CM Eknath Shinde : मुंबईकर नागरिकांसाठी ‘आरोग्य आपल्या दारी’ संकल्पना राबवणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

231

मुंबई महानगरात मागील सुमारे दोन महिनाभर सखोल स्वच्छता मोहीम राबविल्यामुळे वायू प्रदूषणाचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबरच महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा तसेच स्वच्छता मोहिमेत सहभागी होणारे स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी, समाजसेवी संस्था या सर्वांचे हे सामूहिक यश आहे, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. सार्वजनिक स्वच्छतेबरोबरच आता मुंबईकरांच्या सुदृढ आरोग्यासाठी शासन आपल्या दारी या अभियानाच्या धर्तीवर मुंबई महानगरात ‘आरोग्य आपल्या दारी’ अभियान राबवणार आहे, अशी घोषणा देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी (CM Eknath Shinde) केली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सखोल स्वच्छ‍ता मोहीम अंतर्गत पश्चिम उपनगरांमध्ये होत असलेल्या स्वच्छता कामांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी १४ जानेवारी २०२४, सकाळी ८ ते दुपारी २ या सहा तासांच्या दौ-यात ठिकठिकाणी भेट देवून पाहणी केली, समवेत सक्रिय सहभाग देखील नोंदवला. यानिमित्ताने विविध ठिकाणी स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे दोन परिमंडळ मिळून तीन प्रशासकीय विभाग अर्थात तीन वॉर्डांमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सखोल स्वच्छता मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. परिमंडळ ७ मध्ये आर उत्तर आणि आर दक्षिण, परिमंडळ ४ मध्ये पी उत्तर विभागातील मोहिमेत सहभाग नोंदवतानाच स्वच्छतेच्या कामांची मुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी केली. तसेच, ठिकठिकाणी स्वच्छता कर्मचारी, शालेय विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. स्वच्छतेचे संदेश झळकावणाऱया, तसेच स्वच्छता विषयक घोषणा देणाऱया विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना देखील मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) यांनी प्रोत्साहित केले.

(हेही वाचा CM Eknath Shinde : घरात बसणाऱ्यांना लोक निवडणुकीत साफ करतील; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला)

आर उत्तर विभागातील दहिसर पूर्व येथे शिव वल्लभ छेद रस्त्यावर वाहतूक बेटाची पाणी फवारणीने स्वच्छता करून मुख्यमंत्री महोदयांनी आजच्या मोहिमेचा प्रारंभ केला. त्यानंतर, काही अंतरावर असलेल्या आजी – आजोबा उद्यानात महानगरपालिकेच्या वतीने आयोजित बालचित्रकला स्पर्धेत सहभागी शालेय विदयार्थ्यांची भेट घेवून त्यांना प्रोत्साहित केले. या उद्यानात स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना, मुंबईत ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र उभारावेत. त्यामध्ये आवश्यक ती साधने, साहित्यसामुग्री उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) दिले. यानंतर नॅन्सी कॉलनी बस आगार येथे स्वच्छतेची पाहणी केली.

कांदिवली (पूर्व) ठाकूरगावमधील सिंग इस्टे्ट येथे चौकातील रस्ता जेट स्प्रेच्या सहाय्याने पाणी फवारणी करुन मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वच्छ केला. रस्ते, पदपथ, सार्वजनिक भिंती स्वच्छ करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी याठिकाणी दिले. कांदिवली (पूर्व) वडारपाडा येथील महा आरोग्य शिबिरास भेट देत तेथे रुग्णांसह, वैद्यकीय तज्ज्ञ तसेच नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. पी उत्तर विभागात मालाड (पूर्व) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्ता जेट स्प्रेच्या सहाय्याने पाणी फवारणी करुन स्वच्छ केला. त्यानंतर, आप्पा पाडा येथे कबड्डी महर्षी कै. बुवा साळवी मैदानाजवळ आपला दवाखाना लोकार्पण, लघू अग्निशमन केंद्र लोकार्पण, शारदाबाई गोविंद पवार उद्यान विकास व सुशोभीकरण कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले.

