तैवानच्या (Taiwan) सत्ताधारी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे (डीटीपी) नेते लाइ चिंग-ते यांनी शनिवारी, १३ जानेवारी रोजी झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. लाइ चिंग-ते आणि त्यांचा पक्ष डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी हे चीनचे कट्टर विरोधक मानले जातात. चीनने निवडणुकीपूर्वीच लाइ चिंग-ते यांना फुटीरतावादी घोषित केले होते. चीनने तैवानच्या जनतेला स्पष्टपणे सांगितले होते की, जर त्यांना लष्करी संघर्षाची परिस्थिती टाळायची असेल तर त्यांना योग्य पर्याय निवडावा लागेल.
चीनला डोकेदुखी ठरणार
लाइ चिंग-ते यांच्या विजयासह, त्यांच्या डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीने सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येऊन इतिहास रचला आहे. मात्र, त्यांच्या विजयामुळे चीन आणि तैवानमधील (Taiwan) तणाव वाढण्याची शक्यता आहे. लाइ चिंग-ते व्यतिरिक्त, विरोधी पक्ष कुओमिंतांग (केएमटी) चे हौ यू इह आणि तैवान पीपल्स पार्टीचे को वेन जी यांच्यात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत लढत होती. केएमटी हा चीन समर्थित पक्ष मानला जातो. हौ यू इह हे राजकारणात येण्यापूर्वी पोलिस दलाचे प्रमुख होते. निवडणूक जिंकल्यास देशाची सुरक्षा आणखी मजबूत करू आणि चीनशी संबंध सुधारण्याचा आग्रह धरू, असे आश्वासन केएमटीच्या हौ यांनी दिले होते. त्याचवेळी तैवान पीपल्स पार्टीचे वेन झे हेही निवडणुकीच्या मैदानात होते. २०१९मध्ये त्यांनी तैवान पीपल्स पार्टीची स्थापना केली. निवडणुकीदरम्यान त्यांनी स्वतःला उमेदवार म्हणून सादर केले होते जो चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांशी संबंध वाढवण्याच्या बाजूने आहे.
Join Our WhatsApp Community