ऋजुता लुकतुके
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन कसोटी (Ind vs SA 1st Test) भारतीय संघाने १ डाव आणि ३२ धावांनी तिसऱ्याच दिवशी गमावली. हे दु:ख कमी होतं की काय म्हणून भारताच्या जखमेवर आणखी मीठ चोळलं गेलं आहे. पहिल्या कसोटीत षटकांची गती नीट न राखल्यामुळे खेळाडूंच्या फीमधून १० टक्के रक्कम कापली जाणार आहे. आणि आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील दोन गुणही कापले जाणार आहेत.
या कसोटीसाठी सामनाधिकारी होते ख्रिस ब्रॉड. त्यांनी शुक्रवारी उशिरा हा निर्णय दिला आहे. ‘भारतीय संघाने आफ्रिकेच्या पहिल्या डावात दोन षटकं कमी टाकली. वेळेच्या सर्व प्रकारच्या सवलती गृहित धरल्यानंतरही षटकांची गती राखली गेली नसल्यामुळे आयसीसीच्या नवीन नियमांअंतर्गत सामन्याचा १० टक्के हफ्ता कापण्याबरोबरच २ गुणांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’ असं आयसीसीने आपल्या पत्रकात म्हटलं आहे.
(हेही वाचा-Ayodhya Ram Mandir : अयोध्येला ‘या’ तीन शहरांमधून आता थेट विमानसेवा; एअर इंडिया एक्सप्रेसची घोषणा)
🚨 JUST IN: India have been penalised for slow over rate during the first #WTC25 Test against South Africa.
Details ⬇️https://t.co/dSqixki92Z
— ICC (@ICC) December 29, 2023
आयसीसीच्या २.२ या नियमाअंतर्गत प्रत्येक कमी टाकलेल्या षटकासाठी संघाच्या खेळाडूंची प्रत्येकी ५ टक्के सामन्याची फी कापण्यात येते. तर आयसीसीकडून एका षटकामागे एक कसोटी अजिंक्यपद गुण या प्रमाणात गुणही कापण्यात येतात.
भारताने २ षटकं कमी टाकल्यामुळे दोन गुण कमी झाले आहेत. आणि याचा थेट फटका भारतीय संघाला बसला आहे. सेंच्युरियन कसोटी भारताने गमावली तेव्हा भारतीय संघाचे १६ गुण झाले होते. आणि पर्सेंटाईल होते ४४.४४ भारतीय संघ कसोटी अजिंक्यपद क्रमवारीत पाचव्या स्थानावर होता. आता गुण १६ वरून १४ वर आल्यामुळे आणि पर्सेंटाईल ३८.३९ वर आल्यामुळे भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या खाली सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
भारतीय संघाचा पुढील कसोटी सामना ३ ते ७ जानेवारी दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन इथं होणार आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community