‘प्राणवायू’शिवाय चालते भायखळ्याचे कोविड सेंटर!

महापालिका एका बाजुला महालक्ष्मी, कांजूरमार्ग, सोमय्या मैदान आणि मालाड याठिकाणी नवीन केंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु दुसरीकडे जे केंद्र सुरु आहेत, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे.

153

मुंबईमध्ये सध्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी ऑक्सिजन आणि आयसीयू बेडची मागणी होत असल्याने महापालिका प्रशासन विद्यमान केंद्रांमध्ये ही सुविधा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच अशाप्रकारच्या सुविधांसाठी नवीन केंद्र उभारणी करत आहे. परंतु हा सर्व खटाटोप सुरु असताना भायखळा येथील रिचर्डसन अँड क्रुडास कंपनीच्या परिसरात उभारण्यात आलेल्या एक हजार खाटांची क्षमता असलेल्या कोविड सेंटरमध्ये ना ऑक्सिजन खाटांची सुविधा आहे ना आयसीयूची सुविधा आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतील रुग्णांना या कोविड सेंटरचा लाभ होत नसून प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे महापालिकेच्या नायर, कस्तुरबा, वरळी एनएससीआय डोमसह इतर खासगी कोविड रुग्णालयांवरील भार वाढू लागला आहे.

मुंबई महापालिकेने कोविड सेंटरची एवढी मोठी फॅसिलिटी बनवली आहे. त्यासाठी आपण भाडे मोजत आहे. त्याठिकाणी आपली वॉररुम आहे. किचन आहे. आता एवढी मोठी लाट आल्याने त्याासाठी महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेवर नवीन सेंटर बनवायला निघालो आहोत. पण जे भायखळा येथील सेंटर जे पहिल्यापासून बनलेले आणि त्याठिकाणी अधिक पैसे खर्च न करता आपण त्वरीत सुविधा उपलब्ध करून देवू शकतो, तिथे मात्र दुर्लक् केले जात आहे. सध्या या केंद्रात ना ऑक्सिजन बेड ना आयसीयू बेड. जे १८ ऑक्सिजन बेड आहेत त्याचा उपयोगही नाही. त्यामुळे प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव यामाध्यमातून समोर येत आहे.
–  रईस शेख, गटनेता व आमदार, समाजवादी पक्ष, मुंबई महापालिका

१ हजार खाटांचे कोविड सेंटर!

महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिलेल्या निर्देशांनुसार आणि मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात हे १ हजार खाटांच्या कोविड सेंटरचे काम अवघ्या १५ दिवसांमध्ये ई विभागाचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर यांच्या नेतृत्वाखाली विभागातील त्यांच्या टिमने केले होते. सुरुवातीला याठिकाणी एक हजार खाटांपैकी ३०० खाटा या ऑक्सिजनच्या करण्याचे प्रस्तावित होते. त्यासाठी याठिकाणी ५० डॉक्टर्स, १०० नर्सेस, १५० वॉर्डबॉय व इतर वैद्यकीय कर्मचारी अशा एकूण ३०० कर्मचाऱ्यांची टिम तैनात करण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतरही येथील खाटांची क्षमता तेवढीच असली, तरी सध्या ज्याप्रकारे रुग्णांची मागणी होत आहे, त्याप्रकारे ऑक्सिजन बेडच्या खाटांचे प्रमाण वाढवण्यात आली नाही.

New Project 11

(हेही वाचा : कोरोनाचा डबल म्युटेंट, त्याची लक्षणे, उपचार पद्धती कोणती? विचारा प्रश्न थेट तज्ज्ञ डॉक्टरांना!)

महापालिका नवीन केंद्राच्या निर्मितीत दंग, पण चालू केंद्रांकडे दुर्लक्ष

या केंद्रात सध्या सौम्य लक्षणे असलेल्या आणि देशाबाहेरील विमान सेवेने मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना याठिकाणी क्वारंटाईन केले जात आहे. मात्र, विभागातील मध्यम स्वरुपाची लक्षणे असलेल्या किंवा ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांनाही याठिकाणी दाखल करून घेतले जात नाही. त्यामुळे यापूर्वी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी या ठिकाणी भेट देवून आढावा घेतला होता. त्यानंतर समाजवादी पक्षाचे गटनेते व आमदार रईस शेख यांनीही भेट दिली. तसेच स्थानिक नगरसेविका सोनम मनोज जामतसूतकर या सातत्याने प्रशासनाला भेटून याठिकाणी किमान ५०० ते ६०० बेड हे ऑक्सिजन व आयसीयूचे करावेत अशी मागणी करत आहे. याबाबत आपण दोन वेळा आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांची भेट घेवून ही मागणी केली. कारण हे केंद्र माझ्या विभागात असून विभागातीलच रुग्णाला याठिकाणी दाखल करून घेतले जात नसल्याने नागरीकांचा प्रचंड रोष सहन करावा लागत आहे. जर एवढे मोठे केंद्र असूनही आम्हाला बीकेसी किंवा एनएससीआयला दाखल व्हावे लागत असेल, तर या केंद्राचा उपयोग काय, असा सवाल संतप्त सवाल नागरीकांकडून केला जात आहे. ऑक्सिजन व आयसीयू अभावी रुग्ण मृत्यूमुखी पडत आहेत. त्यामुळे आजची आणि भविष्याची गरज ओळखून किमान ५०० ते ६०० बेड हे ऑक्सिजन व आयसीयूचे बनवण्यात यावे, अशी मागणी केलेली आहे आणि लवकरच ते सुरु होईल, असे आश्वासन महापालिका आयुकत इक्बालसिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले असल्याचे जामसूतकर म्हणाल्या. एका बाजुला प्रशासन महालक्ष्मी, कांजूरमार्ग, सोमय्या मैदान आणि मालाड याठिकाणी नवीन केंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु दुसरीकडे जे केंद्र सुरु आहे, त्याठिकाणी ऑक्सिजन व आयसीयूची सुविधा उपलब्ध करून देत रुग्णांना अतिरिक्त सुविधा देण्याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.