- ऋजुता लुकतुके
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन कसोटीत भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला. आणि हा असा २५ वा प्रसंग होता जिथे एखाद्या संघाने दोन दिवासंच्या आत कसोटी विजय साकारला असेल. भारतीय संघासाठी हा तिसरा अनुभव होता, जिथे कसोटी दोन दिवसांच्या आत संपली. या झटपट संपलेल्या कसोटींच्या धावसख्येवर आणि त्या कसोटी कुठे झाल्या होत्या यावर एक नजर टाकूया,
इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया, ओव्हल १८८२
क्रिकेटच्या इतिहासातील ही फक्त नववी कसोटी होती. तेव्हाच्या दोन कसोटी मान्यता असलेल्या संघात झालेली ही कसोटी ऑस्ट्रेलियाने ७ धावांनी जिंकली होती. डब्ल्यू जी ग्रेस आणि फ्रेड ‘डेमन’ (फलंदाजांचा कर्दनकाळ) या कसोटीत खेळले होते. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ ६३ धावांत गुंडाळला गेला. आणि इंग्लंड संघानेही १०२ धावाच केल्या. दुसऱ्या डावांत ऑस्ट्रेलियाने १२२ धावा केल्या. आणि इंग्लंडसमोर ८३ धावांचं लक्ष्य असताना इंग्लिश संघाला ६ धावा कमीच पडल्या होत्या. डब्ल्यू जी ग्रेस यांनी दुसऱ्या डावात ३२ धावा केल्या होत्या.
इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया, लॉर्डर्स १८८८
ऑस्ट्रेलियाने ११६ आणि ६० धावा केल्या. आणि इंग्लंडला ५३ आणि ६२ धावांतच सर्वबाद केलं. होम ऑफ क्रिकेटमध्ये अशा रीतीने ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा इंग्लंडचा पराभव केला. पण, इतक्या नाट्यमय पद्धतीने.
इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया, ओव्हल १८८८
ऑस्ट्रेलियाच्या इंग्लंड दौऱ्यात १८८८ मध्ये एकूण तीन कसोटी दोन दिवसांच्या आत संपल्या. याच दौऱ्यात ओव्हलमध्येही कसोटी दोन दिवस चालली. पण, यावेळी इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा १ डाव आणि १३७ धावांनी पराभव केला. इंग्लंडने पहिली फलंदाजी करत ३१७ धावा केल्या. आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाला ८० आणि १०० धावांतच गुंडाळलं.
इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया, मँचेस्टर १८८८
मँचेस्टर कसोटीही इंग्लंडने एका डावाच्या फरकाने जिंकली. इंग्लंडने पहिली फलंदाजी करत १७८ धावा केल्या. डब्ल्यू जी ग्रेस यांनी ३२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, ऑस्ट्रेलियन संघ एकाही डावात शंभरच्या वर धावा करू शकला नाही. ऑसी संघ ८० आणि ७० धावांवर बाद झाला.
(हेही वाचा – India vs SA 2nd Test : भारत पुन्हा एकदा कसोटीत ‘अव्वल’)
द आफ्रिका वि. इंग्लंड, पोर्ट एलिझाबेथ १८८९
१८८९ मध्ये क्रिकेट दक्षिण आफ्रिकेत पोहोचलं. इंग्लिश संघाने पहिल्यांदा आफ्रिकेचा दौरा केला. पोर्ट एलिझाबेथमध्ये आफ्रिकन संघाने दोन्ही डावांत अनुक्रमे ८४ आणि १२९ धावा केल्या. आणि इंग्लंडने १४८ आणि दोन बाद ६७ धावा करत ही कसोटी ८ गडी राखून जिंकली.
द आफ्रिका वि. इंग्लंड, केपटाऊन १८८९
दुसऱ्या केपटाऊन कसोटीत इंग्लंडने पूर्ण वर्चस्व गाजवलं. इंग्लंडने पहिल्या डावात २९२ धावा केल्या त्या बॉबी एबेलच्या १२० धावांच्या जोरावर. आणि त्यानंतर इंग्लंडकडून जॉनी ब्रिग्जने दोन्ही डावांत मिळून आफ्रिकेचे १५ बळी टिपले. आणि ही कसोटी इंग्लंडने डावाने जिंकली.
इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया, ओव्हल १८९०
ऑस्ट्रेलियाने ९२ आणि १०२ धावा केल्या. आणि प्रत्युत्तरादाखल, इंग्लंडने १०० आणि ८ बाद ९५ धावा करत दोन गडी राखून ही कसोटी जिंकली.
द आफ्रिका वि. इंग्लंड, पोर्ट एलिझाबेध १८९६
इंग्लिश संघाने या कसोटीत १८५ आणि २२६ धावा केल्या. आणि द आफ्रिकेला ९३ आणि ३० धावांतच गुंडाळलं. त्यावेळी फॉलोऑनची पद्धत नव्हती. त्यामुळे दोन डाव झाले. आणि इंग्लंडने ही कसोटी २८८ धावांनी जिंकली.
द आफ्रिका वि. इंग्लंड, केपटाऊन १८९६
दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावातील ११५ या धावसंख्येला उत्तर देताना इंग्लंडने २६५ धावांनी केल्या. यात एकट्या आर्थर हिलचा वाटा होता १२४ धावांचा. मग आफ्रिकन संघाला ११७ धावांत गुंडाळत इंग्लंडने एका डावाने विजय साध्य केला.
(हेही वाचा – Suryakumar Yadav : २०२३ मध्येही आयसीसी टी-२० पुरस्कारासाठी सुर्यकुमारचंच पारडं जड)
ऑस्ट्रेलिया वि. द आफ्रिका, मँचेस्टर १९१२
ही कसोटीमधील तिरंगी मालिका होती. आणि यात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका हे संघ सहभागी झाले होते. मँचेस्टर इथं झालेल्या कसोटीत पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाने ४४५ अशी धावसंख्या उभारली. चारशेच्या पार जाण्याची ही पहिली वेळ होती. त्यानंतर आफ्रिकन संघाला २६५ आणि ९५ धावांत गुंडाळत ऑस्ट्रेलियाने आरामात विजय मिळवला.
इंग्लंड वि. द आफ्रिका, ओव्हल १९१२
या मालिकेच्या पुढील सामन्यात ओव्हल इथं दक्षिण आफ्रिकेचा संघ दोनही डावांत अनुक्रमे ९५ आणि ९३ धावांत गुंडाळला गेला. इंग्लंडने पहिल्या डावात १७६ आणि दुसऱ्या डावात बिनबाद १४ धावा करत ही कसोटी जिंकली. सिडनी बार्नेसने या कसोटीत १३ बळी घेतले.
इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया, नॉटिंगहॅम १९२१
या कसोटीपासून ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. इंग्लंडचे दोन्ही डाव अनुक्रमे ११२ आणि १४७ धावांत गुंडाळले गेले. आणि ऑस्ट्रेलियाने २३२ आणि बिनबाद ३० धावा करत ही कसोटी आरामात जिंकली.
ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडिज, मेलबर्न १९३१
सर डॉन ब्रॅडमन यांचा क्रिकेटमध्ये उदय झाला होता. आणि त्यांच्या १५२ धावांच्या अप्रतीम खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ८ बाद ३२८ धावा केल्या. विंडिजचा संघ ९९ आणि १०७ धावांत गुंडाळला गेला. आणि ऑस्ट्रेलियाने डावाने विजय मिळवला.
द आफ्रिका वि ऑस्ट्रेलिया, जोहानसबर्ग १९३६
द आफ्रिकेचा पहिला डाव १५७ धावांत आटोपला. आणि ऑस्ट्रेलियाने जॅक फिंगलटनच्या शतकाच्या जोरावर ४३९ धावा केल्या. दुसऱ्या डावात आफ्रिकन डाव ९८ धावांतच गुंडाळला गेला. क्लॅरी ग्रिमेट या लेगस्पिनरने ७ गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाने ही कसोटी एक डाव आणि १८४ धावांनी जिंकली.
(हेही वाचा – China Praise Narendra Modi : चिनी ड्रॅगन नरमला; केली पंतप्रधान मोदी यांच्या कारकीर्दीची प्रशंसा)
न्यूझीलंड वि. ऑस्ट्रेलिया, वेलिंग्टन १९४६
एकाच खंडातील दोन देशांत झालेली ही कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकली. किवी संघ ४२ आणि ५४ धावांत गुंडाळला गेला. तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ८ बाद १९९ धावा केल्या. कांगारुंनी १ डाव आणि १०३ धावांनी ही कसोटी जिंकली.
