राज्यात मार्च महिन्यातच कोरोनाची दुसरी लाट आली आणि या लाटेमुळे पुन्हा लॉकडाऊन लावावा लागला आहे. ही लाट अजून वाढत आहे. त्यामुळे शालेय शिक्षण खात्याच्या मंत्री वर्षा गायकवाड़ यांनी इयत्ता १०वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला, मात्र अजूनही १०वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कसा लावणार, याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही, त्यामुळे लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक संभ्रमावस्थेत आहेत. आता शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचे वर्षभराच्या अभ्यासाचे शैक्षणिक मूल्यांकन करून त्याआधारे निकाल लावण्याचा विचार सुरु केल्याने लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधकारमय बनणार आहे, अशी चर्चा राज्याच्या शैक्षणिक वर्तुळात सुरु झाली आहे.
शिक्षणमंत्र्यांचा निर्णय घिसाडघाईचा?
सध्याच्या प्रचलित शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेनंतर ठरत असते. त्या परीक्षेची तयारी करत असतानाच स्वतःला पुढे कोण व्हायचे आहे, कोणत्या क्षेत्रात जायचे आहे, यासंबंधी विद्यार्थी स्वतःच्या मनाशी खूणगाठ बांधून त्याप्रमाणे अभ्यासाची तयारी करत असतात. यात कुणाला पुढे डॉक्टर, इंजिनियर बनायचे असते ते विद्यार्थी पुढे ११वीसाठी सायन्स शाखेत प्रवेश मिळावा म्हणून एकाग्रतेने अभ्यास करतात, त्या खालोखाल कुणाला सीए अथवा वाणिज्य क्षेत्रात पुढे शिकायचे असेल ते विद्यार्थी कॉमर्समध्ये प्रवेश मिळावा म्हणून चांगल्या टक्क्यांनी पास होण्याकरता दिवस – रात्र अभ्यास करत असतात. अशा प्रकारे विद्यार्थी वर्गात या परीक्षेचे अन्यन साधारण महत्व आहे. मात्र कोरोनाच्या या महामारीने आजवर आधीच घडले नाही ते यंदाच्या वर्षी घडणार आहे. नेमके बोर्डाच्या परीक्षेच्या काळातच देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली असून या लाटेत लाखो जण संक्रमित होत आहेत. अशा वातावरणात मार्च-एप्रिल महिन्यात बोर्डाच्या परीक्षा घेणे संयुक्तिक ठरणार नाही. म्हणून महाराष्ट्र बोर्डाने १०वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर सीबीएसई बोर्डाने १० ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला, त्या पाठोपाठ आयसीएसई या केंद्रीय बोर्डानेही १०ची परीक्षा रद्द केली. मात्र महाराष्ट्र बोर्डाने जेव्हा सुरुवातीला १०वीची परीक्षा रद्द केली होती तेव्हा १०वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कसा लावणार याबाबत काहीही माहिती जाहीर केली नव्हती. या अशा घिसाडघाई आणि नियोजनशून्य पद्धतीने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेऊन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील १७ लाख विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये संभ्रम निर्माण केला होता. त्यानंतर सीबीएसई बोर्डाच्या पॅटर्नप्रमाणे १०वीचा निकाल लावण्याचा सरकारचा विचार करत आहे, असे सांगून शिक्षणमंत्री गायकवाड याची आणखी गोंधळ वाढवला आहे.
सीबीएसई किंवा आयसीएसई बोर्डाला विद्यार्थ्यांचे वर्षभराचे मूल्यांकन करून निकाल लावणे सोपे आहे आणि शिवाय या बोर्डाच्या बहुतेक शाळा १२वी पर्यंत आहेत, त्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे त्रासदायक ठरणार नाही, पण महाराष्ट्र बोर्डाने १७ लाख विद्यार्थ्यांचा परीक्षेविना निकाल लावल्यास ते लाखो गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्यायकारक ठरणार आहे. त्यापेक्षा १०वीची परीक्षा पुढे ढकलून कोरोनाची लाट ओसरताच परीक्षा घेणे योग्य ठरेल.
– अरुंधती चव्हाण, अध्यक्षा, पॅरेण्ट अँड टीचर्स असोसिएशन.
