वीर सावरकर काळेपाणी मुक्ती शताब्दी – स्मरण स्वातंत्र्यवीरांचे, जागर हिंदुत्वाचा

१९४७ मध्ये आपला भूगोल बदलला, आता तो पुन्हा एकदा बदलण्याच्या वाटेवर आहे. प्रत्येकवेळी कोणी शिवाजी महाराज अवतरतील, कोणी विनायक अवतरतील आणि आम्हाला वाचवतील ही अपेक्षाच का ठेवायची. हिंदुंनो आता तरी जागे व्हा हे सांगण्यासाठीच ‘वीर सावरकर काळेपाणी मुक्ती शताब्दी’च्या निमित्तानं स्वातंत्र्यवीरांच्या कार्याचं स्मरण करायचं आहे, ‘जागर हिंदुत्वाचा’ करायचा आहे.

210

अंदमानच्या सेल्युलर कारागृहाचा १९११ मध्ये बंद झालेला दरवाजा दहा वर्षांनंतर पुन्हा करकरला. आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अनंत यातना सोसून एक विजयी वीर, ‘एक देव, एक देश, एक आशा, एक जाती, एक जीव, एक भाषा’ हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन २ मे १९२१ यादिवशी अंदमानच्या कराल कारागृहातून मुक्त झाला. ते विजयी वीर म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. स्वातंत्र्यवीरांबरोबर होते त्यांचे जेष्ठ बंधू क्रांतिवीर गणेश उपाख्य बाबाराव सावरकर. बाबारावांनी तर अकरा वर्ष त्या नरकयातना भोगल्या होत्या.

अर्थात सेल्युलर कारागृहातून मुक्तता हा केवळ एक टप्पा होता. अंदमानातून सावरकर बंधुंना समुद्रमार्गे कोलकत्याला नेऊन अलीपूरच्या कारागृहात ठेवण्यात आलं. सेल्युलर कारागृहात दोघा भावांची निदान दृष्टीभेट तरी होत होती, कधी चार वाक्य बोलता येत होती. पण आता मुख्य भारतभूमीवर आल्यावर, दोघांना एका कारागृहात काही ठेवणार नाहीत त्यामुळे आपल्या बंधुंची आणि आपली कायमची ताटातूट होणार अशी आशंका स्वातंत्र्यवीरांच्या मनात येत होती आणि तसंच घडलं.

बाबाराव सावरकरांना विजापूरच्या कारागृहात डांबण्यात आलं. त्यांना चिटपाखरूही दिसणार नाही अशा एकांत कोठडीत डांबण्यात येऊन धान्य दळायचं काम देण्यात आलं. अंदमानातल्या हालअपेष्टांनी मुळात बाबारावांची प्रकृती तोळामासा झाली होती, पण त्यांना ना कामातून सुटका मिळाली, ना त्यांच्यावर औषधोपचार झाले. त्यांना भेटायला गेलेले त्यांचे धाकटे बंधू नारायणराव सावरकरांना बाबांना पाहून धक्काच बसला. त्यांनी बाबारावांवरच्या अन्यायाला वाचा फोडली आणि बाबांना साबरमतीच्या कारागृहात डांबण्यात आलं. तिथल्या नऊ महिन्यांच्या वास्तव्यात बाबांना देशात सुरु असलेली खिलाफत चळवळ, असहकार चळवळ, गांधी- अमानुल्ला कट अर्थात अफगाण स्वारीचे कारस्थान, गांधी-नेहरूंची विचारसरणी, गांधीवाद्यांच्या अहिंसेचा अतिरेक अशा अनेक गोष्टी समजल्या. त्यानंतर मात्र त्यांनी गांधी- अमानुल्ला कटाविषयी जनजागृती करण्याचा विडाच उचलला.

(हेही वाचा : वीर सावरकर कालापानी मुक्ति शताब्दी : २ ते १६ मे दरम्यान ऑनलाइन व्याख्यानमाला)

