इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेले युद्ध लाल समुद्रापर्यंत पोहोचले आहे. सोमवारी अमेरिकेने लाल समुद्रात हौथी बंडखोरांविरुद्ध लष्करी कारवाई सुरू केली. या काळात, जहाज लुटण्यासाठी येत असलेल्या १० हौथी सैनिकांना अमेरिकेने ठार केले आणि त्यांच्या ३ बोटीही नष्ट केल्या.
अमेरिकेने लाल समुद्रात येमेनच्या हौथी बंडखोरांवर हल्ला सुरू केला आहे. पहिल्याच हल्ल्यात अमेरिकेच्या नौदलाने १० हौथी सैनिकांना ठार केले आणि त्यांची ३ जहाजे नष्ट केली. हे बंडखोर लाल समुद्रातून जाणाऱ्या मार्स्कच्या मालवाहू जहाजाची लूट करण्यासाठी येत होते. तत्पूर्वी, अमेरिकेने जाहीर केले की, ते लाल समुद्रात हौथी बंडखोरांविरुद्ध ब्रिटनबरोबर लष्करी कारवाई सुरू करत आहेत. लाल समुद्रात हौथी बंडखोर इस्रायलशी संबंध असलेल्या प्रत्येक जहाजाला लक्ष्य करीत आहेत. गेल्या महिन्यात त्यांनी अनेक जहाजांचे अपहरणही केले आहे.
(हेही वाचा – NIA कडून दहशतवाद्यांचा अधिकृतपणे ‘जिहादी’ असा उल्लेख; २०२३ मध्ये ६२५ जणांवर कारवाई)
यू. एस. सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) सांगितले की, हौथी बंडखोरांशी सोमवारी सकाळी ९ वाजता चकमक झाली. या काळात हौथी बंडखोरांनी सिंगापूरच्या ध्वजाच्या मार्स्क जहाजावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मार्स्क जहाजाने बंडखोरांना जहाजावर चढताना पाहिले आणि मदतीसाठी हाक मारली. त्यावेळी अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका यु. एस. एस. आयझेनहॉवर आणि यु. एस. एस. ग्रेव्हली या भागात गस्त घालत होती. या गंभीर परिस्थितीत मदत करण्यासाठी आणि हल्लेखोरांना हुसकावून लावण्यासाठी त्यांनी हेलिकॉप्टरद्वारे मार्स्क जहाजावर सुरक्षा पथक पाठवले.
हल्ल्यानंतर लाल समुद्रातून जाणारी सर्व जहाजे ४८ तासांसाठी थांबवण्यात आली आहेत. यावेळी हौथी गटाच्या प्रवक्त्याने सांगितले की, त्यांच्या लढाऊ सैनिकांनी मार्स्क जहाजावर हल्ला केला; कारण क्रू कर्मचाऱ्यांनी सूचना देणाऱ्या दूरध्वनी यंत्रणेकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले की, लाल समुद्रात अमेरिकेच्या नौदलाने त्यांच्या बोटींवर हल्ला केल्यानंतर १० हौथी लढाऊ मारले गेले आणि बेपत्ता झाले.
लाल समुद्राचे महत्त्व
लाल समुद्र हा सुएझ कालव्याचा वापर करणाऱ्या जहाजांसाठी प्रवेश बिंदू आहे. याद्वारे १२ % जागतिक व्यापार चालतो. आशिया आणि युरोपमधील वस्तूंच्या वाहतुकीसाठी हा कालवा महत्त्वाचा आहे. यु. एस. (U.S.) ने १९ डिसेंबरला ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गार्डियन (Operation Prosperity Guardian) सुरू केले, ते म्हणाले की, येमेनजवळील लाल समुद्राच्या पाण्यात जहाजांचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नांमध्ये २० हून अधिक देशांनी भाग घेण्यास सहमती दर्शविली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community