मुंबई महानगरात सुरु झालेली संपूर्ण स्वच्छता मोहीम (Deep Cleaning Drive) ही लोकचळवळीत रुपांतरीत होत असून येत्या रविवारी म्हणजे दिनांक ३१ डिसेंबर २०२३ रोजी महा स्वच्छता अभियान अर्थात मेगा डीप क्लिनिंग ड्राइव्हच्या (Mega Deep Cleaning Drives) रुपात हा उपक्रम मुंबईत एकूण १० ठिकाणी राबवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या प्रमुख उपस्थितीत हे महा स्वच्छता अभियान प्रमुख कार्यक्रम भारताचे प्रवेशद्वार अर्थात गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India) येथे सकाळी ९ वाजता होणार आहे. या ठिकाणी सुमारे एक हजार गणवेशधारी स्वच्छता कर्मचारी आवश्यक त्या संसाधनांसह तसेच ई स्वीपर, पॉवर स्वीपर आदी संयंत्रांचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. त्यामुळे यंदाचा थर्टी फर्स्टला स्वच्छता मोहिम राबवून येणारे नवीन वर्षांचे स्वागत स्वच्छ आणि सुंदर वातावरणात केले जाणार आहे. (Deep Cleaning Drive)
मुंबईत ३ डिसेंबर २०२३ पासून दर आठवड्यात एक दिवस प्रत्येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात (वॉर्ड) संपूर्ण स्वच्छता मोहीम (Deep Cleaning Drive) राबविण्यात येत आहे. महानगरपालिकेची ही मोहीम महाराष्ट्रभर विस्तारण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अलीकडेच केली होती. या पार्श्वभूमीवर, येत्या रविवारी म्हणजे ३१ डिसेंबर २०२३ रोजी मुंबईत दहा ठिकाणी महा स्वच्छता अभियान (Mega Deep Cleaning Drive) राबविण्यात येणार आहे. त्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेऊन यथोचित निर्देश देण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी सर्व संबंधित खात्यांची गुरुवारी २८ डिसेंबर २०२३ बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह सर्व संबंधित सहआयुक्त, उप आयुक्त, सहायक आयुक्त, खातेप्रमुख बैठकीस उपस्थित होते. (Deep Cleaning Drive)
(हेही वाचा – NIA : इसिसच्या ६ दहशतवाद्यांविरोधात ४०० पानांचे आरोपपत्र एनआयए कडून दाखल)
ई स्वीपर, पॉवर स्वीपर आदी संयंत्रांचे प्रात्यक्षिक करणार सादर
महानगरपालिका राबवत असलेली संपूर्ण स्वच्छता मोहीम आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिका कार्यक्षेत्रात शासनाकडून राबवली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी यावेळी बोलतांना सांगितले. या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी, ३१ डिसेंबर २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या महा स्वच्छता अभियानात गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India) जवळील कार्यक्रमाच्या ठिकाणी सुमारे एक हजार गणवेशधारी स्वच्छता कर्मचारी आवश्यक त्या संसाधनांसह तसेच ई स्वीपर, पॉवर स्वीपर आदी संयंत्रांचे प्रात्यक्षिक सादर करतील. ही प्रात्यक्षिके व प्रत्यक्ष स्वच्छतेची एकूणच कार्यवाही राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मार्गदर्शक स्वरुपाची ठरेल. त्यामुळे महानगरपालिकेचे सर्व यंत्रणांनी त्यादृष्टिने सज्ज राहणे आवश्यक आहे, असे आयुक्तांनी नमूद केले. (Deep Cleaning Drive)
एसओपीच्या ६१ मुद्द्यांनुसारच मोहीम राबवणार
गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India) येथे महा स्वच्छता अभियान सुरु केल्यानंतर मुंबईतील विविध १० ठिकाणी एकाच दिवशी स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. महानगरपालिकेने संपूर्ण स्वच्छता मोहीमेसाठी तयार केलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीतील (एसओपी) ६१ मुद्द्यांनुसारच मोहीम राबवावयाची आहे. रस्ते धुण्यासाठी पुरेशा संख्येने पाण्याचे टँकर व जेट स्प्रे उपलब्ध ठेवावेत. एकूणच स्वच्छतेची कामे गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत, असेही निर्देश आयुक्त चहल यांनी दिले. महानगरपालिका कशा प्रकारे स्वच्छ्ता करते, याचा वस्तुपाठ इतर महानगरपालिका व जिल्ह्यांना दिला जाणार आहे, ही महानगरपालिकेसाठी अभिमानाची बाब आहे, असेही आयुक्त म्हणाले. स्वच्छतेची मोहीम प्रशासकीय स्वरुपाची न राहता त्याला लोकचळवळीचे स्वरुप मिळावे म्हणून सर्व लोकप्रतिनिधींसह शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण, स्काऊट व गाईड, राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), स्वयंसेवी संस्था, ख्यातनाम व्यक्ती व समाजातील सर्व भागधारक, स्थानिक नागरिक मोहिमेमध्ये सहभागी झाले पाहिजेत, यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, अशी सूचनाही आयुक्तांनी केली. (Deep Cleaning Drive)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community