ऋजुता लुकतुके
नवी दिल्लीत जंतर मंतर भागात पुन्हा एकदा कुस्तीपटूंच्या (Wrestlers Protest) आंदोलनाचं वारं शिरलं आहे. यावेळी शेजारच्या पंजाब, हरयाणा राज्यांतून शेकडो कुस्तीपटू बसमध्ये बसून दिल्लीत आले आहेत. आणि त्यांचा विरोध आहे गेल्यावर्षी आंदोलन केलेल्या बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाटला. या खेळाडूंच्या आंदोलनामुळे आपल्या कारकीर्दीतील एक महत्त्वाचं वर्षं वाया गेलं असं या कुस्तीपटूंचं म्हणणं आहे.
छपरौली, बाघपत आणि नरेला या भागातून हे कुस्तीपटू दिल्लीत आले आहेत. संख्येनं ते तीनशेच्या आसपास आहेत. आणि बुधवारी त्यांनी जंतर मंतरवर बजरंग, साक्षी आणि विनेशच्या विरोधात घोषणाबाजी केली, तसंच फलकही उंचावले.
‘भारतीय कुस्तीची या ३ कुस्तीपटूंपासून सुटका करा,’ असं त्यांच्या फलकांवर लिहिलेलं होतं. आणि तसं आवाहन त्यांनी जागतिक कुस्ती फेडरेशनला केलं होतं.
(हेही वाचा-Vivo X100 Series : जाणून घ्या विवो एक्स १०० सीरिजचे काय आहेत फिचर्स? )
जंतर मंतर या ठिकाणी बरोबर एका वर्षापूर्वी साक्षी, बजरंग आणि विनेश यांच्या नेतृत्वाखाली काही कुस्तीपटूंनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर भारतीय कुस्ती चांगलीच ढवळून निघाली. या खेळाडूंचा विरोध होता तो माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांना. शरण यांच्यावर खेळाडूंनी कुस्तीपटूंचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. त्यानंतर आंदोलन आणि ब्रिजभूषण प्रकरण चांगलंच चिघळलं.
सगळ्या प्रकरणाचं पर्यावसान भारतीय कुस्ती फेडरेशन बरखास्त होण्यातही झालं. जागतिक फेडरेशननेही भारतीय फेडरेशनची मान्यता काढून घेतली. त्यानंतर डिसेंबरमध्ये निवडणुका झाल्या. पण, नवीन कार्यकारिणीवर नियमबाह्य कामकाजाचा ठपका ठेवत क्रीडा मंत्रायलाने पुन्हा एकदा कार्यकारिणी निलंबित केली आहे. तो घोळ अजूनही सुरूच आहे.
पण, या सगळ्या घोळात मागचं वर्षभर कुस्तीपटूंचं नुकसान झालं. आणि आंतरराष्ट्रीय संघटनेनं मान्यता काढून घेतल्यामुळे भारतीय कुस्तीपटूंना भारतीय ध्वजाखालीही खेळता येत नाहीए. शिवाय राष्ट्रीय स्पर्धा, खेळाडूंची राष्ट्रीय शिबिरं या घडामोडीही बंद आहेत.
याचा फटका आपल्या कारकीर्दीला बसत असल्याचं या युवा कुस्तीपटूंचं म्ङणणं आहे. आणि ही वेळ तीन ज्येष्ट कुस्तीपटूंनी त्यांच्यावर आणल्याचा त्यांचा आरोप आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community