साबरमती कारागृहात बाबारावांची प्रकृती अतिशय ढासळली. नारायणरावांपर्यंत ही बातमी पोहोचताच त्यांनी बरीच धडपड केल्यावर सिव्हील सर्जनने बाबांना तपासलं आणि ते आता काहीच काळाचेच सोबती असल्याचं सांगितलं. शेवटी ते कारागृहातच दगावले तर, या भीतीने इंग्रजांनी बाबारावांना सप्टेंबर १९२२ मध्ये पूर्णपणे मुक्त केलं. त्यांचं शरीर रोगानं पूर्णपणे पोखरलं होतं तरीसुद्धा बाबांनी शेवटच्या श्वासापर्यंत हिंदुत्वाच्या उत्थापनासाठी आपला देह झिजवला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उभारणीत त्यांचा मोलाचा सहभाग होता. त्यांनी ‘राष्ट्रमीमांसा व हिंदुस्थानचे राष्ट्रस्वरूप’, ‘हिंदुराष्ट्र – पूर्वी, आता नि पुढे’, ‘ख्रिस्तपरिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व’ अशी मौलिक साहित्य निर्मितीही केली. कारावासातून मुक्तता झाली तरीसुद्धा ते राष्ट्रहितार्थच झटले. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्यांनी क्रांतियज्ञात उडी घेतली होती पण स्वातंत्र्य मिळाल्याचं पाहणं मात्र त्यांच्या नशिबी नव्हतं. त्यांनी १६ मार्च १९४५ ला आपला देह ठेवला.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना अलीपूरहून आणून रत्नागिरीच्या कारागृहात डांबण्यात आलं. सेल्युलर कारागृहातली कोठडी साडे तेरा X साडे सात फूट तरी होती, पण रत्नागिरीच्या कारागृहातली कोठडी होती सहा X आठ फुटांची. त्या कोठडीत सावरकरांनी काढली सव्वा दोन वर्ष.

3 2

तिथं येण्यापूर्वी कारागृहाबाहेर राहून जे काम करायचं होतं तेच काम वीर सावरकरांनी अंदमानच्या कारागृहात केलं. अशिक्षित बंदीवानांना शिकवलं, त्यांच्यासाठी ग्रंथालय निर्माण केलं, हिंदुंचं जबरदस्तीनं होणारं धर्मांतर रोखलं, धर्मांतरण झालेल्यांची शुद्धी केली. सावरकरांच्याच प्रयत्नानं हिंदी ही अंदमानची संपर्क भाषा झाली झाली आणि पुढे आपली राष्ट्रभाषा. अंदमानातल्या छळाला कंटाळून अनेक क्रांतिकारकांना वेड लागलं, अनेकांनी आत्महत्या केली, अनेकजण आत्महत्या करण्याच्या मार्गावर होते. सावरकरांच्याही मनातही आत्महत्येचा विचार आला पण निग्रहानं त्यावर मत करून ते स्वत: तर त्यातून बाहेर पडलेच, पण त्यांनी इतर बंदीवानांचंही मनोधैर्य वाढवलं.

सेल्युलर कारागृहात बंदीवानांना सायंकाळी पाच ते सकाळी पाच वाजेपर्यंत कोठडीत बंद केलं जात असे, त्या काळात त्यांना नैसर्गिक विधींनासुद्धा बंदी होती. तिथल्या कदान्नामुळे बहुतेकांचं पोट बिघडत असे आणि तग धरणं असह्य झालं की शेवटी मलमूत्रविसर्जनासाठी कोठडीचाच वापर करावा लागत असे, त्यासाठी पुन्हा शिक्षा, शिवीगाळ, असं ते दुष्टचक्र होतं.
रत्नागिरी कारागृहातली व्यवस्था त्याहूनही भीषण होती. संडासात आठ दहा जणांना एकमेकांना खेटून बसवलं जात असे आणि स्वच्छतेसाठी दूरवरच्या नळावर जावं लागत असे. या अत्यंत हिडीस, निर्दयी व्यवस्थेविरुद्ध सावरकरांनी आवाज उठवला. त्यामुळे थोड्याफार सुधारणा घडून आल्या. जे कार्य त्यांनी सेल्युलर कारागृहात केलं तेच त्यांनी रत्नागिरीतही केलं.

असहकार आणि खिलाफत या दोन्ही चळवळींचे वृत्त सावरकरांना अंदमानात असूनही लक्ष ठेऊन होते आणि तेव्हाच त्यांनी ‘खिलाफत नाही, ही तर आफत आहे’ हे भविष्य वर्तवले होते.

महायुद्धाच्या आरंभी ब्रिटीशांनी मुस्लिमांना मोठी आश्वासने देऊन त्यांना त्यांच्याच धर्मबंधुंविरुद्ध म्हणजे तुर्कस्तानविरुद्ध लढत ठेवलं, युध्द संपताच ब्रिटीश आपला शब्द विसरले. त्यामुळे हिंदी मुसलमान संतप्त झाले आणि खिलाफत चळवळीची बीजं रोवली गेली.

