पुण्यातील डॉक्टर व हॉस्पिटलेच ऑक्सिजनवर! डॉक्टर्स असोसिएशनचा आरोप

एफडीएकडून इंजेक्शन वितरणाची व्यवस्था कलेक्टर ऑफिसला जात असल्याने अडचणी वाढल्या आहेत, असा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला.

127

पुण्यात सद्यपरिस्थितीमध्ये कोविड-१९ आजाराचे व्यवस्थापन करताना ऑक्सिजन, रेमडेसिवीर वितरणाच्या प्रशासकीय समस्या निर्माण झालेल्या आहेत. या समस्या तातडीने दूर कराव्यात अशी मागणी पुणे डॉक्टर्स असोसिएशनने पत्रकार परिषदेत केली. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संभाजी मांगडे, विश्वस्त डॉ. सुनील जगताप यांनी ही मागणी केली. जनरल प्रॅक्टीशनरला लसीकरणाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

रुग्णांना सेवा देताना समस्यांचा सामना

पुण्यात अनेक कोविड उपचार केंद्रे सुरू झाली आहेत. प्रत्यक्ष कोविडचे रुग्ण तपासत असताना व उपचार देत असताना हॉस्पिटल्स, कोविड केअर सेंटर्स तसेच वैद्यकीय सेवक यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ऑक्सिजनची कमतरता, तसेच या आजारासाठी संजीवनी ठरत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनची पुरेशी उपलब्धता नसणे, या अडचण येत असल्याचे, डॉ. मांगडे यांनी सांगितले.

(हेही वाचाः लस तुटवड्याच्या नावाखाली महापालिकेसह सरकारचे ‘दबावतंत्र’?)

रुग्ण दगावण्याचा धोका

प्रशासनाच्या सहकार्याशिवाय सार्वजनिक आरोग्य सेवा संपूर्ण होऊ शकत नाहीत. या गोष्टी असतील तरच डॉक्टर्स कोविडच्या रुग्णांना बरे करू शकतात. गेले १५ दिवस ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे, तसेच रेमडेसिवीर उपलब्ध होत नाही. या स्थितीत खाजगी रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये येणारे रुग्ण हे गंभीर स्थितीत येतात. त्यांना ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्यास नातेवाईक उपलब्ध बेडवरती रुग्णांना अॅडमिट करुन घ्या, असं म्हणतात. अशा रुग्णांना शेवटपर्यंत ऑक्सिजन बेड मिळत नाही व रुग्ण दगावतो, असेही मांगडे यांनी सांगितले.

प्रशासनाशी संपर्क साधण्यात अडचणी

सर्व वैद्यकीय सेवकांची प्रशासनाला एकच विनंती आहे, आम्ही रुग्ण वाचवण्यासाठी स्वतःच्या जिवावर उदार होण्यास देखील तयार आहोत. पण रुग्णांना सेवा पुरवण्यासाठी ज्या गोष्टी अत्यावश्यक आहेत त्यांची अडचण येणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी. पत्रकारांनी या समस्या प्रशासनासमोर व सामान्य लोकांसमोर मांडाव्यात, जेणेकरुन डॉक्टरांवर व हॉस्पिटल्सवर लोक आरोप करणार नाहीत, असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे. एफडीएकडून इंजेक्शन वितरणाची व्यवस्था कलेक्टर ऑफिसला जात असल्याने अडचणी वाढल्या आहेत, असा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. प्रशासनाशी संपर्क साधण्यात प्रचंड अडचण येत आहे, असेही सांगण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.