क्रांतिकारकांचा खरा इतिहास पुढे यावा, यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक प्रयत्नशील आहे. आता सोशल मिडियाच्या माध्यमातूनही जनजागृती होत आहे. याचा मला खूप आनंद होत आहे, असे विधान स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात असिलता सावरकर यांनी केले. १४ वर्षांचा कारावास संपल्यानंतर ६ जानेवारी १९२४ला स्वातंत्र्यवीर सावरकरांची मुक्तता करण्यात आली. या घटनेला १०० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त ‘स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) मुक्ती शताब्दी यात्रे’चं आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी असिलता सावरकर बोलत होत्या.
ठाणे कारागृहातून शनिवार, ६ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता या बाईक रॅलीला सुरुवात झाली, या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्नील सावरकर आणि स्मारकाचे विश्वस्त शैलेंद्र चिखलकर उपस्थित होते.
वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन…
‘स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी यात्रे’चं महत्त्व सांगताना त्या म्हणाल्या की, स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दीच्या निमित्ताने ठाणे ते दादर बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. वर्षभर विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. तरुण पिढीला स्वातंत्र्यवीरांच्या कार्याची ओळख होणे गरजेचे आहे. या निमित्ताने इतर क्रांतिकारकांचाही खरा इतिहास देशभक्तांपुढे येईल. वीर सावरकर यांचा कारावास संपला असला, तरी तो त्यांनी केलेल्या समाजक्रांती पर्वाचा हा प्रारंभ होता. या दिनाचं औचित्त्य साधून वर्षभर विविध कार्यक्रम सुरू राहतील.
View this post on Instagram
‘राष्ट्रगीत’ गायनाने बाईक रॅलीला सुरुवात
स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दीच्या निमित्ताने ठाणे कारागृह ते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर असे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. ‘ठाणे एनफिल्ड क्लब’ यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीची सुरुवात ठाणे कारागृहातून करण्यात आली. ठाणे कारागृहातील क्रांती स्तंभाजवळ राष्ट्रगीत गायनाने या बाईक रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा असलेला रथ अग्रभागी ठेवण्यात आला होता. बुलेट, मोटारगाड्या घेऊन ठाण्यातील सावरकरप्रेमी, हिंदुत्ववादी संघटनांनी या रॅलीत सहभाग घेतला.