4 1

 

केमाल पाशाच्या नेतृत्वाखाली तुर्कस्तानच्या खलिफाला पदभ्रष्ट करण्यात आलं. तिथली जनताच केमाल पाशाच्या मागे उभी होती. पण भारतीय मुसलमानांना मात्र खलिफाला पुन्हा गादीवर बसवायचं होतं. खरंतर जगभरातले मुसलमान याबाबत अवाक्षर काढत नसताना भारतीय मुसलमानांनी त्यात नाक खुपसण्याचं काहीच कारण नव्हतं. पण पॅन इस्लाम हेच ध्येय ठरवलेल्या भारतातील मुस्लीम नेत्यांनी आंदोलन सुरु केलं. गांधी त्यांच्याबरोबर उभे ठाकले आणि खिलाफत चळवळीची सुरुवात झाली. त्या चळवळीचा आणि भारतीय स्वातंत्र्याचा काहीही संबंध नव्हता. हिंदुंचा सहभाग मिळावा म्हणून भारताच्या स्वातंत्र्याची मागणी त्यात घुसडण्यात आली आणि असहकार आंदोलन असं गोंडस नाव देण्यात आलं.

सावरकर रत्नागिरीत पोहोचले त्याच सुमारास, ऑगस्ट १९२१ मध्ये खिलाफत चळवळीचे पर्यवसान मोपल्यांच्या बंडात झाले. त्यात सहस्रावधी हिंदुंची कत्तल झाली, स्त्रियांची अब्रू लुटण्यात आली, हिंदुंचं जबरदस्तीनं धर्मांतर करण्यात आलं. ब्रिटीशांनी बळाचा वापर करून हे बंड मोडून काढलं. त्यात ठार झालेल्या मोपल्यांचा गौरव गांधींनी मात्र ‘हुतात्मा मोपला बंधू’ असा केला. अफगाणिस्तानच्या अमीर अमानुल्लाशीच करार करण्याचं ठरवून तर गांधींनी कहरच केला. ब्रिटीशांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी गांधींनी अमानुल्लाला हिंदुस्थानवर, आपल्याच देशावर स्वारी करण्याचं आवतण दिलं. अमानुल्ला आपल्यावर स्वारी करेल, इथले मुसलमान लुटालूट करतील, शक्तीकेंद्र ताब्यात घेतील आणि हिंदू असहकार पुकारून राज्य यंत्रणा मोडतील आणि मग ब्रिटीशांचं राज्य संपुष्टात येईल अशा गांधींच्या ‘रम्य कल्पना’ होत्या. क्रांतिकारकांना ‘अतिरेकी’ म्हणणाऱ्या गांधींना परक्या देशाचा अमीर आपल्यावरच चाल करून आलेला चालणार होता. या संपूर्ण विषयाचं गांभीर्य ओळखून सावरकरांना हिंदू संघटन आवश्यक वाटू लागलं.

2 5

मुस्लीम धर्मवेड भडकवणारा गांधीवाद; मुस्लिमांच्या मागण्यांपुढे लोटांगण घालणारे गांधी, नेहरू आणि काँग्रेस; अंदमानात मुस्लीम जमादार, वॉर्डर यांचा घेतलेला अनुभव; हिंदुंचं होणारं सक्तीचं धर्मांतर यातून त्यांच्या मनात साकार होत गेलेल्या ‘हिंदू म्हणजे कोण ?’ या विचाराला त्यांनी शब्दरूप दिलं आणि रत्नागिरी कारागृहातल्या त्या टीचभर कोठडीत साकारला महान ग्रंथ – ‘हिंदुत्व’. जातीपाती, विविध पंथात विखुरलेल्या हिंदुंना सावरकरांनी एका धाग्यात गोवण्याचा प्रयत्न केला. आपण एकत्र होऊन कधी शत्रुविरुद्ध उभे ठाकलोच नाही हे इतिहासातलं सत्य ते जाणून होते. त्यामुळेच त्यांनी हिंदू या शब्दाची सर्वसमावेशक व्याख्या केली.
आसिंधु सिंधु पर्यंता यस्य भारतभूमिका
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिती स्मृत: ||
म्हणजे सिंधुनदीपासून सिंधुसागरापर्यंत पसरलेल्या या भारतभूमीला जो पितृभू आणि पुण्यभू मानतो तो हिंदू. या व्याख्येनुसार वैदिक, सनातनी, आर्यसमाजी, लिंगायत, जैन, बौद्ध, शीख आपण सारे हिंदूच. पण सावरकरांचं हे हिंदुत्व कोणी समजून घेतलं नाही किंवा राजकीय स्वार्थासाठी समजलं तरी मान्य केलं नाही कारण सारा हिंदुसमाज एकत्र आला तर राजकारणी काय करतील. फोडा आणि झोडाची राजनीती करणारे ब्रिटीश परके तरी होते पण आज आपलेच, स्वत:विरुद्ध या नीतीचा वापर करत आहेत. सावरकरांनी हिंदुत्व ग्रंथ लिहिला तेव्हा आपल्यात जेवढी दुफळी माजलेली नसेल त्यापेक्षा कितीतरी पटीनं आज आपण एकमेकांपासून दुरावत आहोत, त्यामुळे आज हे हिंदुत्व समजून घेण्याची, सावरकर समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे.

