Mumbai Police : मुंबईत नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पोलिसांनी केल्या धडक कारवाया

182

मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील पोलीस कॉन्स्टेबल समीर जाधव यांचा पतंगच्या मांजामुळे झालेल्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी चायनीज मांजा विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे. मागील दोन दिवसांत भारतात बंदी असलेल्या चायनीज मांजा बेकायदेशीर विक्री करणाऱ्यावर मुंबई पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गालगत असणाऱ्या इमारतीच्या गच्चीवर तसेच मोकळ्या मैदानात पतंग उडविणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई यापुढे अशीच सुरू ठेवण्यात येईल अशी माहिती एका पोलीस अधिका-याने दिली.

चायनीज मांजामुळे पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यु 

दिंडोशी पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल समीर जाधव (३८) हे मोटारसायकल वरून घरी जात असताना रविवारी दुपारी वाकोला पुलावर पतंगाच्या चायनीज मांजामुळे त्यांचा गळा चिरला गेला आणि त्यात त्यांचा घटनस्थळीच मृत्यु झाला होता. समीर जाधव यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण मुंबई पोलीस दलात (Mumbai Police) हळहळ व्यक्त करण्यात आली. खेरवाडी पोलिसांनी या प्रकरणी पतंग उडविणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

केंद्र सरकारकडून बंदी

केंद्र सरकारने चायनीज मांजा विक्रीवर बंदी आणून देखील मुंबईसह इतर शहरामध्ये चायनीज मांजा बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणात विकला जात आहे. जाधव यांच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) बेकायदेशीर चायनिज मांजा विक्रेते तसेच या मांजाचा वापर करून पतंग उडविणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

(हेही वाचा Ayodhya Shri Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम मंदिर बांधकामाचे नेतृत्व करतोय महाराष्ट्र; जाणून घ्या कसे?)

पोलिसांनी ‘या’ ठिकाणांवर केली कारवाई

मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांनी (Mumbai Police) पश्चिम उपनगरातील बांगूरनगर – गोरेगाव पश्चिमेकडील शहीद भगतसिंग नगर-१ मध्ये एका खोलीमध्ये छापा टाकला. सुमारे साडेतीन हजार रुपयांचा मांजा हस्तगत करीत पोलिसांनी कुसूमदेवी मंडल हिच्यावर गुन्हा दाखल केला. मालवणी पोलिसांनी नायलॉन मांजा गुंडाळलेल्या २७ चक्री (फिरकी) आणि ३९० पाऊच हस्तगत करीत खालिद शेख या विक्रेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे. सहार – अंधेरी पूर्वेकडील आरती जनरल स्टोअर्स मधून कैलास महादे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून नायलॉन मांजाच्या १० चक्री हस्तगत करण्यात आल्या आहेत, मालाड दिंडोशी येथील सक्सेरिया चाळीतून करण सहानी यांच्याकडून सुटी आणि नायलॉन मांजा हस्तगत करण्यात आला. खेरवाडी पोलिसांनी द्रुतगती महामार्ग तसेच उड्डाणपुलाजवळील काही इमारतीच्या गच्चीवर पतंग उडविणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकारे मुंबईत जवळपास १५ ठिकाणी चायनीज (नायलॉन) मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिली. कारवाई करण्यात आलेल्या विरुद्ध नायलॉन किंवा चिनी मांजा वापरणाऱ्यांवर आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम १८८, मानवी जीवित किंवा इतरांची व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात येईल इतक्या बेदरकारपणे किंवा हयगयीने कृती केल्याप्रकरणी भादंवि कलम ३३६ आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.