राज्यात कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जाती संदर्भात आढळून आलेल्या ५४ लाख नोंदीच्या आधारे संबंधित पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यात शिबिरांचे आयोजन करावे. पात्र व्यक्तींना तातडीने जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याची कार्यवाही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी करावी, असे निर्देश महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांनी गुरुवारी (१८ जानेवारी) दिले. (Maratha-Kunbi Certificates)
ज्यांच्या कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा अशा नोंदी आढळून आलेल्या आहेत, त्या संबंधित नागरिकांना पाहण्यासाठी या याद्या सर्व तलाठी यांच्यामार्फत गावस्तरावर मोहीम स्वरुपात प्रसिद्ध करण्यात याव्यात. जेणेकरुन पात्र नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र प्राप्त होण्याकरीता सदर नोंदी या पुरावा म्हणून सादर करता येतील, असे देवरा यांनी सांगितले. (Maratha-Kunbi Certificates)
राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा- कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात संबंधित व्यक्तींनी सक्षम प्राधिकारी यांच्याकडे कुणबी जाती संदर्भात सादर केलेल्या निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी कशी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. (Maratha-Kunbi Certificates)
(हेही वाचा – BMC : शहराच्या पालकमंत्र्यांकडून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धरले जाते वेठीस)
निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीस विविध जिल्ह्यांमध्ये आढळून आलेल्या ५४ लाख कुणबी नोंदी संदर्भात संबंधित पात्र व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र तत्काळ निर्गमित करणे आवश्यक आहे. यासाठी सक्षम प्राधिकारी यांनी महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनूसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २००० तसेच नियम २०१२ तसेच त्याअंतर्गत केलेल्या सुधारणांनुसार जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे देवरा यांनी म्हटले आहे. (Maratha-Kunbi Certificates)
२३ जानेवारी पासून मराठा समाजाचे सर्वेक्षण
दरम्यान, मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी येत्या २३ जानेवारीपासून प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने दिली आहे. राज्यातील मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. (Maratha-Kunbi Certificates)
२० जानेवारीला जिल्हा आणि महानगरपालिका मुख्यालयाच्या ठिकाणी तालुक्याच्या तसेच वॉर्डस्तरीय प्रशिक्षकांना सॉफ़्टवेअर वापरण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येईल. हे प्रशिक्षक २१ आणि २२ जानेवारी रोजी संबंधित तालुक्याच्या, वॉर्डच्या ठिकाणी तालुक्यातील, वॉर्डमधील सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतील. तर २३ जानेवारी पासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम सुरु होईल. हे सर्वेक्षण ३१ जानेवारी २०२४ पूर्वी पूर्ण होणार असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. (Maratha-Kunbi Certificates)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community