सायली डिंगरे
वर्ष २०२४ चालू झाले आहे. या वर्षाची सुरुवात राममंदिरातील (Ayodhya Ram mandir) मूर्तीप्रतिष्ठापनेने होत आहे. ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीरामजन्मभूमी इस्लामी अतिक्रमणातून मुक्त झाली आहे. अयोध्येच्या मंदिर प्रतिष्ठापनेचा आनंद साजरा करतांना नेहमीच ‘अयोध्या तो बस झांकी है… काशी-मथुरा बाकी है!’, अशी घोषणा दिली जाते. ही घोषणा खरेच सत्यात उतरणार आहे. राममंदिराप्रमाणेच काशी येथील विश्वनाथ मंदिर आणि श्रीकृष्णजन्मभूमी असलेली मथुरा येथील शाही इदगाह मशिदीचे अतिक्रमण हटवण्यासाठी न्यायालयीन लढा दिला जात आहे. सरस्वतीदेवीचे प्रकटस्थळ असलेली मध्यप्रदेशातील धार येथील भोजशाला, दिल्लीतील कुतुबमिनार आणि लखनौ (उत्तरप्रदेश) येथील टिलेवाली मशीद अशा हिंदूंच्या प्रमुख धार्मिक स्थळांच्या ठिकाणांचा श्वास इस्लामी अतिक्रमणातून मुक्त व्हावा, यासाठी न्यायालयीन लढा दिला जात आहे. हा लढा प्राणांची बाजी लावून लढणारे अधिवक्ता विष्णु शंकर जैन (Advocate Vishnu Shankar Jain) यांच्याशी आम्ही संवाद साधला. या खटल्यांची सध्याची स्थिती जाणून घेतली. येत्या वर्षात हिंदूंना आणखी एक आनंदोत्सव साजरा करण्यास मिळणार का, याचा हा मागोवा!
ज्ञानवापी मशीद प्रकरणी सबळ पुरावे
सध्या काशी येथील ज्ञानवापी मशीद प्रकरण (Gnanavapi case) वाराणसी सत्र न्यायालयात आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ए. एस. आय.) १८ डिसेंबर रोजी वाराणसीच्या न्यायालयाला ज्ञानवापी मशिदीच्या संकुलाचा सर्वेक्षण अहवाल सादर केला आहे. या अहवालात या ठिकाणी मंदिराचेच अवशेष आहेत, याचे सबळ पुरावे आहेत. या संदर्भातील मुसलमान पक्षकारांच्या अनेक याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.
१७ व्या शतकात हिंदूंच्या मंदिराच्या ठिकाणी ही मशीद बांधली गेली आहे, अशी हिंदूंची याचिका आहे. सध्याच्या ज्ञानवापी मशिदीच्या जागी पूर्वी विश्वेश्वराचे मंदिर होते. तेथे शृंगारगौरी देवीची पूजा केली जात असे.
शाही ईदगाह मशिदीच्या सर्वेक्षणासाठी मान्यता
मथुरा येथील भगवान श्रीकृष्णाच्या मालकीच्या १३.३७ एकर जमिनीवर भगवान श्रीकृष्णाच्या मंदिराला लागूनच शाही ईदगाह मशीद (shahi idgah mosque mathura) आहे. या संपूर्ण जागेवर पूर्वी मंदिर होते. ते पाडून औरंगजेबाने ईदगाह मशीद बांधली होती. शाही ईदगाहच्या भूमीचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी हिंदूंनी न्यायालयात केली आहे.
नुकतेच शाही ईदगाह मशिदीच्या सर्वेक्षणासाठी हिंदू बाजूने करण्यात आलेल्या मागणीला अलाहाबाद उच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे.
कुतुबमिनार परिसरातील देवतांच्या पूजेची मागणी
कुतुबमिनार (Qutub Minar) हा एक लोखंडी स्तंभ आहे. तो चौथ्या शतकातील आहे. त्याला पूर्वी ‘विष्णुस्तंभ’ म्हटले जात असे. पुरातत्व विभागाचे माजी प्रादेशिक संचालक धरमवीर शर्मा म्हणाले होते की, कुतुबमिनार ही सूर्यस्तंभ नावाची वेधशाळा आहे. तो इस्लामी आक्रमणकर्ता कुतुबुद्दीन ऐबक याने नव्हे, तर त्याच्या आधी ७०० वर्षांपूर्वी सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्याने बांधले होते.
आताही कुतुबमिनार परिसरात हिंदू देवतांच्या मूर्तींचे अवशेष आहेत. या संदर्भात दिल्लीच्या दिवाणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. कुतुबुद्दीन ऐबकने २७ मंदिरे उद्ध्वस्त केली आणि त्यांच्या अवशेषांवरून मशीद बांधली, त्यामुळे परिसरात विखुरलेल्या मूर्ती पुन्हा स्थापित केल्या जाव्यात आणि त्यांना पूजा करण्याची परवानगी दिली जावी, असे त्यात म्हटले आहे.
दिवाणी न्यायालयाने ही याचिका फेटाळल्यानंतर ती उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. अधिवक्ता विष्णुशंकर जैन आणि त्यांचे वडील ज्येष्ठ अधिवक्ता हरिशंकर जैन हा खटला लढत आहेत.