राजकारण नाही साधलं तर समाजकारण तरी करेन अशा स्वच्छ, दूरदर्शी भूमिकेतून सावरकरांनी पाच वर्षांची स्थानबद्धता स्वीकारली. पण ब्रिटीश सावरकरांना इतके घाबरत होते की त्यांनी स्थानबद्धता तेरा वर्षांपर्यंत वाढवली.
या काळात त्यांनी जात्युच्छेदन, अस्पृश्यता – अंधश्रद्धा निर्मुलन, स्वदेशीचा प्रचार यासाठी अफाट कार्य केलं.

एकंदर २७ वर्ष ब्रिटीशांच्या जोखडात राहिलेल्या सावरकरांची १९३७ मध्ये पूर्णपणे मुक्तता झाली. त्यानंतर सावरकरांनी अखंड हिंदुस्थानसाठी लढा उभारला. ‘राजनीतीचं हिंदुकरण आणि हिंदुंचं सैनिकीकरण’ हा त्यांचा नारा होता. ब्रिटीश सैन्यात मुस्लीम सैनिकांची संख्या ६५ प्रतिशत होती. सावरकरांच्या या दूरदृष्टीमुळे ब्रिटीश सैन्यातील हिंदूंची संख्या साठ टक्के झाली. पुढे ब्रिटिशांना हिंदुस्थान सोडून जावं लागलं त्यामागचं महत्वाचं कारण हेही होतं की, सैन्य ब्रिटीशांचं राहिलं नव्हतं, ते हिंदुस्थानी झालं होतं. हे घडलं होतं ते केवळ आणि केवळ स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सैनिकीकरणाच्या प्रचारामुळे. १९४७ मध्ये धर्माच्या आधारावर आपली फाळणी झाली. स्वातंत्र्यानंतर पाकिस्ताननं काश्मिरवर हल्ला केलाच पण हिंदू सैनिकांची संख्या जास्त असल्यामुळेच आपण देश वाचवू शकलो.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेला यामुळेच चाळीस हजारांहून अधिक सैनिक मिळाल्याचं त्यांनी १९४४ मध्ये आझाद हिंद रेडीओवरून केलेल्या आपल्या भाषणात गौरवानं सांगितलं होतं.

1 8

१९४०-४१ दरम्यान वीर सावरकरांनी आसाममधल्या मुस्लिमांच्या वाढत्या संख्येबद्दल हिंदुंना आणि सरकारला जागं करण्याचा प्रयत्न केला. तिथल्या ओसाड जागेत वाढत असलेली मुस्लीम वस्ती पाहून हा भाग पुढे पाकिस्तानला जोडला जाईल असा इशारा त्यांनी नेहरूंना दिला. “निसर्गाला पोकळी आवडत नाही” असं म्हणत नेहरूंनी तिकडे केलेलं दुर्लक्ष आणि हिंदुंची निद्रावस्था यामुळे आज आसाम प्रश्न गंभीर बनला आहे. लडाखमधल्या चीनच्या आक्रमणाबाबतही सावरकरांनी नेहरूंना जागं करण्याचा प्रयत्न केला होता. पण “त्या भूमीवर गवताची काडीही उगवत नाही” असे उद्गार नेहरूंनी काढले. आज ते सगळे प्रश्न गंभीर बनले आहेत. “तिबेट हे बफर स्टेट आहे. ते हातचं घालवू नका” असंही सावरकर सांगत राहिले पण तिकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं आणि आपण तिबेट गमावलं आणि त्यामुळेच आज चीन वरचढ ठरला आहे.
देशाच्या सीमारेषा पक्क्या हव्यात. ‘संपूर्ण काश्मीर दिलंत तरी पाकिस्तानचं समाधान होणार नाही”, या सावरकरांच्या वाक्यातील सत्यता आपण आजही अनुभवतो आहोत.

