- सुजित महामूलकर
श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मुंबईतील मलबार हिल भागात श्री राम मंदिराचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून उद्या शनिवारी संध्याकाळपर्यंत ते पूर्ण होईल आणि सोमवारी अयोध्येत राम मूर्तीची प्रतिष्ठापणा आणि प्राणप्रतिष्ठा होत असताना मुंबईतही प्राणप्रतिष्ठा सोहळा होईल. (Raj Bhavan)
सोमवारी मंदिर श्री राम प्राणप्रतिष्ठेसाठी तयार
अयोध्येत श्री रामाच्या मंदिराचे भव्य बांधकाम आणि रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा यात सारा देश भक्तिमय झाला आहे. यानिमित्ताने देशातील अनेक भागात विविध कार्यक्रम, उपक्रम राबवले जात आहेत. राज्य शासनाने तर या सोहळ्याचे टीव्हीवर थेट प्रक्षेपण पाहता यावे यासाठी सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. रावणाने सीतामाईंना हरण केल्यानंतर प्रभू श्री राम काही काळ मुंबईतील वाळकेश्वर भागात वास्तव्यास होते, अशी कथा सांगितली जाते. मुंबईतील याच परिसरातील राजभवनमध्ये श्री रामाचे मंदिर उभे रहात असून, त्याचे बांधकाम जवळपास पूर्ण होत आले आहे. शनिवारी ते पूर्ण होईल आणि सोमवारी मंदिर श्री राम प्राणप्रतिष्ठेसाठी तयार असेल, असे सांगण्यात आले.
मंदिराच्या बांधकामाला ७ जानेवारीपासून सुरुवात…
राजभवनच्या आवारात श्री गुंडी देवीचे पुरातन मंदिर असून या मंदिराच्या शेजारी १०*१० फूट जागेवर आणि साधारण २२ फूट (५ किलो पिटळेच्या कळसासह) उंच अशा नव्या राम मंदिराचे बांधकाम ७ जानेवारीपासून सुरू करण्यात आले आहे. हे बांधकाम राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत (PWD) करण्यात येत असून आजूबाजूच्या परिसराची साफसफाई आणि डागडुजी देखील करण्यात येत आहे.
मंदिराचे वेगळेपण
सध्या अस्तित्वात असलेल्या श्री गुंडी मंदिरात एका चौथऱ्यावर श्री रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार होती, मात्र मंदिरात अगोदरच एक हनुमान मूर्ती असून त्या मूर्तीची ऊंची राममूर्तीपेक्षा जास्त असल्याने वेगळे मंदिर स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंदिराच्या पदाधिकाऱ्यानी सांगितले.
राज्यपालांच्या उपस्थितीत प्रतिष्ठापना
सोमवारी होणारा राम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत होणार असून यावेळी बाहेरून कोणालाही निमंत्रित करण्यात आले नाही. राजभवन कर्मचारी आणि सुरक्षा यंत्रणा सांभाळणारे कर्मचारीच यावेळी हजर असतील, असेही सांगण्यात आले.
श्री गुंडी देवीचे मंदिराचा इतिहास
श्री गुंडीचा खडक आता तिथे नाही, परंतु सध्या त्या ठिकाणी देवीचे एक मंदीर आहे. या देवळाचं नुकतंच सन २०१५ मधे नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. या देवीला आता सकलाई, सागर माता किंवा श्रीगुंडी म्हणून तिचे भक्तगण ओळखत. या देवीची पूजा मुख्यत: कोळी समाज करतो. कोळी समाज हे मुंबईचे आद्य रहिवासी असल्याने ही कोळ्यांची देवता असावी, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. या देवीची वार्षिक जत्रा आषाढी पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमेनंतर लगेचच येणाऱ्या मंगळवारी साजरी होते. (पूर्वीच्या कोळी लोकं आपल्या बोटी सजवून जत्रेच्या दिवशी देवीच्या दर्शनाला येत व त्या दिवशी पहिली पूजा करण्याचा मान कोळी लोकांना होता, असे राजभवनातील जुने लोक सांगतात.)
श्रीरामाचे वाळकेश्वरात वास्तव्य
वाळकेश्वर याचं खरं नाव ‘वालुकेश्वर’ वालुकेश्वर याचा अर्थ समुद्राच्या वाळुपासून तयार केलेले लिंग. (काही लोकांच्या मते वाळकेश्वर येथील पर्वतांवर पूर्वी ऋषी मुनी तपश्चर्या करीत. सीतेच्या शोधार्थ फिरताना प्रभुराम पंचावटी येथून त्यांच्या दर्शनासाठी आले होते.) श्रीराम जेव्हा सीताहरणानंतर लंकेच्या दिशेने तिच्या शोधात निघाले होते, तेव्हा ते काही काळ थांबले होते आणि त्यांनी त्यांच्या रोजच्या पुजेसाठी इथल्या समुद्राच्या वाळूपासून या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली आणि तेव्हापासून हे ठिकाण ‘वालुकेश्वर’या नावाने ओळखलं जाऊ लागलं, अशी कथा सांगितली जाते. असं हे साक्षात प्रभु रामचंद्रांनी स्थापन केलेलं श्री वालुकेश्वराचं लिंग, त्याच्या शेजारचा, भगवान श्री रामचंद्रांनी जमिनीत बाण मारून उत्पन्न केलेलं, अशी श्रद्धा असलेलं बाणगंगा तीर्थ आणि बाणगंगेच्या परिसरात नंतर वसलेली आणखी पांच-पन्नास देवस्थानं, इथून काहीसंच दूर असणारं बाबुलनाथाचं मंदिर, असा हा सर्व तिर्थस्थानांचा परिसर.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community