भोजशाळेवरील अतिक्रमणावर जनहित याचिका
मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील भोजशाळा (Bhojshala) हे वाग्देवीचे प्रकटस्थळ आहे. भोजशाळा स्थळ हे पुरातत्व खात्याच्या अखत्यारित येते. येथे हिंदू दर मंगळवारी पूजा करतात, तर मुसलमान शुक्रवारी नमाज पढतात. ‘हिंदू फ्रंट फॉर जस्टिस’ने पुरातत्व विभागाच्या आदेशाला आव्हान देणारी जनहित याचिका (PIL) दाखल केली आहे.
अधिवक्ता हरिशंकर जैन यांनी सांगितले की, ‘भारतीय राज्यघटनेच्या कलम २५ अन्वये केवळ हिंदू समाजाच्या सदस्यांना धार येथील भोजशाळेच्या आवारात वाग्देवीच्या/सरस्वतीच्या ठिकाणी पूजा (प्रार्थना) आणि विधी करण्याचा मूलभूत अधिकार आहे. मुस्लिम समाजाच्या सदस्यांना वरील मालमत्तेचा कोणताही भाग कोणत्याही धार्मिक हेतूंसाठी वापरण्याचा अधिकार नाही.’
सध्या लंडन येथील संग्रहालयात असलेली देवी सरस्वतीची मूर्ती परत आणून ती भोजशाळेत पुन्हा स्थापित करण्याचे निर्देश केंद्राला द्यावेत, अशी मागणीही जनहित याचिकेत करण्यात आली आहे.
काय आहे भोजशाळेचा इतिहास ?
माता सरस्वतीचे मंदिर असलेले भोजशाळा हे भारतातील सर्वांत मोठ्या विद्यापिठांपैकी एक होते. हे जगातील संस्कृत शिक्षणाचे पहिले केंद्र देखील होते. आध्यात्मिकता, राजकारण, आयुर्वेद, व्याकरण, ज्योतिष, कला, नाटक, संगीत, योग, तत्वज्ञान इत्यादींचे ज्ञान घेण्यासाठी देश-विदेशातील हजारो विद्वान या विद्यापिठात येत असत. याशिवाय या शैक्षणिक केंद्रात विमान, जहाजे आणि इतर अनेक स्वयंचलित यंत्रांचा अभ्यासही करण्यात आला.
इ. स. १३०५ मध्ये मुस्लिम आक्रमणकर्ता अलाउद्दीन खिलजीने भोजशाळेवर हल्ला करून ती उद्ध्वस्त केली. नंतर १४०१ मध्ये दिलावर खानने भोजशाळेच्या एका भागात मशीद बांधली. अखेरीस, १५१४ मध्ये, महमूद शाह खिलजीने भोजशाळेच्या उर्वरित भागावर मशीद बांधली. ब्रिटीश राजवटीत भोजशाळेला संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.
टिलेवाली मशीद नाही, तर लक्ष्मणटिला !
खरे तर २०१३ साली भगवान शेषनागेश तिलेश्वर महादेव विराजमान (Lakshman Teela) यांच्या वतीने लखनौच्या सत्र न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यात असे म्हटले होते की, लखनौची टेकडी असलेली मशीद प्रत्यक्षात लक्ष्मणटीला आहे. त्यांना येथे पूजा करण्याची मालकी आणि अधिकार दिला जावा. याचिकेत म्हटले आहे की, येथे एक लक्ष्मणटीला आणि एक मंदिर होते, परंतु औरंगजेबाच्या सांगण्यावरून ते पाडण्यात आले आणि येथे मशीद बांधण्यात आली. (Teele Wali Masjid)
हा अत्यंत मंगलमय क्षण
राममंदिरात प्रभू रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना होत आहे, हा अत्यंत मंगलमय क्षण आहे. आम्ही हा प्रवास अनुभवला आहे. आम्ही बाबरीचा ढाचाही पाहिला आहे. तंबूतील रामलल्लाही पाहिले आहेत. आता भव्य मंदिराची उभारणी होतानाही पाहात आहोत. हा सुवर्णक्षण पाहायला मिळत आहे, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. – अधिवक्ता विष्णु शंकर जैन
अतिक्रमण झालेली ४० हजार मंदिरे मुक्त होईपर्यंत लढा देणार – अधिवक्ता विष्णु शंकर जैन
काशी, मथुरा येथील मंदिरांसह धार येथील भोजशाळा, दिल्लीतील कुतुबमिनार, लखनौ येथील टिलेवाली मशीद यांच्यावरील अतिक्रमणांच्या विरोधातही न्यायालयीन लढा चालू आहे. काशी येथे मशिदीच्या खाली मंदिर असल्याचे सबळ अवशेष पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणात आढळून आले आहेत. ती याचिका आता निर्णायक टप्प्यावर आहे. ज्या ज्या ठिकाणी मंदिरांचे भंजन करून मशिदी उभारण्यात आल्याचे पुरावे उपलब्ध आहेत, त्या त्या मंदिरांसाठी आम्ही लढा देणार आहोत. भारतात अतिक्रमण झालेली ४० हजार मंदिरे मुक्त होईपर्यंत आपल्याला हा लढा द्यावा लागेल!
(अधिवक्ता विष्णु शंकर जैन हे ‘हिंदू फ्रंट फॉर जस्टिस’चे प्रवक्ता आहेत. त्यांचे वडील आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ अधिवक्ता हरी शंकर जैन यांच्यासमवेत रामजन्मभूमीच्या खटल्याद्वारेच वकिलीला सुरुवात केली आहे.)
Join Our WhatsApp Community