- ऋजुता लुकतुके
भारताचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) दुखापतीतून सावरत असून इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत तिसऱ्या कसोटीपूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल असा अंदाज आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दुसऱ्या सामन्यात ऋतुराजच्या हाताचं बोट मोडलं होतं. त्यानंतर बंगळुरूच्या क्रिकेट अकादमीत तो उपचार घेत आहे.
‘ऋतुराज उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. येत्या आठवडा-१० दिवसांत तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल. इंग्लंड विरुद्ध राजकोट कसोटी १५ ते १९ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. या कसोटीपूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल असा अंदाज आहे. निवडीसाठी तो उपलब्ध असेल,’ असं क्रिकेट अकादमीतील सूत्रांनी टाईम्स वृत्तसमुहाशी बोलताना सांगितलं.
(हेही वाचा – Phd Fellowship : सारथी, बार्टी आणि महाज्योती चा पीएचडी फेलोशीपचा पेपर फुटला; विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार)
ऋतुराजने अलीकडे ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-२० सामन्यात शतक ठोकलं होतं. एकदिवसीय सामन्यांतही भारतीय संघात तो नियमित चेहरा आहे. पण, अजून त्याने कसोटी पदार्पण केलेलं नाही. आणि २६ वर्षीय ऋतुराजला या मालिकेत चांगली संधी आहे.
सध्या रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) या जोडीला निवड समितीची पसंती मिळेल असा अंदाज आहे. आणि शुभमन गिल (Shubman Gill) तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकेल. ऋतुराजच्या अनुपस्थितीत बंगालच्या अभिमन्यू ईश्वरनला संघात संधी मिळू शकते. अभिमन्यू सध्या भारतीय अ संघातील नियमित सलामीवीर आहे. इंग्लिश लायन्स संघाविरुद्धही तो खेळणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community