अयोध्येतील राम मंदिर सोहळ्यानिमित्त देशभरात राममय वातावरण पाहायला मिळत आहे. अखंड रामनाम, राम मंदिरासाठी विविध वस्तू, पणत्या लावणे, रांगोळी काढणे…असे सर्वत्र उत्साहाचे वातावरण असतानाच भारतीय डाक विभागाने (Indian Postal Department) अनोखी संकल्पना साकारली आहे.
भारतीय डाक विभागाने (Indian Postal Department) पवित्र रामायणावर आधारित पोस्टाच्या तिकिटांचे प्रकाशन २२ सप्टेंबर २०१७ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्ये हस्ते वाराणसीतील तुलसी आश्रम मंदिरात केले होते. या तिकिटांवर रामायणातील निवडक ११ प्रसंग साकारले आहेत. यात राम-सीता स्वयंवर, राम वनवास, केवट संवाद, भरत भेट, श्रीरामाने शबरीकडून उष्टे बोर खाणे, सीतादेवीच्या शोधात जटायूशी भेट, रावणाशी युद्धासाठी लंकामध्ये जाण्याकरिता समुद्रावर सेतू तयार करणे, अशोक वाटिकेमध्ये माता सीतेला श्रीरामाचा संदेश पोहोचविणारा हनुमान, लक्ष्मणाला वाचविण्यासाठी हनुमानाने संजीवनी बुटी आणण्याचा प्रसंग, रावण वध व श्रीरामाचा राज्याभिषेक…अशी चित्रे बघायला मिळतील.
अवघ्या ६५ रुपयांत ११ तिकिटांचा संच
भारतीय डाक विभागाने ३ लाख मिनियेचर प्रिंटेड शीट्स (११ तिकिटांचे एक शीट) व ७ लाख मुद्रित शीटलेट्स (तिकीट) प्रकाशित केले होते व अल्पावधीत त्यांची विक्री झाली होती. अवघ्या ६५ रुपयांत ११ तिकिटांचा संच मिळत होता. यास प्रथम दिवस आवरण/ विवरणिका असे म्हटले जाते. प्रासंगिक असल्याने त्यानंतर या तिकिटे व पाकिटांची छपाई करण्यात आली नाही.
दुर्मिळ तिकिटे पुनर्प्रकाशित नाहीत…
या तिकिटांचे संग्राहक सुधीर कोर्टीकर यांनी सांगितले की, ‘मला पोस्टाचे तिकिट जमा करण्याचा छंद आहे. भारतीय डाक विभागाने प्रसंगानुसार, एकदाच असे तिकिट प्रकाशित करत असते. त्यामुळे ही तिकिटे दुर्मिळ असून पोस्टाने ही तिकिटे पुनर्प्रकाशित केली नाहीत.’
Join Our WhatsApp Community