शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी (MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १० जानेवारी रोजी निकाल दिला. या निर्णयामध्ये ठाकरे आणि शिंदे गटातील आमदार यांना पात्र ठरवण्यात आले आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांनी खरी शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता दिली आहे. त्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला आहे. त्यांनी नार्वेकरांच्या निकालाविरोधात कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. तर शिंदे गटानेही विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचा निकाल दिला. तसेच शिंदे गटातील आमदारांना पात्र ठरवले. त्याचबरोबर नार्वेकर यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटातील आमदारांनाही पात्र ठरवले आहे. आता शिंदे गटाने नार्वेकरांच्या याच निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. शिंदे गटाने मागणी केली आहे की, शिवसेनेच्या ठाकरे गटातील १४ आमदारांना अपात्र ठरवावे. यासंबंधी त्यांनी याचिका दाखल केली आहे.