Shri Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठाला चारही शंकराचार्यांचा विरोध आहे का? अखेर पुरीच्या शंकराचार्यांनी केला खुलासा 

श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला अवघे १० दिवस बाकी असताना पुरी शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी अखेर स्पष्ट शब्दांत खुलासा केला.

441
अवघ्या जगाला हेवा वाटावा असे भव्य दिव्य श्रीराम मंदिर (Shri Ram Mandir) अयोध्येत उभारण्यात येत आहेत. या मंदिरात २२ जानेवारी रोजी रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाची घोषणा होताच देशातील चारही शंकराचार्यांचा या कार्यक्रमाला विरोध आहे. ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत, असे वृत्त येऊ लागले. आता या कार्यक्रमाला अवघे १० दिवस बाकी असताना पुरी शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी अखेर स्पष्ट शब्दांत खुलासा केला आहे.

काय म्हणाले शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती? 

आमच्या चारही पीठांच्या शंकराचार्यांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. शास्त्रातील विधीनुसार प्राणप्रतिष्ठा व्हावी, एवढेच आमचे म्हणणे आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती म्हणाले, चार शंकराचार्यांमध्ये राम मंदिराच्या (Shri Ram Mandir) विषयावर मतभेद असल्याचे गैरसमज जाणीवपूर्वक पसरविले जात आहेत. खरेतर आमच्यात कोणतेही गैरसमज नाहीत. आमचे केवळ एकच म्हणणे आहे की, अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना शास्त्रानुसार, विधिवत व्हावी. अन्यथा अनिष्ट शक्ती, भूत-प्रेत-पिशाच्च चारही दिशांना पसरतात आणि सर्व छिन्न-विछिन्न करतात. त्यामुळे शास्त्रसंमत पूजा व्हावी, अशी आमची इच्छा आहे. आमचे चौघांचेही हेच म्हणणे आहे. त्यात कुठलेही मतभेद नाहीत. २२ जानेवारी रोजी मी अयोध्येत जाणार नाही. याचा अर्थ असा नाही की, मी अयोध्येवर नाराज आहे. मी कुणालाही अयोध्येत जाण्यापासून रोखतही नाही, असे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.