मुंब्र्यातील प्राईम क्रिटिकेअर रुग्णालयाच्या मीटर बॉक्समध्ये शॉर्ट सर्किट होऊन, पहाटे ३.४०च्या सुमारास आग लागली. या आगीनंतर आयसीयूमध्ये दाखल असलेल्या ६ रुग्णांना, तसेच इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. पण दुर्दैवाने आयसीयू मधील चार रुग्णांचा मृत्यू झाला. या चार जणांचा मृत्यू आगीत होरपळून झाला नसून, रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
शॉर्ट सर्किटमुळे लागली आग
मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश असून, हे रुग्णालय कोविड रुग्णालय नसल्याचे सांगण्यात येत आहे.
आगीचे वृत्त समजताच घटनास्थळी ठाणे अग्निशमन दलाचे तीन बंब, तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्ष दाखल झाल्यानंतर काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवता आले. रुग्णालयातील इतर रुग्णांना जवळच्या बिलाल रुग्णालयात हलवण्यात आले आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान ही आग मीटर बॉक्स मध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
चार रुग्णांचा मृत्यू
रुग्णालयात एकूण २० रुग्ण दाखल होते. त्यापैकी सहा रुग्ण हे आयसीयू मध्ये दाखल होते. आग लागल्यानंतर सर्व रुग्णांना वेळेत दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. त्यामुळे आगीत होरपळून कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नाही . मात्र, दुस-या रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मृतांची नावे:
1. यास्मिन जाफर सय्यद – 46
2.नवाब मजीद शेख – 47
3.दलिमा बाई सलमानी – 47
4. सोनावणे