अयोध्येतील राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) रामललाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी जगदगुरू रामभद्राचार्य यांच्या 75व्या जन्मदिनानिमित्त अमृत महोत्सव सुरू आहे. बुधवारी, १७ जानेवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी नृत्य सादर करणार आहेत. एकूण 55 कलाकारांचा यात समावेश असेल. हा परफॉर्मन्स रामायण आणि माँ दुर्गा या विशेष थीमवर आधारित असेल. हेमा मालिनी यांनीही एक व्हिडिओ जारी करून ही माहिती दिली आहे.
बडा भक्तमालच्या बगिया येथे होणार कार्यक्रम
या कार्यक्रमासाठी हेमा मालिनी मंगळवार, १६ जानेवारी रोजी संध्याकाळी अयोध्येत पोहोचल्या. राम नगरी येथे पोहोचल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी रामललाचे दर्शन घेतले. बुधवारी हेमा मालिनी बडा भक्तमालच्या बगिया येथील अमृत संध्या कार्यक्रमात सायंकाळी सहा वाजता पोहोचणार आहेत. पहिल्यांदाच हेमा मालिनी त्यांच्या 55 सहकारी कलाकारांसह अयोध्येतील रामायण मंडपममध्ये रामायणावर आधारित छोटे नाटक सादर करणार आहेत. (Ayodhya Ram Mandir)
(हेही वाचा Ayodhya Ram Mandir : १५२८ ते २०२४ अयोध्या श्रीराम मंदिराचा ५०० वर्षांचा संघर्ष)
जगदगुरू पद्मविभूषण रामभद्राचार्य यांच्या कथेपूर्वी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्रीही मंगळवारी कथेला पोहोचले होते, हे विशेष. जगतगुरू पद्मविभूषण रामभद्राचार्य यांचे उत्तराधिकारी आचार्य रामचंद्र दास यांनी सांगितले की, मथुरेच्या खासदार पद्मश्री हेमा मालिनी अमृत महोत्सवादरम्यान प्रथमच अयोध्येतील सार्वजनिक व्यासपीठावर सादरीकरण करणार आहेत. यादरम्यान रामायणावर आधारित लघुनाटिका सादर करण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community