Udayanraje Bhosale :  महापुरुषांचा अवमान रोखण्यासाठी कायदा करा; उदयनराजे भोसले यांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी 

183

साताऱ्याचे राज्यसभा सदस्य खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्लीत भेट घेऊन महत्वाच्या मुद्यांवर चर्चा केली. महापुरुषांचा अवमान केल्यास कडक शिक्षेच्या तरतुदीचा कायदा पारीत करावा. तसेच ऐतिहासिक घटनांवर आधारीत चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करून मांडणी केली जाते. अशा चित्रपटांसाठी नियंत्रण ठेवणारी सेन्सॉर कमिटी स्थापन करावी, अशी महत्वपूर्ण मागणी उदयनराजेंनी केली आहे.

इतिहास तज्ज्ञांच्या कमिटीची प्रथम मान्यता घेण्याचे बंधन घालावे

स्वदेश योजनेंतर्गत बुद्ध सर्किट, रामायण सर्किटच्या धर्तीवर शिवस्वराज्य सर्किट विकसित केले जावे, यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. यासंदर्भात पर्यटन मंत्रालयाला आपल्या स्तरावरुन सूचना निर्गमित करण्याची विनंती उदयनराजेंनी केली. केंद्र सरकारच्या वतीने शिवस्वराज्य सर्किट विकसित झाल्यास मराठ्यांच्या ऐतिहासिक पाऊलखुणा असलेली सर्व ठिकाणे जागतिक पर्यटनाच्या नकाशावर येतील. शिवरायांचा अधिकृत इतिहास राज्य शासनामार्फत प्रसिध्द करण्यात यावा. ऐतिहासिक चित्रफिती किंवा चित्रपटांना सेन्सॉर बोर्डाने परवानगी देताना इतिहास तज्ज्ञांच्या कमिटीची प्रथम मान्यता घेण्याचे बंधन घालावे, अशा मागण्या उदयनराजेंनी (Udayanraje Bhosale) केल्या.

(हेही वाचा अजित पवारांच्या आव्हानानंतर Supriya Sule अस्वस्थ; घेतला ‘हा’ निर्णय)

महापुरूषांची बदनामी करून समाजात दुफळी निर्माण केली

छत्रपती शिवाजी महाराजांचे वैशिष्टयपूर्ण स्मारक उभारण्याचे काम केंद्रसरकारने हाती घ्यावे. ऐतिहासिक कालखंडातील प्रसंगांचे अधिकृत मुल्य ठरवण्यासाठी उच्च स्तरीय समिती नेमावी. परातत्व विभागाच्या वतीने प्रसिध्दी झालेल्या आणि अप्रसिध्द राहिलेल्या दस्तावेज, चित्रे, शस्त्रागाराचा नव्याने अभ्यास करून अधिकृत इतिहास शासनाने प्रसिध्द करावा, विदेशात ऐतिहासिक दस्तावेज सापडतील ते भारतामध्ये आणण्यसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी उदयनराजेंनी केली आहे. महापुरूषांची बदनामी करून समाजात दुफळी निर्माण केली जाते. त्यामुळे जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण होऊन समाजस्वास्थ्य बिघडते. कायदा, सुसव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे महापुरूषांची बदनामी करणाऱ्यांना जबर शिक्षेच्या तरतुदीचा कायदा संसदेत पारित करण्याची मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. उदयनराजेंच्या (Udayanraje Bhosale) मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.