२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. (Ram Mandir Ayodhya) या भव्य राममंदिराच्या उभारणीचा प्रवास खडतर होता. बाबरीचे अतिक्रमण मोडून काढताना अनेक कारसेवकांनी आपल्या प्राणांचेही बलीदान दिले आहे. हे भव्य राममंदिर उभे राहण्यासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने प्राण पणाला लावले, अशा १० योद्ध्यांची ओळख…
(हेही वाचा – Transgender : तृतीयपंथीही आत्मनिर्भर… पंतप्रधानांसमोर व्यक्त केली भावना)
रथयात्रेची चळवळ उभी करणारे लालकृष्ण अडवाणी
देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी (LK Advani) यांची रथयात्रा हे राम मंदिर आंदोलनातील सर्वांत मोठे योगदान मानले जाते. या रथयात्रेने चळवळीची मुळे घट्ट होऊ लागली. राममंदिर आंदोलनामुळे समाजातील हिंदूंमध्ये एकता येईल, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मत होते. दुसरीकडे अडवाणी यांचा आंदोलनाला आधीच पाठिंबा होता. २५ सप्टेंबर १९९० रोजी रथासारखे वाहन बनवले आणि अडवाणींची रथयात्रा निघाली. या रथयात्रेने राममंदिरासाठी वातावरणनिर्मिती केली.
आंदोलनात प्राण भरणारे मुरली मनोहर जोशी
अडवाणींनंतर मुरली मनोहर जोशी (Murli Manohar Joshi) हे एकमेव भाजप नेते आहेत, ज्यांनी आंदोलनात उत्साहाने भाग घेतला. कारसेवकांनी अयोध्येतील बाबरीचा ढाचा पाडला, तेव्हा भाजपचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी होते. मुरली मनोहर जोशी यांनी त्या काळात संपूर्ण आंदोलनाचे नियोजन केले. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरीचा ढाचा पाडला, तेव्हा ते घटनास्थळी उपस्थित होते.
राममंदिर बांधेपर्यंत थांबणार नाही-कल्याण सिंह
१९९१-९२ साली रामभक्तांच्या अयोध्येकडे जाणाऱ्या गटाचे नेतृत्व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री कल्याण सिंह (Kalyan Singh) करतील, असे ठरले. वाटेतच अटक होण्याची भीती होती. त्यांना अटक झाली, तर संपूर्ण आंदोलन फसण्याची शक्यता होती. त्यामुळे अखेरच्या क्षणी कल्याण सिंह या यात्रेत सहभागी होणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला. मात्र अयोध्येतील हनुमानगढीजवळ कल्याण सिंह या यात्रेत सहभागी झाले. कल्याण सिंह यांनी लोकांना संबोधित केले. राममंदिर बांधेपर्यंत आपण थांबू नये, असे आवाहन त्यांनी केले. यामुळे लोकांमध्ये उत्साह संचारला.
(हेही वाचा – Deep cleaning Drive : मुंबईतील मंदिरांची २२ जानेवारीपर्यंत स्वच्छता)
कारसेवा गावागावात पोहोचवणारे विनय कटियार
विनय कटियार (Vinay Katiyar) हे राममंदिर आंदोलनातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. १९८४ मध्ये चळवळीसाठी बजरंग दलाची स्थापना झाली, तेव्हा संघाने पहिले अध्यक्ष म्हणून विनय कटियार यांच्याकडे जबाबदारी सोपवली. विनय कटियार यांच्या नेतृत्वाखाली बजरंग दलाने राममंदिर आंदोलनासाठी लोकांना जोडण्यास सुरुवात केली. देशभरातील आखाड्यांद्वारे लोक जोडले गेले.
जहाल भाषणांसाठी प्रसिद्ध असलेल्या उमा भारती
उमा भारती या राममंदिर आंदोलनाच्या महत्त्वाच्या नेत्या होत्या. सध्या त्या सक्रिय राजकारणापासून दूर असल्या तरी ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद कोसळल्यानंतर त्या भाजप नेत्यांसोबत हसत असल्याचे चित्र विसरणे कठीण आहे.
आंदोलनानंतर अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारमध्ये मंत्री राहिल्या. तसेच २००३ ते २००४ या काळात त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले.
