महाविकास आघाडीमधील काही राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याच्या प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला (Rashmi shukla) यांची गुरुवार, ४ जानेवारी रोजी राज्याच्या पोलिस महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली. 1988 च्या बॅचच्या आयपीएस असलेल्या रश्मी शुक्ला यांची कारकीर्द मोठ्या वादात सापडली होती. शुक्ला यांच्यावरती पुणे आणि मुंबई या दोन ठिकाणी वेगवेगळे दोन गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. पुढे दोन्ही गुन्हे न्यायालयाने रद्द केले.
(हेही वाचा Shri Ram : प्रभू श्रीरामाचा अवमान केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांनंतर सुषमा अंधारेंविरोधातही गुन्हा दाखल )
आता शुक्ला या रजनीश सेठ यांची जागा घेणार आहेत. पोलिस महासंचालक पदासाठीच्या ज्येष्ठता यादीत रश्मी शुक्ला (Rashmi shukla) यांचे नाव आघाडीवर होते. शुक्ला यांना मुंबईचे पोलिस आयुक्त करण्यात येणार असल्याची चर्चा होती. शेवटी त्यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली. रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक असतील. केंद्रीय लोकसेवा आयोगाची बैठक शुक्रवार, २९ डिसेंबर रोजी झाली. यावेळी त्यांनी महासंचालकपदासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नावांची यादी पाठवली होती. यामध्ये पहिले नाव होते रश्मी शुक्ला. त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यायचा होता. अखेर आज सरकारने शुक्ला यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले.
Join Our WhatsApp Community