देशभरात लागू करण्यात आलेल्या हिट अँड रन कायद्याविरोधात (Hit and Run Act) वाहतूकदार आणि ट्रक चालकांनी सोमवारपासून आठ राज्यांमध्ये संप पुकारला. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि गुजरात या आठ राज्यांत खासगी बससेवा आणि ट्रक सेवा ठप्प झाली. वाहतूकदारांच्या या संपाचा एपीएमसी मार्केटवरही (APMC Market) मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे.
वाहतूकदारांचा संप सुरू असल्यामुळे सर्व जीवनावश्यक पुरवठ्यावर याचा परिणाम झाला आहे. परराज्यातून येणाऱ्या गाड्या कमी प्रमाणात आल्यामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये दरदिवशी ५०० ते ६०० गाड्यांची आवक होत असते, परंतु संपामुळे गुजरात, राजस्थान, कर्नाटक , केरळ, मध्य प्रदेश या राज्यांमधून येणाऱ्या भाज्यांच्या १०० ते १५० गाड्या आलेल्या नाहीत. त्यामुळे भाजीपाल्याचा पुरवठा कमी झाला असून त्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एकूणच २० ते २५ टक्क्यांनी हे दर वाढलेले आहेत. केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात केलेल्या बदलामुळे सामान्य जनतेला अनेक परिस्थितींचा सामना करावा लागत आहे.
Join Our WhatsApp Community