लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. ही निवडणूक कशी होणार याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. याचदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी निवडणुकीबाबत संकेत दिले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. कल्याण ग्रामीण भागातील वरप येथे आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) मेळाव्यात ते बोलत होते.
(हेही वाचा – 100th Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan: तंत्रज्ञानाचे गुलाम न होता त्याचा फायदा कसा होईल हे कळले पाहिजे : परिसंवादात उमटला सूर )
यावेळी त्यांनी पक्षात पडलेल्या फुटीबाबत भूमिका मांडली. याविषयी ते म्हणाले की, फुले, शाहू, आंबेडकर या महामानवाच्या विचारावर आमची वाटचाल सुरू आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा सत्तेतील सहभाग हा सामान्य माणसाच्या हितासाठी असल्याचे खासदार सुनिल तटकरे यांनी सांगितले.
टिका करणाऱ्यांकडे लक्ष देत नाही…
सरकारी यंत्रणा हलवण्याची ताकद सत्तेत असायला हवी. त्यादृष्टीने आमचे काम सुरू असून सार्वजनिक कामे झालीच पाहिजेत. सर्वसामान्य लोकांचे कल्याण करण्याच्या भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस काम करत आहे. आमच्यावर जे लोक टिका करत आहेत त्यांच्याकडे लक्ष न देता फक्त कामाला महत्त्व देतो. महामानवांच्या विचारावर आमच्या पक्षाची वाटचाल सुरू आहे. आमचे व्हिजन क्लीअर आहे. राज्यातील जनतेचा विकास हेच ध्येय घेऊन आम्ही काम करत आहोत,असे अजित पवार म्हणाले.
शरद पवार यांच्यावर हल्लाबोल…
अजित पवार यांनी यावेळी शरद पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. वय झाल्यावर राजकारणात आणि इतर क्षेत्रात थांबायचे असते, असा संकेत असतो; परंतु काहीजण थांबायला तयार नाही. काहीजण हट्टीपणा करत आहेत. राजकारणात वयाची अट नसते, मात्र वयाची ८० – ८४ ओलांडली तरी काही लोकं थांबायला तयार नाही. आम्ही आहोत ना सक्षम, आम्हाला मार्गदर्शन करा ना, मी कित्येक वर्षे सत्तेत काम करत आलो आहे, असा हल्लोबलही त्यांनी यावेळी केला.
पंतप्रधानांचे कौतुक…
या देशाची मान आणि शान वाढविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे. भारत देश प्रत्येक क्षेत्रात आगेकूच करत आहे. तरुण – तरुणींच्या हाताला काम कसे मिळेल असा प्रयत्न सुरू आहेत. ८० कोटी जनतेला मोफत धान्य दिले जात आहे. घरकुल योजना राबवली जात आहे. काहींना नोकरी व काहींना व्यवसाय दिला जात आहे. शेतकऱ्यांना ६ हजार केंद्र व राज्य सरकार ६ हजार, असे १२ हजार रुपये देत आहोत, असे म्हणून अजित पवार यांनी पंतप्रधानांचे कौतुक केले.
या मेळाव्यात आमदार दौलत दरोडा, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव आदींनी आपले विचार मांडले. यावेळी अनेक पक्षातील पदाधिकार्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. यावेळी पार्थ पवार, ठाणे – पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे, कल्याण ग्रामीण जिल्हाध्यक्ष भरत गोंधळे, प्रदेश सरचिटणीस आणि अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश निरीक्षक नजीब मुल्ला यांच्यासह रमेश हनुमंते, सोनिया धामी, किसनराव तारमाळे, प्रवीण खरात आदी प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community