१०० वर्षांपूर्वीची भारताची परिस्थिती आणि आजची भारताची परिस्थिती सारखीच आहे. त्यावेळी खिलाफत चळवळ, मोपल्यांचं बंड होतं, आता सीएए विरूद्धचं आंदोलन, शेतकरी आंदोलन करून देश, राजधानी दिल्ली सतत पेटती ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत. हजारो मिनी पाकिस्तान देशात तयार होत आहेत. मुस्लिमांची मुजोरी वाढते आहे. जे मुस्लीम या देशाला आपला देश मानतात त्यांच्याबद्दल निश्चितच कोणालाही आक्षेप नाही. पण ज्यांच्या निष्ठा पाकिस्तानशी आहेत, ज्यांना या देशाचे शेकडो तुकडे करायचे आहेत त्यांच्याविरुद्ध संघटित होण्याची नितांत आवश्यकता आहे. आपण स्वातंत्र्य उपभोगत असतो तेव्हा सर्व हिंदू निद्रिस्त असतात, हा इतिहास आपल्याला सांगण्याचा सावरकरांनी सतत प्रयास केला. इतिहास कशाला अभ्यासायचा असं सांगणाऱ्यांची संख्या वाढते आहे. पण इतिहासातून धडे घेतले नाहीत म्हणूनच आपण सतत परतंत्र होत राहिलो. जो देश आपला इतिहास विसरतो त्या देशाचा भूगोल बदलतो हे सावरकरांचं सांगणं समजून घेणं आवश्यक आहे. १९४७ मध्ये आपला भूगोल बदलला, आता तो पुन्हा एकदा बदलण्याच्या वाटेवर आहे. प्रत्येकवेळी कोणी शिवाजी महाराज अवतरतील, कोणी विनायक अवतरतील आणि आम्हाला वाचवतील ही अपेक्षाच का ठेवायची. अजूनही वेळ गेलेली नाही, हिंदुंनो आता तरी जागे व्हा हे सांगण्यासाठीच ‘वीर सावरकर काळेपाणी मुक्ती शताब्दी’च्या निमित्तानं स्मरण करायचं आहे ते स्वातंत्र्यवीरांच्या कार्याचं, करायचा आहे ‘जागर हिंदुत्वाचा’.

कोरोना महामारीमुळे ‘वीर सावरकर काळेपाणी मुक्ती शताब्दी यात्रा’ स्थगित!

२ मे २०२१ या स्वातंत्र्यवीरांच्या अंदमानातून झालेल्या मुक्ततेच्या निमित्ताने जनतेमध्ये त्यांच्या कार्याचे स्फुल्लिंग चेतवण्यासाठी ‘वीर सावरकर काळेपाणी मुक्ती शताब्दी यात्रे’चं आयोजन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं करण्यात आलं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांना अंदमानातून सोडल्यानंतर ज्या मार्गानं हिंदुस्थानात आणण्यात आलं, त्याच मार्गे – कोलकाता ते नागपूर, नागपूर ते मुंबई आणि मुंबई ते रत्नागिरी अशी शताब्दी यात्रा ‘स्वातंत्र्यवीर ज्योती’सह काढण्यात येणार होती. अनेक संघटना, संस्था, व्यक्ती या उपक्रमासाठी जोडल्या गेल्या होत्या. गावोगावी, शहराशहरातून यात्रेचं स्वागत होणार होतं. जागोजागी विविध कार्यक्रम होणार होते. देश हेच सर्वस्व मानणाऱ्या स्वातंत्र्यवीरांनी कायम राष्ट्रहिताचाच विचार केला. सावरकरांच्या त्याच विचारांच्या प्रसार आणि प्रचाराचं कार्य करणाऱ्या सावरकर स्मारकानं, कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राष्ट्रहित आणि समाजहितासाठी ‘वीर सावरकर काळेपाणी मुक्ती शताब्दी यात्रा’ स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. २ मे २०२१ ते १८ मे २०२१ या काळात ‘वीर सावरकर काळेपाणी मुक्ती शताब्दी व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. सावरकर स्मारकाच्या फेसबुक पेजवर सायंकाळी ७ वाजता विविध मान्यवरांची भाषणं होणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.