मराठी नाट्य व सिनेसॄष्टीत अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांनी स्वतःच्या हातांनीच स्वतःचं करिअर बर्बाद केलं. मात्र क्रिकेट जगतात विनोद कांबळी (Vinod Kambli) हे खूप मोठं उदाहरण म्हणता येईल. विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर साधारण एकाच वयाचे, त्यांचं क्रिकेट करिअर देखील एकत्रच सुरु झालं, दोघांनाही सुरुवातीला चांगलं यश मिळालं. मात्र सचिन तेंडुलकर जवळजवळ २४ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आणि विनोद कांबळी यशाच्या शिखरावर असताना अचानक गायब झाला.
विनोद गणपत कांबळीचा (Vinod Kambli) जन्म १८ जानेवारी १९७२ रोजी मुंबईत झाला. सेंट झेवियर्स स्कूल, फोर्ट विरुद्ध शालेय क्रिकेट सामन्यात त्याने सचिन तेंडुलकरसोबत ६६४ धावांची जबरदस्त भागीदारी केली. एकट्या कांबळीने ३४९ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने सेंट झेवियर्सच्या पहिल्या डावात ३७ धावांत सहा विकेट घेतल्या.
कांबळीने (Vinod Kambli) त्याच्या आयुष्यातल्या पहिल्या रणजी ट्रॉफिमध्ये पहिल्या चेंडूवर षटकार मारला आणि सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि कसोटी सामन्यांमध्ये देखील त्याने चांगला रेकॉर्ड केला. कसोटीत त्याने दोन द्विशतकांसह चार शतके ठोकली. भारतीय खेळाडूंमध्ये कसोटी सामन्यांत सर्वात वेगवान १००० धावा करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. शेन वॉर्नला देखील त्याने चांगलेच हैराण केले. एका एका षटकात २२ धावा काढून त्याने दाखवून दिले की जगातल्या सर्वोत्कृष्ट बॉलरला तो घाबरत नाही.
पण… पण नंतर अचानक विनोद कांबळी (Vinod Kambli) दिसेनासा झाला. त्याने बर्याचदा सचिनवर टिका केली. मात्र सचिनने कधीच पलटवार केला नाही. सचिन एवढंच म्हणाला की त्याची आणि माझी लाईफस्टाईल वेगळी आहे. कोणतंही यश पचवणं ही खूप मोठी गोष्ट असते. अनेक लोक इथेच फसतात. यश डोक्यावर चढलं तर खूप नुकसान होतं. वाईट सवई, चुकीची संगत आणि बर्याच गोष्टींमुळे अनेकांचं करिअर खराब झालंय. त्यापैकी विनोद कांबळी एक मोठं उदाहरण म्हणावं लागेल. कांबळीकडे प्रचंड कौशल्य होतं. पण सचिनसारखे गुण नव्हते, इतकंच म्हणावं लागेल.
Join Our WhatsApp Community