लसीकरण केंद्राच्या उद्घाटनावरून राजकारण!

भांडुप पश्चिम येथील सावित्रीबाई फुले प्रसुतीगृह येथील लसीकरण केंद्राचे उद्घाटन करताना महापौर आणि प्रशासनातील अधिकारी यांनी स्थानिक भाजप नगरसेविका साक्षी दळवी यांना बोलावले नाही. 

115

कांजुर (पूर्व) येथील परिवार महापालिका इमारतीमध्ये असलेल्या तसेच भांडुप (पश्चिम)च्या सावित्रीबाई फुले प्रसूतीगृह येथील लसीकरण केंद्राचे लोकार्पण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते गुरुवारी पार पडले. परंतु सावित्रीबाई फुले प्रसुतीगृहातील लसीकरण केंद्र हे भाजप नगरसेविका साक्षी दळवी यांच्या प्रभागात येत आहे. परंतु त्यांना एस विभागातील प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यानुसार कोणतीही कल्पना दिली नाही. त्यामुळे दळवी यांनी विभागातील लोकांसह या केंद्राचे सकाळीच उद्घाटन केले आणि त्यानंतर याच केंद्राचे महापौरांसह शिवसेनेच्या नगरसेवकांनी उद्घाटन केले. त्यामुळे शिवसेनेची आता प्रशासनाला हाताशी धरून भाजप नगरसेवकांच्या प्रभागातील घुसखोरी वाढत असल्याचे दिसून येत आहे.

किशोरी पेडणेकर या मुंबईच्या नव्हे तर शिवसेनेच्या महापौर आहेत. जर कांजूर पूर्व येथे शिवसेना नगरसेविका सुवर्णताई करंजे यांच्या प्रभागात त्यांच्या प्रयत्नाने लसीकरण केंद्र सुरु झाले. आणि त्यांचे उद्घाटन करताना महापौर स्वत: येतात. त्यांचे आमदार आणि शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित राहतात. तर मग माझ्या पाठपुराव्यानंतर भांडुप पश्चिम येथील सावित्रीबाई फुले प्रसुतीगृह केंद्राचे उद्घाटन करताना स्थानिक नगरसेविका म्हणून जर महापौर आणि प्रशासनातील अधिकारी बोलवत नसतील. तर या महापौरांवर आणि प्रशासनावर काय विश्वास ठेवायचा. कोविडच्या नावाखाली राजकारण कोण करतेय हे तुम्हीच पहा. भाजपच्या नगरसेवकांच्या कामांवर श्रेय घेण्याचा खटाटोप शिवसेनेचा चालू आहे. तुम्ही जरुर उद्घाटन करा पण प्रयत्न कुणाचे आहेत हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे, हेही लक्षात ठेवा.
– साक्षी दळवी, भाजप नगरसेविका,भांडुप पश्चिम

महापौरांच्या आधीच केले उद्घाटन!

कांजूर पूर्व येथील परिवार महापालिका इमारतीमध्ये असलेल्या प्रसुतीगृहाच्या जागेत स्थानिक शिवसेना नगरसेविका सुवर्णा करंजे यांच्या प्रयत्नाने लसीकरण केंद्र उभारण्यात आले. या केंद्राचे उद्घाटन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते आणि स्थानिक आमदार सुनील राऊत यांच्या उपस्थित करण्यात आले. हे उद्घाटन झाल्यानंतर महापौरांसह शिवसेनेच्या नगरसेवकांनी भांडुप पश्चिम येथील सावित्रीबाई फुले प्रसुतीगृहातील लसीकरण केंद्राकडे मोर्चा वळवला. या केंद्राचे उद्घाटन सकाळीच स्थानिक भाजप नगरसेविका साक्षी दळवी यांच्या हस्ते पार पडले होते. यावेळी भाजप नगरसेविका जागृती पाटील उपस्थित होत्या. या केंद्राचे नंतर महापौरांच्या हस्ते व स्थानिक आमदार रमेश कोरगावकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडले. विशेष म्हणजे या केंद्राचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते होणार आहे हे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कोणतीही कल्पना स्थानिक नगरसेविकेला दिली आहे. परंतु हे केंद्र गुरुवारपासून सुरु होणार आहे याची कुणकुण लागल्यामुळे दळवी यांनी याचे उद्घाटन उरकून घेतले. पण जर याचे उद्घाटन प्रशासनाला महापौरांच्या हस्ते करायचे होते तर मग त्यांनी जर मला याची कल्पना दिली असती तर मी याचे उद्घाटन केले नसते, असे दळवी यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा : वाचाळवीर मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांची समज! मंत्रिमंडळात लसीकरणाच्या श्रेयवादाचा मुद्दा गाजला?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.