भांडुप पश्चिम येथील पाईप्ड नॅचरल गॅस(पीएनजी)वर आधारित असलेल्या सोनापूर स्मशानभूमीत कोविडसह नैसर्गिक मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी येणारा ताण लक्षात घेता, याठिकाणी आणखी एका गॅस भट्टीची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या गॅस भट्टीची व्यवस्था ना महापालिकेने केली, ना देखभाल करणाऱ्या संस्थेने. या स्मशानभूमीमध्ये कोविडमुळे मृत्यू पावलेल्या लोकांवर अंतिम संस्कार करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, तसेच नैसर्गिक मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना करावी लागणारी प्रतीक्षा पाहता भाजप खासदार मनोज कोटक यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ या गॅस भट्टीची उभारणी केली आहे. त्यामुळे या स्मशानभूमीत नैसर्गिक मृत्यू पावलेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्थानिकांना प्रतीक्षा करावी लागणार नाही.
मृतांच्या नातेवाईकांना करावी लागते प्रतीक्षा
भांडुप पश्चिम सोनापूरमधील हिंदू स्मशानभूमी ही भांडुप सेवा मंडळाच्या माध्यमातून चालवली जाते. काही दिवसांपूर्वी या स्मशानभूमीतील महानगर गॅसच्या बिलाचे पैसे महापालिकेने अदा न केल्यामुळे, ही स्मशानभूमी बंद करावी लागेल, अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे एस विभागाचे सहाय्यक आयुक्त विभास आचरेकर यांनी सुवर्णमध्य शोधत विभाग स्तरावरच महानगर गॅस कंपनीचे बिल भरण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, ही स्मशानभूमी पीएनजीवर आधारित असल्याने कोविडमुळे मृत्यू पावलेल्या आसपासच्या रुग्णालयांमधील, तसेच कोविड सेंटरमधील प्रत्येक रुग्णांवर याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येतात. त्यामुळे या स्मशानभूमीवर सध्या मोठा भार आहे. मागील काही दिवसांपासून या स्मशानभूमीत पुन्हा अंत्यसंस्कारासाठी लोकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. मुंबईबाहेरील मृत पावलेल्या रुग्णांवर याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याने, नैसर्गिक मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठीही स्थानिकांची मोठी गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन, ईशान्य मुंबईचे भाजप खासदार मनोज कोटक यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ याठिकाणी आणखी गॅसभट्टी उभारली आहे.
(हेही वाचाः …तरीही त्या परीक्षेत महापालिकाच पास!)
म्हणून केली गॅस भट्टीची उभारणी
मागील वर्षी मे ते डिसेंबर या कालावधीत या एका स्मशानभूमीत ७५० जणांचे अंत्यसंस्कार पार पडले. यामध्ये कोविडमुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ५०० एवढी होती. त्यामुळे स्थानिक जनतेला अंत्यसंस्कारासाठी अनेक तास वाट पाहावी लागत असे. त्यामुळे याठिकाणी अतिरिक्त गॅस भट्टी उभारण्याची गरज होती. त्यातच मला माझ्या आईच्या नावे काहीतरी करायचे होते. त्यामुळे ही गॅस भट्टी मी माझ्या आईच्या नावाने बनवून, स्मशानभूमीची देखभाल करणाऱ्या संस्थेला समर्पित केली, असे कोटक यांनी स्पष्ट केले.
महापालिका भरते बिलाची रक्कम
दहा वर्षांपूर्वी मनोज कोटक यांनी याच स्मशानभूमीच्या नावाने ज्या स्मशानभूमीमध्ये खासगी संस्थांच्या माध्यमातून विद्युतदाहिनी व गॅस दाहिन्या चालवल्या जातात त्यांची बिले माफ करुन महापालिकेनेच त्याची रक्कम भरावी, असा ठराव करुन घेतला. त्यानुसार आता खासगी संस्थांच्या ताब्यातील स्मशानभूमींची वीज व गॅसच्या बिलाची जबाबदारी महापालिकेने स्वीकारली आहे. जर आपण लाकडे मोफत देतो, तर ज्या संस्था विद्युतदाहिनी किंवा गॅस दाहिनी चालवतात, त्यामुळे लाकडांचा जो खर्च वाचतो, तो खर्च म्हणून वीज बिल अथवा गॅस कंपनीचे बिल महापालिकेने भरावे, अशी आग्रही मागणी केली होती. त्यावेळी शिवसेना आणि भाजपची युती असल्याने प्रशासनाकडून याची तात्काळ अंमलबजावणी झाली होती.
Join Our WhatsApp Community