विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सहानुभूति मिळवण्याची संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विकास प्रकल्पांमुळे आणि त्यांच्या भाषणाच्या चौफेर फटकेबाजीमुळे गमावल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. थोडक्यात, ठाकरेंच्या सहनुभूतीवर, ‘मोदी करिश्मा’ने कुरघोडी केली.
ठाकरेंची ‘ही’ संधीही हुकली
राहुल नार्वेकर यांनी उबाठा गटाच्या आमदारांना अपात्र न करून जनतेची सहानुभूती मिळवण्याची संधी घेऊ दिली नाही, तरीही शिंदे यांच्यावर टीका करून उबाठाकडून ती घेण्याचा प्रयत्न होताना दिसत होता. मात्र, काल शुक्रवारी सर्वच माध्यमांवर नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सुमारे 30 हजार कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि शिलान्यास ही बातमी चालल्यामुळे ठाकरेंची ही संधीही हुकली.
राम मंदिर ते राष्ट्र मंदिर जोडणारा सेतू
मोदी यांनी आपल्या भाषणात विकासाबरोबरच युवा आणि महिला यांच्याही भावनांना स्पर्श केला. त्याचेही सर्व स्तरातून कौतुक होत आहे. “नाशिकचे काळाराम मंदिर ते नवी मुंबई अटलबिहारी वाजपेयी शिवडी-नाव्हा शेवा अटल सेतू म्हणजेच राम मंदिर ते राष्ट्र मंदिर जोडणारा सेतू,” असे मोदी (PM Narendra Modi) यांच्या दौऱ्याचे वर्णन राजकीय विश्लेषक उदय निरगुडकर यांनी केले.
कामांचा आढावा दिला
“नाशिकला राम मंदिरात जायचं आणि मुंबईत येऊन राष्ट्र मंदिर उभारणीचे नियोजन कसे आहे ते सांगायचे. तसेच त्यांनी नारीशक्तीचे कौतुक केले आणि नारीशक्तीसाठी त्यांचे सरकार काय-काय करते ते सांगायला विसरले नाहीत. तसेच मुंबईसाठी काय केले, पुढे काय करणार यांचा आढावा घेतला. म्हणून त्यांचा हा दौरा म्हणजे राम मंदिर ते राष्ट्र मंदिरला जोडणारा सेतू होता, असेच म्हणता येईल,” असे निरगुडकर यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक स्वप्नील सावरकर यांना दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.
चर्चा फक्त मोदींचीच
“शिवसेना शिंदे यांचीच, असा निकाल विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी दिल्यानंतर ठाकरे यांची पक्षावरील पकड पूर्णपणे सुटली आणि अनेकांनी त्यांना सहानुभूति मिळेल, अशी वक्तव्ये केली. मात्र शुक्रवारी सर्व माध्यमे, नाक्यावर, रेल्वे अशा विविध ठिकाणी चर्चा होती ती फक्त मुंबईच्या विकासाची, काळाराम मंदिरात मोदींनी (PM Narendra Modi) केलेल्या महाआरतीची किंवा त्यांच्या ‘रोड-शो’ची. आणि मोदी यांनी ही जी वेळ निवडली, हा त्यांचा ‘मास्टर स्ट्रोक’ होता, असे म्हणता येईल,” अशी पुष्ती निरगुडकर यांनी जोडली.
Join Our WhatsApp Community