चळवळीला नवी धार देणाऱ्या साध्वी ऋतंभरा
उमा भारती यांच्या व्यतिरिक्त साध्वी ऋतंभरा या राममंदिर चळवळीच्या दुसऱ्या महिला फायर ब्रँड नेत्या आहेत. आंदोलनादरम्यान ऋतंभरा यांच्या धगधगत्या भाषणांच्या ऑडिओ कॅसेट्स देशभर गाजल्या. आता ऋतंभरा वृंदावनमध्ये ‘वात्सल्यग्राम’ नावाचा आश्रम चालवतात.
(हेही वाचा – PM Modi Fast : पंतप्रधान मोदी राममंदिरासाठी करत असलेले व्रत काय आहे ?)
राममंदिर आंदोलनाचे मुख्य शिल्पकार अशोक सिंघल
रामजन्मभूमी आंदोलनाला जन्म देणाऱ्या लोकांमध्ये अशोक सिंघल यांचेही नाव घेतले जाते. सिंघल हे २० वर्षे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष होते. १९८४ मध्ये सिंघल यांनी दिल्लीतील विज्ञान भवनात झालेल्या संसदेचे अध्यक्षपद भूषवले. सिंघल यांनी संपूर्ण योजना तयार करून देशभरातून ५० हजार कारसेवक गोळा केले होते. सिंघल यांनी १९९२ मध्ये कारसेवकांचे नेतृत्व केले. आंदोलनादरम्यान त्यांनी राममंदिरासाठी पैसे नव्हे, तर दगड दान करण्यास सांगितले होते.
बाबरीच्या ढाच्यावर भगवा फडकवणारे सख्खे भाऊ राम आणि शरद कोठारी
कोलकाता येथील २ सख्खे भाऊ, २३ वर्षांचे राम कुमार कोठारी आणि २० वर्षांचे शरद कुमार कोठारी १९८० मध्ये बजरंग दलात सामील झाले. ‘आय विटनेस ऑफ अयोध्या’ या पुस्तकात म्हटले आहे की, १० वर्षांनी दोघेही २०० किलोमीटर चालत कारसेवेसाठी अयोध्येत आले.
दोघेही ३० ऑक्टोबर १९९० रोजी कारसेवकांच्या पहिल्या तुकडीचे सदस्य म्हणून सहभागी झाले होते. शरद कोठारी हे घुमटावर चढणारे पहिले व्यक्ती होते. यानंतर त्यांचे भाऊ रामही वर चढले. दोघांनी तेथे भगवा ध्वज फडकावला. यानंतर २ नोव्हेंबर रोजी कारसेवा करत असताना पोलिसांनी दोघांनाही गोळ्या घातल्या. त्यात दोघांचा मृत्यू झाला.
(हेही वाचा – Sewage Channels : भांडुपसह विक्रोळीतील मलवाहिन्यांचे जाळे मजबूत होणार, घरोघरी शौचालय बांधण्याचे स्वप्न होईल साकार)
पडद्याआडून इतिहास रचणारे चंपत राय
राममंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचे मोठे योगदान आहे. बाबरीचा ढाचा पाडण्यापूर्वीच चंपत यांनी राममंदिराशी संबंधित कागदोपत्री पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. हजारो दस्तऐवज त्यांनी वाचले. प्रत्येक धर्मग्रंथ वाचले. त्यांचे संपूर्ण घर राममंदिराशी संबंधित कागदपत्रांनी भरले होते.
आंदोलनाचे फायर ब्रँड नेते प्रवीण तोगडिया
विनय कटियार यांच्या व्यतिरिक्त प्रवीण तोगडिया हे विश्व हिंदू परिषदेशी संबंधित एकमेव नेते होते, जे चळवळीदरम्यान खूप सक्रिय होते. आंदोलनाच्या काळात प्रवीण तोगडिया यांच्या सभांना त्यांची भाषणे ऐकण्यासाठी हजारो जनसमुदाय जमत असे. चळवळीसाठी लोकांमध्ये उत्साह निर्माण करण्यात त्यांचे मोठे योगदान मानले जाते. (Ram Mandir Ayodhya)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community