विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना गट विमा योजना राबवण्याकरिता सर्व कामगार, कर्मचाऱ्यांकडून वैयक्तिक माहिती जाणून घेण्यात येत आहेत. आतापर्यंत केवळ ८२ते ८५ % कर्मचाऱ्यांनी आपली वैयक्तिक माहिती प्रशासनाला सादर केली आहे. मात्र ही माहिती अद्यापही पूर्णपणे प्रशासनाकडे सादर न झाल्यामुळे गट विमा योजनेच्या अंमलबजावणीला प्रत्यक्षात विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. (Medical Group Insurance Scheme)
महापालिका प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, महापालिकेच्या हजेरी पटावरील ९१,४३६ कर्मचाऱ्यांपैकी ७९,७६२ कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वैयक्तिक माहितीचे विवरण पत्र प्रशासनाकडे सादर केले आहे. परंतु ११,६७४ कर्मचाऱ्यांनी अजूनही अशाप्रकारचे विवरण पत्र सादर केलेले नाहीत. अशी वैयक्तीक माहितीची विवरण पत्रे न देणाऱ्या कामगार, कर्मचाऱ्यांमध्ये प्रामुख्याने घन कचरा व्यवस्थापन, उपनगरीय रुग्णालये, शिक्षण खाते, अग्निशमन दल या खात्यातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. वैद्यकीय गट विमा योजना नव्याने सुरू करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांकडून वैयक्तिक माहिती मागवण्यात सुरुवात करत सर्व विभाग आणि खात्यांना ही माहिती भरून घेण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे गटविमा योजना राबवण्यासाठी कर्मचाऱ्यांची माहिती अतिशय महत्त्वाची असून, त्याच्या आधारेच इन्शुरन्स कंपन्यांसोबत वाटाघाटी करून एकूण प्रीमियमची रक्कम ठरवता येणे शक्य होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. (Medical Group Insurance Scheme)
(हेही वाचा – Manoj Saunik मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सल्लागार)
दरम्यान, मंगळवारी ९ जानेवारी २०२४ रोजी सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांच्यासोबत महापालिका कामगार कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय गट विमा योजनेच्या अनुषंगाने कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. सह आयुक्त (सामान्य प्रशासन) यांच्या दालनामध्ये पार पडलेल्या या बैठकीला दि म्युनिसिपल युनियनचे कार्याध्यक्ष सुनील शिंदे, उपाध्यक्ष रंगनाथ सातवसे आणि सरचिटणीस रमाकांत बने आदी उपस्थित होते. या बैठकीत महापालिका प्रशासनाने वैद्यकीय गट विमा योजना राबवण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांचा गोषवारा मांडला. यात अद्यापही ११,६७४ कर्मचाऱ्यांनी अजूनही अशाप्रकारचे विवरण पत्र सादर केले नसल्याची माहिती मिलीन सावंत यांनी दिली. त्यामुळे सर्व उर्वरित कर्मचाऱ्यांनी तातडीने आपली वैयक्तिक माहिती वैद्यकीय गट विमा योजनेसाठी प्रशासनाकडे सादर करणे आवश्यक आहे, जेणेकरून वैद्यकीय गट विमा योजनेचे कार्य तातडीने मार्गाला लागेल. असे आवाहन रमाकांत बने यांनी केले आहे. (Medical Group Insurance Scheme)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community