ऋजुता लुकतुके
महाराष्ट्राच्या मुलं व मुलींनी कुमार गटाच्या ४२ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेचे विजेतेपद (Kho Kho National Championship) पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. कुमार गटाचे हे १८ वे तर मुलींचे ९ वे सलग अजिंक्यपद आहे. सलग नवव्यांदा महाराष्ट्राच्या कुमार व मुली दुहेरी मुकुटाचे मानकरी ठरले आहेत. महाराष्ट्राचा कर्णधार वैभव मोरे ( ठाणे) वीर अभिमन्यू तर सांगलीची सानिका चाफे जानकी पुरस्काराची मानकरी ठरली.
बेमेतरा (छत्तीसगड) येथील अलॉन्स पब्लिक स्कूल बिजाभटच्या मैदानावर शनिवारी संध्याकाळी झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या मुलींनी ओडिशावर २०-१८ अशी मात करताना दमछाक मात्र चांगलीच झाली. मध्यंतरापर्यंत ६-१० अशा चार गुणांनी पिछाडीवर असलेल्या ओडिशाच्या आक्रमकांनी महाराष्ट्राच्या संरक्षकांची चांगलीच दमछाक केली.
(हेही वाचा-New Year: २०२४ साठी संकल्प करणार आहात का? ‘या’ टिप्स लक्षात ठेवा)
पहिल्या डावात ६ गडी बाद करणाऱ्या ओडिशाच्या आक्रमकानी दुसऱ्या डावात महाराष्ट्राचे १२ गडी बाद करीत सामन्यात चुरस निर्माण केली होती. अखेर निर्णायक डावात महाराष्ट्राने आपला विजय खेचून आणला. महाराष्ट्राच्या अश्विनी शिंदे हिने ४.२०, २.४० मिनिटे संरक्षण व ६ गुण तर सुहानी धोत्रे हिने ६ बळी टिपले. सानिका चाफे हिने २.३० व २.५० मिनिटे संरक्षणाची बाजू सांभाळावी. ओडीसाच्या अर्चनाने (१.५०, १.४० मि. ४ गुण) तर स्मरणिका (१.३० मि. ४ गुण) यांची अष्टपैलू खेळी अपुरी पडली.
महाराष्ट्राच्या कुमार संघाने मात्र कोल्हापूरवर १८-१६ असा एक डाव राखून दोन गुणांनी सहज विजय मिळविला. यात गणेश बोरकर (१.१०, २ मि. संरक्षण व ४ गुण) व कर्णधार वैभव मोरे ( नाबाद १.१० मि. व ४ मि. संरक्षण व २ गुण), भरतसिंह वसावे (२, १ मिनिटे संरक्षण), रमेश वसावे (१.४०, १.२० मिनिटे संरक्षण) यांनी सर्वोत्कृष्ट खेळी करीत महाराष्ट्राचा विजय सुकर केला तर पराभूत कोल्हापूरच्या विराज घाटगे (१ मि. संरक्षण), शरद घाटगे (२ मिनिटे संरक्षण) केले मात्र त्यांना इतर खेळाडूंची साथ न मिळाल्याने मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
तत्पूर्वी उपांत्य फेरीत महाराष्ट्रच्या कुमार संघाने कर्नाटकचा ३४-२० असा १५ गुणांनी पराभव केला. मुलींनी दिल्लीवर १८-१० असा एक डाव राखून दणदणीत विजय मिळवला.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community