- ऋजुता लुकतुके
कुस्ती फेडरेशन क्रीडा मंत्रालयाविरोधात न्यायालयीन लढाई लढण्याच्या तयारीत असल्याचं नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंग (Sanjay Singh) यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. त्यापूर्वी नवीन कार्यकारिणीची बैठक १६ जानेवारी रोजी नवी दिल्लीत बोलावण्यात आली आहे. त्यानंतर क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाविरुद्ध नेमका कसा लढा द्यायचा यावर शिक्कामोर्तब होईल असं संजय सिंग (Sanjay Singh) मीडियाशी बोलताना म्हणाले.
कुस्ती फेडरेशनच्या निवडणुका २१ डिसेंबरला पार पडल्या. आणि त्यात संजय सिंग (Sanjay Singh) अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. पण, त्यानंतर तीनच दिवसांत क्रीडा मंत्रालयाने या नेमणुका रद्द केल्या. आणि फेडरेशनही बरखास्त केली. ही कारवाई करताना नवीन कार्यकारिणीच्या निर्णय प्रक्रियेवर सरकारने ठपका ठेवला होता. नवीन कार्यकारिणीने नेमणुकीनंतर काही तासांतच काही महत्त्वाचे निर्णय घेतले होतं. निर्णयाची ही पद्धत देशाच्या क्रीडा धोरणाशी सुसंगत नाही, असं म्हणत क्रीडा मंत्रालयाने मग बरखास्तीची कारवाई केली. आणि ऑलिम्पिक असोसिएशनला निर्देश देत कुस्तीसाठी तात्पुरती समितीही नेमली.
(हेही वाचा – Delhi Winter : दिल्लीसह ६ राज्यांमध्ये कोल्ड डे अलर्ट; राजधानीत धुक्यांचे साम्राज्य)
पण, निवडणुकीत निवडून आलेल्या कार्यकारिणीला हा निर्णय मान्य नाही. कुस्ती फेडरेशन ही स्वायत्त संस्था असल्यामुळे आणि निवडणूक प्रक्रियेतून निवडून आल्यामुळे फेडरेशन बरखास्तीचा अधिकार क्रीडा मंत्रालयाचा नाही, असं संजय सिंग (Sanjay Singh) यांचं म्हणणं आहे.
एकूणच भारतीय कुस्ती आणि कुस्ती फेडरेशनची निवडणूक भारतीय क्रीडा क्षेत्रात सध्या वादग्रस्त ठरतेय. संजय सिग (Sanjay Singh) यांच्या निवडीला बजरंग पुनिया,(Bajrang Punia) साक्षी मलिक (Sakshi Malik) आणि विनेश फोगाट (Vinesh Phogat) सह काही आंतरराष्ट्रीय तसंच राष्ट्रीय खेळाडूंनी विरोध केला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community