स्वातंत्र्यवीरा तुझी आरती…

छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करायचं होतं, ते सिंधू नदीपासून बंगालच्या सागरापर्यंत आणि सावरकरांनी ‘हिंदू’ या शब्दाची जी अगदी साधी, सोपी पण व्यापक व्याख्या सांगितली आहे त्यातही याच सीमा आहेत.

229

आज २ मे २०२१. शंभर वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू क्रांतिवीर गणेश दामोदर सावरकर यांची अंदमानच्या सेल्युलर कारागृहातून मुक्तता झाली. मुत्युच्या महाभयंकर जबड्यातूनच जणू हे दोघे बंधू बाहेर पडले होते. ‘वीर सावरकर काळेपाणी मुक्ती शताब्दी’ निमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं ‘स्वातंत्र्यवीरा तुझी आरती’ ही शब्दचित्र सुमनांजली अगणित क्रांतिकारक आणि आपल्या वीर जवानांना अर्पण..

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संकल्पनेतील ‘हिंदू’ शब्दाची व्यापक व्याख्या

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं दैवत मानलं होतं. ते म्हणत, मला जाब विचारण्याचा अधिकार जर मी कोणाला दिलाच, तर मी तो केवळ छत्रपती शिवरायांना देईन. सावरकरांनी पूजा बांधली ती शौर्याची, तेजाची आणि म्हणूनच त्यांनी ‘जय देव जय देव जयजय शिवराया’ ही छत्रपती शिवाजी महाराजांची आरती लिहिली, ती समाज प्रबोधनाच्या हेतूने. एखाद्याला देवत्व बहाल केलं, की सारा भार त्याच्यावर टाकून आपण मोकळे होतो, हे सावरकरांना मान्य नव्हतं. आपण शिवरायांकडून काय घ्यायचं तर त्यांच्यासारखा स्वदेशाभिमान, लढाऊ वृत्ती. सावरकरांच्या विचारसरणीवर, कार्यप्रणालीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभाव होता. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करायचं होतं, ते सिंधू नदीपासून बंगालच्या सागरापर्यंत आणि सावरकरांनी ‘हिंदू’ या शब्दाची जी अगदी साधी, सोपी पण व्यापक व्याख्या सांगितली आहे त्यातही याच सीमा आहेत. ते म्हणतात,

आसिंधु सिंधु पर्यंता यस्य भारतभूमिका
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिती स्मृत: ||

म्हणजेच, सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत पसरलेल्या या भारतभूमीला जो पितृभू आणि पुण्यभू मानतो तो हिंदू.

Savarkar Kranti

मराठी भाषेत घुसलेल्या ६८ प्रतिशत परकीय शब्दांना गीर्वाण भाषेत प्रतिशब्द निर्माण करुन शब्दकोश निर्माण करणारे पहिले राजे होते, शिवाजी महाराज. त्याचप्रमाणे मराठी भाषेत घुसलेल्या परकीय शब्दांसाठी प्रतिशब्द निर्माण केले सावरकरांनी. चित्रपट, बोलपट, दिग्दर्शक, कलागृह, छायाचित्रण, बाह्यचित्रण, ध्वनिलेखन, महापौर, हुतात्मा, अणूध्वम, त्रिमितीपट असे अनेक शब्द, ही सावरकरांनी आपल्याला दिलेली देणगी आहे.

स्वदेश रक्षणार्थ समर्थ आरमाराची गरज ओळखून, सुसज्ज नौदल उभारणारे पहिले नृपवर होते छत्रपती शिवराय. सावरकरांना जेव्हा अंदमानचं प्रथम दर्शन झालं, तेव्हा ५० वर्षांचा अंधकारमय कारावास सेल्युलर जेलच्या रुपानं त्यांच्यापुढे उभा ठाकला. पण या भव्य-भीषण भविष्याची तमा न बाळगता, हा द्रष्टा शिवभक्त बघत होता भावी हिंदुस्थानची स्वप्नचित्रं. त्यांना दिसत होता, भारताच्या रक्षणासाठी सुसज्ज असलेला अंदमानच्या सिंधुदुर्गातला नौसेना तळ! तिथे पहारा देणाऱ्या स्वतंत्र भारताच्या अद्ययावत लढाऊ नौका! सावरकरांचं ते स्वप्न केव्हाच प्रत्यक्षात उतरलं आहे. हिंदुस्थानच्या सुरक्षेसाठी आपलं नौदल आज अंदमानच्या सागरतटी सज्ज आहे.

5 1

हिंदुस्थानवर राज्य करणाऱ्या दिल्लीच्या बादशहाचा कारभार पहावा, त्यांचं राज्य खिळखिळं करावं म्हणून छत्रपती शिवराय दिल्लीला गेले. तसेच इंग्रजांना धूळ कशी चारता येईल ते पहाण्यासाठी सावरकर ‘शत्रूच्या शिबिरात’ लंडनला गेले. औरंगजेबाच्या मगरमिठीतून सुटण्याचा प्रयत्न शिवबांनी केला आणि त्यात ते यशस्वीही झाले. तसाच ब्रिटीशांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न सावरकरांनी केला, अथांग सागरात उडी घेऊन. त्यांचा तो प्रयत्न अयशस्वी झाला असला, तरी भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा त्यांचा उद्देश मात्र सफल झाला.

सांगलीचे श्रीनिवास शिंदगी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची आरती लिहिली. ही आरती आहे, स्वातंत्र्यवीरांच्या गुणांचं स्मरण. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांना दैवत मानणारे अनेक आहेत. पण त्यांना देवत्व बहाल करुन आपण निवांत बसून चालणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर, अगणित क्रांतिकारक आणि आपल्या वीर जवानांनी प्रेम केलं, ते आपल्या देशावर. आजच्या घडीला आवश्यकता आहे त्या देशप्रेमाची; आपल्या राष्ट्राचा, आपल्या राष्ट्रध्वजाचा, आपल्या राष्ट्रगीताचा सन्मान करण्याची. वेळप्रसंगी देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची आणि एक भारतीय म्हणून एकजुटीनं उभं राहण्याची.

 

गीत: स्वातंत्र्यवीरा तुझी आरती…
गीतकार: श्रीनिवास शिंदगी
संगीतकार: वर्षा भावे
गायिका: आर्या आंबेकर
संगीत संयोजन: कमलेश भडकमकर
संकल्पना: रणजित सावरकर, मंजिरी मराठे
ध्वनिचित्र संकलन: दिनेश भात्रे, सतीश गरुड

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्यप्रतिभेवर आधारित ‘तेजोमय तेजोनिधी’ या कार्यक्रमासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं ‘स्वातंत्र्यवीरा तुझी आरती’ या गीताची निर्मिती करण्यात आली. ‘तेजोमय तेजोनिधी’ हा प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना धनश्री आपटे आणि त्यांच्या ‘नृत्यश्री’ या नृत्यशाळेच्या विद्यार्थिनींच्या नृत्याविष्कारानं सजलेला बहारदार कार्यक्रम आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.