१ मे पासून देशभरात १८ वयोगटापेक्षा अधिक समाजघटकाच्या लसीकरणाचा निर्णायक टप्पा सुरु होणार आहे, मात्र महाराष्ट्रात लसीचा कमालीचा तुटवडा असल्याने या दिवसापासून राज्यात तिसऱ्या टप्प्याचे लसीकरण सुरु करता येणार नाही, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला, तरीही १ मे हा राज्यासाठी अतिमहत्त्वाचा दिवस आहे, हा महाराष्ट्र दिन आहे. त्यामुळे या दिवशी तिसऱ्या टप्प्यासाठी लसीकरण सुरु करावे, अशी इच्छा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
खासगी रुग्णालयांतील लसीकरण थांबणार!
केंद्र सरकारने लसीकरण केलेला कार्यक्रम 45 वर्षांच्या वरील नागरिकांसाठी आहे. केंद्र सरकार जशा सूचना देईल तसेच करण्यात येईल. एक दिवसात आमची सात लाख लसीकरण करण्याची क्षमता आहे, तेवढा पुरवठा केंद्र सरकार करणार आहे का?, असेही आरोग्यमंत्री टोपे म्हणाले. सध्या तरी सरकार खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी लस उपलब्ध करून देणार नाही, सरकारला जर लसीचा तुटवडा जाणवला तर खासगी रुग्णालयांकडे जो साठा असेल तो सरकार ताब्यात घेणार आहे, असेही टोपे म्हणाले.
(हेही वाचा : जर अमेरिका स्वस्तात लस देते, तर भारतात का शक्य नाही? सर्वोच्च न्यायालयाकडून विचारणा )
महाराष्ट्र दिनी प्रतिकात्मक तिसऱ्या टप्प्याच्या लसीकरणाला सुरुवात!
1 मे हा महाराष्ट्र दिन आहे, याच दिवशी तिसऱ्या टप्प्याच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात व्हावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आग्रही आहेत. त्यानुसार लसीकरण मोहीम सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री आम्हाला शुक्रवारी, ३० एप्रिल रोजी रात्री सूचना देतील, तसचे जनतेशी संवाद साधतील, जरी लसीचा तुटवडा असला तरी १ मेपासून राज्यात प्रतिकात्मक तिसऱ्या टप्प्याच्या लसीकरणाला सुरुवात करू, असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
Join Our WhatsApp Community