यंदाही महाराष्ट्र दिन साधेपणानेच!

120

ब्रेक दि चेन मोहिमेच्या तरतुदी विचारात घेऊन, राज्यात यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१वा वर्धापन दिन समारंभ साधेपणाने आयोजित करण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेमार्फत ही सूचना देण्यात आली आहे. गेल्यावर्षीही महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करण्यात आला होता. आपत्ती व्यवस्थापन विभागाने कोविड-१९च्या अनुषंगाने दिलेल्या सुरक्षित वावर व इतर सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे. सर्वांसाठी मास्क बंधनकारक राहील, याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी

कोरोनाबाधितांची वाढती रुग्ण संख्या विचारात घेऊन कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने १ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केले आहेत. या तरतुदी विचारात घेऊन राज्यात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या दृष्टीने निर्देश देण्यात आले आहेत. इतर कोणतेही सास्कृतिक कार्यक्रम करण्यावर बंदी घालण्यात आली आहेत.

काय आहेत सूचना

  • जिल्हा मुख्यालयात केवळ एकाच ठिकाणी सकाळी ८ वाजता फक्त ध्वजारोहण करण्यात यावे.
  • विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी विभागीय आयुक्त पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती यांनी ध्वजारोहण समारंभाकरता योग्य ती व्यवस्था करावी.
  • तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहणाचा वेगळा कार्यक्रम आयोजित करु नये.
  • इतर सर्व जिल्ह्यांत केवळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात यावे.
  • या नमूद ठिकाणी केवळ पालकमंत्री, विभागीय आयुक्त मुख्यालयी समारंभ असल्यास विभागीय आयुक्त, महापौर/नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी, ज्या ठिकाणी पोलिस आयुक्तालय आहे त्या ठिकाणचे पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलिस अधिक्षक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एवढ्याच पदाधिकारी/अधिकारी यांनी उपस्थित रहावे.
  • इतर मान्यवरांना आमंत्रित करण्यात येऊ नये. तसेच कवायती/संचलन आयोजन करण्यात येऊ नये.
  • विधीमंडळ, उच्च न्यायालय व इतर संविधानिक कार्यालयांमध्ये कमीत-कमी उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात यावे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.