माझ्या वडिलांच्या काळातील काँग्रेस आणि आताची काँग्रेस यामध्ये खूप फरक आहे. आज काँग्रेसमध्ये नेतृत्व उरले नाही. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने सकारात्मक, मेरिट आधारित राजकारण केले असते, तर एकनाथ शिंदे आणि मला आज इथे येऊन बसावे लागले नसते, अशा शब्दांत माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी काँग्रेस पक्ष सोडण्यामागील कारण सांगितले.
एकनाथ शिंदे जमिनीवरचे नेते
मी खूप भावूक आहे. मी काँग्रेस पक्ष सोडेन असे कधीच वाटले नव्हते. पण मी माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षाशी असलेले 55 वर्षे जुने नाते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपवत आहे. माझे राजकारण नेहमीच सकारात्मक राहिले आहे. माझी विचारधारा मुंबई, महाराष्ट्र आणि देशातील नागरिकांची सेवा करणे आहे. शिंदे हे मेहनती आणि सर्वांसाठी उपलब्ध असतात. जमिनीवरचे नेते आहेत. जनतेच्या वेदना, आकांक्षा मुख्यमंत्र्यांना माहिती असतात. मुंबई, महाराष्ट्रासाठीची त्यांची दृष्टी खूप मोठी आहे आणि म्हणून त्यांचे हात मला आणखी बळकट करायचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचेही हात शिवसेनेच्या माध्यमातून मला बळकट करायचे आहेत. माझे वडील मुरली देवरा बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं मुंबईचे महापौर झाले. मुरली देवरा आणि एकनाथ शिंदे यांनी आपल्या कारकिर्दीला नगरसेवक म्हणून सुरुवात केली. मुरली देवरा केंद्रीय मंत्री झाले, तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. राजकारणात जनसेवा आणि लोकसेवा महत्वाची आहे, असे मिलिंद देवरा (Milind Deora) म्हणाले.
काँग्रेसला मोदींना विरोध एवढेच माहित
मिलिंद देवरा यांनी रविवारी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी देवरा बोलत होते. मी माझ्या कुटुंबाचे काँग्रेससोबत असलेले ५५ वर्षांचे नाते तोडत आहे. आजच्या काँग्रेसला मोदींना विरोध एवढेच माहिती आहे. शिंदेंचे व मोदी-शहांचे व्हिजन मोठे आहे. मला त्यांचे हात बळकट करायचे आहेत. माझे वडील मुरली देवरांना बाळासाहेब महाराष्ट्राचे जावई म्हणायचे. माझ्यावर चुकीचा आरोप होण्याआधी शिंदेंनी मला प्रवेशाचे आमंत्रण दिले, खासदार होऊन मी मुंबई आणि महाराष्ट्राचा विकास करू शकतो, असे देवरा (Milind Deora) म्हणाले.
Join Our WhatsApp Community