इंग्लंड वि. वेस्ट इंडिज, लीड्स २०००
कसोटी झटपट संपण्याचा प्रसंग त्यानंतर थेट ५४ वर्षांनी आला. वेस्ट इंडिजच्या १७२ धावांना उत्तर देताना इंग्लंडने पहिल्या डावात २७२ धावा केल्या. आणि विंडिजचा दुसरा डाव ६१ धावांत गुंडाळला गेल्यावर इंग्लंडने एक डाव आणि ३९ धावांनी विजय साकारला. अँडी कॅडिक आणि डॅरन गॉ यांनी मिळून ९ गडी बाद केले.
ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान, शारजा २००२
हा कसोटी सामना शेन वॉर्नने गाजवला. वॉर्नने दोन्ही डावांत प्रत्येकी ८ गडी बाद केले. त्यामुळे पाकिस्तानचा संघ ५९ आणि ५ं३ धावांत गुंडाळला गेला. आणि ऑस्ट्रेलियाने एक डाव आणि १९८ धावांनी विजय साकारला. मॅथ्यू हेडनने ऑस्ट्रेलियासाठी शतक ठोकलं.
द आफ्रिका वि. झिंबाब्वे, केपटाऊन २००५
द आफ्रिकेनं झिंबाब्वेचे दोन्ही डाव अनुक्रमे ५४ आणि २६५ धावांत गुंडाळले. आणि आपल्या एकमेव डावात ३४० धावा केल्या. झिंबाब्वेचा एक डाव आणि २१ धावांनी पराभव झाला.
झिंबाब्वे वि. न्यूझीलंड, हरारे २००५
ब्रँडन मॅक्युलम आणि डॅनिएल व्हिटोरी यांच्या शतकांच्या जोरावर न्यूझीलंडने ४५२ धावा केल्या. आणि झिंबाब्वेचा संघ ५९ आणि ९९ धावांत गुंडाळला गेला. त्यामुळे न्यूझीलंडने एक डाव आणि २९४ धावांनी हा कसोटी सामना जिंकला.
(हेही वाचा – ED Raids : काँग्रेस आमदार सुरेंद्र पवार आणि दिलबाग सिंग यांच्या घरावर ईडीचे छापे)
द आफ्रिका वि. झिंबाब्वे, पोर्ट एलिझाबेथ २०१७
पहिली फलंदाजी करत द आफ्रिकेनं ३०९ धावांवर आपला पहिला डाव धोषित केला. आणि त्यानंतर झिंबाब्वेचे दोन्ही डाव ६८ आणि १२१ धावांत गुंडाळत त्यांनी एक डाव आणि १२० धावांनी विजय साकारला.
भारत वि अफगाणिस्तान, बंगळुरू २०१८
भारताने अजिंक्य रहाणेच्या कप्तानीखाली ही कसोटी दोन दिवसांत जिंकली होती. भारताने पहिली फलंदाजी करत ४७४ धावा केल्या. यात सलामीवीर शिखर धवन आणि मुरली विजय यांनी शतकं झळकावली. अफगाणिस्तानचे दोन्ही डाव १०९ आणि १०३ धावांत आटोपले. आणि भारताने ही कसोटी एक डाव आणि २६२ धावांनी जिंकली.
भारत वि. इंग्लंड, अहमदाबाद २०२१
मोटेराची खेळपट्टी पहिल्या दिवसापासून फिरत होती. आणि इंग्लंडने ११२ आणि ८१ धावा केल्या. तर भारताने १४५ आणि बिनबाद ४९ धावा करत ही कसोटी जिंकली.
अफगाणिस्तान वि. झिंबाब्वे, आबूधाबी २०२१
झिंबाब्वेनं अफगाणिस्तानचे दोन्ही डाव १३१ आणि १३५ धावांत गुंडाळले. झिंबाब्वेनं पहिल्या डावात २५० आणि दुसऱ्या डावात बिनबाद १७ धावा करत ही कसोटी जिंकली.
ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका, ब्रिस्बेन २०२२
अगदी अलीकडे दोन दिवसांत संपलेल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आफ्रिकन संघाचे दोन्ही डाव १५२ आणि ९९ धावांत गुंडाळले गेले. तर ऑस्ट्रेलियाने २१८ आणि चार बाद ३५ धावा करत ही कसोटी ६ गडी राखून जिंकली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community