ठिकठिकाणी स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की, केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्राला राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते प्रथम पारितोषिक प्रदान करुन नुकतेच गौरवण्यात आले आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. स्वच्छ, सुंदर, हरित, निरोगी आणि प्रदूषणमुक्त मुंबईसाठी आपण मागील सुमारे दोन महिन्यांपासून सखोल स्वच्छता मोहीम (डीप क्लिन ड्राइव्ह) राबवत आहोत. महानगरपालिकेची यंत्रणा अविरतपणे ही मोहीम राबवित आहे. लहान मोठे असे सर्वच रस्ते, चौक, पदपथ, गल्ली-बोळ, पायवाटा पाण्याने धुवून स्वच्छ केल्या जात आहेत. सार्वजनिक प्रसाधनगृह दिवसातून पाचवेळा धुवून निर्जंतुकीकरण केले जात आहे. पदपथांची डागडुजी करुन सार्वजनिक भिंती रंगविल्या जात आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘अर्बन फॉरेस्ट’ अधिकाधिक संख्येने तयार करण्याचे त्याचप्रमाणे, प्राणवायू अर्थात ऑक्सिजन मुबलक प्रमाणावर देणा-या बांबूची शक्य तितक्या ठिकाणी लागवड करण्याचे निर्देश दिले आहेत. स्वच्छतेची लोकचळवळ आता संपूर्ण महाराष्ट्रात कानाकोपऱयात नेण्यात येणार आहे. त्याद्वारे मोठे परिवर्तन महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये घडताना आढळत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

पुढे त्यांनी सांगितले की, सार्वजनिक स्वच्छतेबरोबरच मुंबईकरांच्या सुदृढ आरोग्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये ‘झिरो प्रिस्क्रिप्श’ धोरण लागू करण्यात येत आहे. त्यापुढे जावून आता महानगरपालिकेच्या माध्यमातून ‘आरोग्य आपल्या दारी’ हा उपक्रम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महापालिकेचे आरोग्य कर्मचारी मुंबईतील प्रत्येक घरी जाऊन आरोग्य तपासणी करतील. आवश्यक वैदयकीय तपासण्या आणि पुढील उपचारासाठी मार्गदर्शन देखील करतील. महानगरपालिकेच्या‍ रूग्णालयांमध्ये ज्येष्ठांसाठी स्वतंत्र विभाग असावेत, ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभे राहून प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी तजवीज करा, असे निर्देशदेखील मुख्यमंत्री महोदयांनी दिले.

आपला दवाखाना, अग्निशमन केंद्राचे लोकार्पण, उद्यान सुशोभीकरणाचा शुभारंभ

पी उत्तर विभागात, मालाड (पूर्व) मधील आप्पा पाडा येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. कबड्डी महर्षी कै. बुवा साळवी मैदानात स्थित या आपला दवाखान्याचा लाभ आनंद वाडी, लक्ष्मण नगर, सिद्धार्थ नगर आदी परिसर मिळून सुमारे २५ ते ३० हजार नागरिकांना होणार आहे. या आपल्या दवाखान्याला म. वा. देसाई महानगरपालिका रुग्णालयाची संदर्भित सेवा मिळणार आहे. बुवा साळवी मैदानाच्या शेजारी नव्याने सुरु झालेल्या लघू अग्निशमन केंद्राचे लोकार्पण देखील मुख्यमंत्री महोदयांनी केले.

बुवा साळवी मैदानाला लागूनच असलेल्या शारदाबाई गोविंद पवार उद्यानाचा विकास करुन पार्क व उद्यान तसेच अनुषांगिक सेवा निर्मित करण्यात येत आहे. या सुशोभीकरणाच्या कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री  शिंदे यांच्या हस्ते करुन कामांचा प्रारंभ करण्यात आला. सुमारे ५ एकर क्षेत्रफळाच्या या जागेवर जॉगिंग ट्रॅक, ध्यानधारणा/विपश्यना/सांस्कृतिक सभागृह, मुलांना खेळण्यासाठी कृत्रिम हिरवळ असलेली जागा, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जागा, व्ह्यूइंग गॅलरी, ज्येष्ठ नागरिकांसाठी जागा, कबड्डी-कुस्ती क्रीडा क्षेत्र व खुली व्यायामशाळा, सुशोभीत फुलांची रोपं व हिरवळ, एलईडी दिवे, सुरक्षारक्षक दालन, प्रसाधनगृह अशा वैविध्यपूर्ण सेवा या उद्यानामध्ये आता पुरवल्या जाणार आहेत. पावसाचे पाणी पुनर्भरणाची सोय देखील उद्यानाच्या कामांमध्ये समाविष्ट आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.