शिक्षणमंत्री गायकवाड यांच्या भूमिकेमुळे निर्माण झालेले प्रश्न!
- सीबीएसई बोर्ड त्यांच्या विद्यार्थ्यांचे वर्षभरातील अभ्यासाचे मूल्यांकन करून त्याप्रमाणे विद्यार्थ्यांचा निकाल लावणार आहे. महाराष्ट्रात मागील वर्षभरातील ९ महिने शाळा बंद होत्या, ऑनलाईन शिक्षण देण्यात आले परंतु ग्रामीण भागात तेही शक्य झाले नाही, अशावेळी किती शाळांनी विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या अभ्यासाचे मूल्यांकन केले असेल?
- सीबीएसई बोर्डाच्या कार्यपद्धतीनुसार विद्यार्थ्यांचे वर्षभरात तिमाही, सहामाही पद्धतीने मूल्यांकन करण्यात येते. कोरोना काळातही या बोर्डाच्या शाळांनी तसे रेकॉर्ड ठेवले आहे. महाराष्ट्रातील किती शाळांनी तसे रेकॉर्ड ठेवले आहे?
- केंद्रीय बोर्डाला १०वीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षेविना निकाल लावणे शक्य आहे, कारण त्यांची विद्यार्थी संख्या संपूर्ण देशात साधारण १०-१२ लाख इतकी आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या १०वीच्या विद्यार्थ्यांची यंदाच्या वर्षाची संख्या १७ लाख आहे. अशावेळी इतक्या मोठ्या संख्येने आणि तेही बहुतांश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षेविना कोणत्या आधारे निकाल जाहीर करणार?
- सध्या राज्यात सायन्स, वाणिज्य आणि कला असा तीन शाखांच्या मिळून ११ लाख ८४ हजार ०३९ इतक्या जागा उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त आयटीआय, डिप्लोमा तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सरासरी १ लाख जागा गृहीत धरल्यात १३ लाख जागा उपलब्ध आहेत. त्या तुलनेत १७ लाख विद्यार्थी यंदाच्या वर्षी १०वीच्या परीक्षेसाठी बसणार आहेत. दरवर्षाप्रमाणे बोर्डाला यासाठी संतुलन राखून निकाल लावणे शक्य होणार आहे का?
- निकाल लावताना ११वीच्या उपलब्ध जागांचा विचार करावा लागणार आहे, अशावेळी विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करताना त्यांचे मूल्यमापन कोणत्या आधारे करणार?
- १७ लाख विद्यार्थ्यांमध्ये अंदाजे ४-५ लाख विद्यार्थी हे हुशार आणि महत्वाकांक्षा बाळगून दिवस-रात्र अभ्यास करत असतात, उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन ११वीसाठी चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्याचे त्यांचे लक्ष्य असते, त्यासाठी अशा विद्यार्थ्यांचे मूल्यमापन परीक्षेतूनच होत असते, त्या विद्यार्थ्यांचे मुल्यमापन कसे करणार?
- त्यात अचूकता कशी आणणार? त्यात चुका झाल्या तर या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही का? त्याला जबाबदार कोण असणार?
(हेही वाचा :आता 10वीची परीक्षाही रद्द… राज्य सरकारचा मोठा निर्णय!)
७० कोटी रुपयांचे काय?
महाराष्ट्र बोर्डाने १०वीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडून ४१५ रुपये परीक्षा शुल्क वसूल केले आहे. बोर्डाकडे आता याचे ७० कोटी जमा झालेले आहे. आता जर महाराष्ट्र बोर्ड १०वीची परीक्षा रद्द करणार असेल, तर वसूल केलेले शुल्क विद्यार्थ्यांना परत करणे अनिवार्य आहे. त्याचे काय नियोजन करण्यात आले आहे? यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी, याबाबतचा निर्णय अजून प्रलंबित आहे, असे म्हटले आहे.
- इयत्ता अकरावीसाठी प्रवेशाच्या जागा – ११ लाख ८४ हजार ०३९
- महाराष्ट्र बोर्डाचे दहावीचे विद्यार्थी – १७ लाख
- सीबीएससी बोर्डाचे विद्यार्थी (महाराष्ट्र) – ७३ हजार
- आयसीएसई बोर्डाचे विद्यार्थी – २३ हजार ३३९