शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा (MLA Disqualification Case) निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला. तेव्हा त्यांनी शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांनी दाखल केलेल्या आमदार अपात्रतेच्या याचिका फेटाळून लावल्या. यामध्ये एकूण 34 आमदारांचे अपात्र प्रकरण होते. सर्व याचिकांना सहा गटात विभागणी करून राहुल नार्वेकर यांनी आपला निकाल दिला. मात्र कोणत्याही गटातील आमदारांना त्यांनी अपात्र ठरविले नाही. शिंदे यांचा गट अधिकृत असून त्यांचे प्रतोद भरत गोगावले यांनाही त्यांनी मान्यता दिली. मात्र त्यांच्या व्हिपनुसार ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरविले नाहीत.
निकालाचे वाचन केल्यानंतर नार्वेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, माझ्याकडे ज्या याचिका प्रलंबित होत्या त्यावर मी निर्णय दिला आहे. हा निर्णय शाश्वत असा आहे. निकालात प्रत्येक मुद्द्याची कारणे विस्तृतपणे मांडली आहेत. शिंदे गटाच्या प्रतोदालाही आम्ही मान्यता दिली आहे. त्यामुळे त्या प्रतोदाचा व्हिप योग्य असल्याचा निकाल दिला. या निर्णयात सगळ्या कायदेशीर तरतुदींचे पालन केले आहे. आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी (MLA Disqualification Case) काही निकष आहेत. मुळ राजकीय पक्षाचा व्हिपच आपल्याला ग्राह्य धरायला लागतो. तो व्हिप योग्यरित्या दिला गेला आहे का? हेदेखील तपासावे लागते. एकनाथ शिंदे यांच्या गटाचा व्हिप जरी आपण ग्राह्य धरला तरी तो व्हिप योग्यरित्या बजावला गेला आहे का? हे तपासणे गरजेचे होते. माझ्या तपासानंतर लक्षात आले की, भरत गोगावले यांनी दिलेला व्हिप ठाकरे गटाच्या आमदारांना योग्यरित्या बजावला गेला नाही. त्यामुळेच ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र केले नाही.
Join Our WhatsApp Community