NCP : राष्ट्रवादीत दादा-ताईमध्ये गटबाजी, नव्या दादांना ‘साईडलाइन’ केल्याची चर्चा

राष्ट्रवादी पक्ष एकसंघ असताना अजित’दादा’ आणि सुप्रिया’ताई’ यांच्यात दादांचे पारडे जड असल्याचे त्यांना साथ देणाऱ्या आमदारांच्या संख्येवरूनच स्पष्ट होते. मात्र अजितदादानंतर नव्याने उदयास येत असलेल्या रोहितदादांच्या नेतृत्वाला ‘साईडलाइन’ करण्यात ताईंचा गट यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे.

298
NCP : राष्ट्रवादीत दादा-ताईमध्ये गटबाजी, नव्या दादांना ‘साईडलाइन’ केल्याची चर्चा
NCP : राष्ट्रवादीत दादा-ताईमध्ये गटबाजी, नव्या दादांना ‘साईडलाइन’ केल्याची चर्चा
  • सुजित महामुलकर

राष्ट्रवादी पक्ष एकसंघ असताना अजित’दादा’ आणि सुप्रिया’ताई’ यांच्यात दादांचे पारडे जड असल्याचे त्यांना साथ देणाऱ्या आमदारांच्या संख्येवरूनच स्पष्ट होते. मात्र अजितदादानंतर नव्याने उदयास येत असलेल्या रोहितदादांच्या नेतृत्वाला ‘साईडलाइन’ करण्यात ताईंचा गट यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे. (NCP)

पक्षात उभी फूट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे पक्षात उभी फूट पडली आणि शरद पवारांच्या पुढच्या पिढीतील ‘दादा’ (अजित पवार) विरुद्ध ‘ताई’ (सुप्रिया सुळे) असा सुप्त संघर्ष संपुष्टात आला. सद्या ‘दादा’ समर्थक अजित पवारांसोबत त्यांच्या गटात आहेत तर शरद पवार आणि ‘ताई’समर्थक आहे त्याच पक्षात राहिले. (NCP)

रोहित’दादा’ कधी झाले कळलेच नाही..

अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केले त्याला आता सहा महिने उलटले. पुलाखालून बरंच पाणी गेलं. या काळात पवारांच्या तिसऱ्या पिढीतील पहिले आमदार आणि लो-प्रोफाइल असलेले नेते रोहित पवार कमालीचे सक्रीय झाले. अजित पवार (Ajit Pawar) गटावर टीका करण्याची जशी मिळेल तशी संधी घेत-घेत रोहित’दादा’ कधी झाले कळलेच नाही. त्यामुळे ताई पुन्हा असुरक्षित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (NCP)

(हेही वाचा – Weather Update : देशात थंडीची लाट तर दक्षिण भारतासह कोकणात पावसाचा अलर्ट)

काही ‘सो-कॉल्ड’ नेते पक्ष संपवण्यासाठी पुरेसे

राष्ट्रवादीत अनेक वर्षे शरद पवार यांच्यासोबत काम केलेल्या छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे. “उरला-सुरला राष्ट्रवादी शरद पवार गट संपवण्यासाठी इतर पक्षांनी काही करायची गरज आहे, असे मला वाटत नाही. त्यांचे जे काही ‘सो-कॉल्ड’ नेते आहेत, तेच त्यांचा पक्ष संपवण्यासाठी पुरेसे आहेत,” असे सांगून भुजबळ यांनी नव्या गटबाजीचे संकेत दिले. (NCP)

अल्पसंख्याकाना खूश करण्यासाठी केले विधान

राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या दोन दिवसीय शिबिरात मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीराम हे मांसाहारी होते असं विधान करत शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. त्याचे पडसाद तात्काळ उमटले. भाजपाच्या राम (कदम) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आणि आव्हाड यांनी त्यांच्या मतदार संघातील अल्पसंख्याकाना खूश करण्यासाठी असे विधान केल्याचा आरोप केला. (NCP)

(हेही वाचा – Shortest Test Match : ‘मालिकेत इतका वेळ शिल्लक होता की, तिसरी निर्णायक कसोटीही घेता आली असती’)

रोहितदादांनी सुनावले

आव्हाडांच्या वादग्रस्त विधानावर शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी भाष्य करणं सोयीस्कर टाळलं तर शरद पवारांचे नातू, आमदार रोहित पवार यांनी अबूधाबी येथून प्रतिक्रिया देत आव्हाडांना चार शब्द सुनावले. “देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कोणीही याचं राजकारण करू नये. पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ. अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न पडण्याचे भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे,” अशी प्रतिक्रिया पवार यांनी समाजमाध्यमांवर दिली. (NCP)

ज्वलंत विषयावर बोला

तसेच “आज नको त्या विषयावर बोलून वाद वाढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा सुव्यवस्था, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव, अशा ज्वलंत विषयावर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे,” असा खोचक सल्लाही पवारांनी आव्हाडांना दिला. (NCP)

ताईचे पारडे जड

मात्र रोहितदादांना या मुद्द्यावर पक्षात ‘साईडलाइन’ केल्याचे चित्र दिसत असून रोहितदादा विरुद्ध सुप्रियाताई या गटबाजीत पवारांची कन्या आणि राजकारणात रोहितदादांना ज्येष्ठ ताईचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. (NCP)

(हेही वाचा – Yashasvi Jaiswal : दक्षिण आफ्रिका मालिकेतून यशस्वी जयसवाल काय शिकला?)

रोहित यांच्याकडे मी लक्ष देत नाही

रोहित यांच्या प्रतिक्रियेवरून चिडलेल्या आव्हाडांनी आपल्याच पक्षप्रमुखाच्या नातवाला उलट उत्तर देण्याची हिंमत केली ती ‘अदृश्य’ वरदहस्तामुळेच, अशी चर्चा होत आहे. “रोहित पवार काय बोलतात याकडे मी फार लक्ष देत नाही. अजून लहान आहेत ते, पहिलीच टर्म (आमदारकी) आहे त्यांची. अबूधाबीमध्ये बसून बोलणं खूप सोप्प आहे,” अशी प्रतिक्रिया देऊन रोहितपेक्षा वरीष्ठ नेत्यांचा (ताई) आपल्याला आशिर्वाद असल्याचे संकेतच त्यांनी दिले. (NCP)

काही नेत्यांचे ‘नरो वा कुंजरो वा’

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दुसरे नेते राजेश टोपे यांनीदेखील ‘नरो वा कुंजरो वा’ अशी भूमिका घेत, “आव्हाडांचे ते वैयक्तिक मत असेल,” अशी प्रतिक्रिया दिली. तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हात वर करत, “मी त्यांचं विधान ऐकलं नाही. तपासून बघतो आणि मग बोलतो,” असं पत्रकारांना सांगितलं. भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे यांनी मात्र आव्हाडांना समज देत, “श्रद्धा आणि भावनेचा विषय असतो तेव्हा अशी वक्तव्य टाळावीत,” असा सल्लाही आव्हाडांना दिला. (NCP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.