हा तुटवडा कमी होईल, अशी आशा आहे.
– श्रीकांत ओस्वाल, मालक, श्रीकांत फार्मा डिस्ट्रिब्युटर, अलिबाग.
काय म्हटले आहे आदेशपत्रात?
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने मंगळवारी, २७ एप्रिल रोजी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वितरणाची ऑर्डर काढली आहे. त्यासाठी वितरकाला रुग्णालयांची यादी आणि त्या त्या रुग्णालयांना ठरवून देण्यात आलेल्या कुप्यांची संख्या देण्यात आलेली आहे. विनाविलंब, टाळाटाळ न करता हा साठा तात्काळ घेऊन तो संबंधित रुग्णालयांना योग्य ओळखपत्राची खातरजमा करून वितरित करावा, असे या आदेशात म्हटले आहे. त्याचबरोबर हा साठा ठरवून दिल्याप्रमाणे वितरित होत आहे का, यासाठी भरारी पथकाने खातरजमा करावी आणि जर कुठे अनियमितता आढळून आली तर कारवाई करावी, तसा अहवाल सादर करावा, असेही या आदेशात म्हटले आहे.
(हेही वाचा : मुंबईत मृतांचा आकडा घटतोय…)
५०० रुपयांनी स्वस्त दिले इंजेक्शन!
रायगड जिल्ह्यासाठी सन फार्मा कंपनीच्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा आला आहे. त्यात प्रत्येक बाटलीवर २,४५० रुपये एमआरपी अर्थात कंपनीने ठरवलेली किंमत दिली आहे. मात्र वितरकांना ती १,९५० रुपयांना देण्यात आली आहे. याचा अर्थ ५०० रुपये किंमत कमी करण्यात आली आहे. अर्थात हे इंजेक्शन सरकारी रुग्णालयांत रुग्णांना मोफत दिले जाणार आहे. त्याचे पैसे मात्र सरकार वितरकांना देणार आहे.
Join Our WhatsApp Community