Sharad Pawar : भाजपच्या बारामती ट्रॅप मध्ये पवार कुटुंबीय अडकले…

मागील तीन दिवसांपासून स्वतः शरद पवार देखील बारामती मध्ये तळ ठोकून आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तर लोकसभा निवडणुका होईपर्यंत मुंबईत पाऊल न ठेवण्याचे सुतवाच केले होते.

277
Sharad Pawar : भाजपच्या बारामती ट्रॅप मध्ये पवार कुटुंबीय अडकले...

लोकसभेचे (Loksabha Election 2024) पडघम वाजण्याआधीच कोणत्याही प्रकारे बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकायचा म्हणजे जिंकायचा असा चंग बांधलेल्या भाजपने टाकलेल्या ट्रॅप मध्ये पवार कुटुंबीय अडकताना दिसत आहेत. म्हणूनच की काय मागील तीन दिवसांपासून स्वतः शरद पवार (Sharad Pawar) देखील बारामती मध्ये तळ ठोकून आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तर लोकसभा निवडणुका होईपर्यंत मुंबईत पाऊल न ठेवण्याचे सुतवाच केले होते. (Sharad Pawar)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्या पासून वेगळे होत वेगळी चूल मांडल्यानंतर बारामती लोकसभा मतदार संघात वेगळी भूमिका घेण्याचे ठरवत मतदारसंघातील वेगवेगळ्या आपल्या समर्थकांना एकत्रित केले होते. परंतु आता अजित पवारांबरोबर गेलेल्या याच पदाधिकाऱ्यांना मागील दोन दिवसांपासून शरद पवार यांनी गळ घालत पद वाटण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे.

गोविंद बागेत अनेक पदाधिकाऱ्यांना निवडीचं पत्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल बारामतीच्या गोविंद बागेत अनेक पदाधिकाऱ्यांना निवडीचं पत्र दिलं. बारामतीत तीन दिवस शरद पवार मुक्कामी होते. या कालावधीमध्ये त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून अजित पवारांसोबत सक्रिय काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर शरद पवार गटाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली.दोन वेळा पुणे जिल्हा परिषदेचे काम पाहिलेले माजी अध्यक्ष सतीशराव खोमणे यांची बारामती तालुका समन्वयक म्हणून शरद पवार गटाकडून निवड करण्यात आली आहे.तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र काटे यांची शरद पवार गटाकडून पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. याच प्रकारे बारामती तालुक्यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना शरद पवार यांनी पदनियुक्तीची पत्रे देखील देण्यात आली आहेत.

(हेही वाचा : Weather Update : थंडीचा मुक्काम अजून वाढला; मुंबई पुण्यासह उत्तर प्रदेशात तापमानात घट)

पारंपारिक विरोधकांना देखील जवळ करण्याचा प्रयत्न…

बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी देखील शरद पवार यांची भेट झाली असून यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या बाजूने ओढण्याचा पवारांचा प्रयत्न सुरू असल्याचे देखील बोलले जात आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे दत्ता भरणे हे मागील २०१४ आणि २०१९ असे दोनदा निवडून आल्याने हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अजित पवारांनी इंदापूरमध्ये आमदार दत्तात्रय भरणेंना बळ देत हर्षवर्धन पाटलांविरोधात दोन टर्म निवडून आणले आहे.

शरद पवार फुटीरांविरोधात फिल्डिंग लावण्यासाठी पाटलांना गळ घालणार? 

आता पाटील आणि पवार दोघेही महायुतीतील घटक पक्षांचे नेते आहेत. दरम्यान, ज्याचा खासदार, आमदार त्याची जागा, या नियमानुसार महायुतीत जागा वाटपाचे प्राथमिक सूत्र ठरले आहे. परिणामी हर्षवर्धन पाटलांना भाजपकडून विधानसभेचे तिकीट मिळण्याबाबत शंका आहे. ही बाब हेरून शरद पवार फुटीरांविरोधात फिल्डिंग लावण्यासाठी पाटलांना गळ घालतील का, अशी चर्चा सुरू झाली आहे.बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार आणि भाजपकडून हर्षवर्धन पाटील यांच्यासह त्यांची कन्या अंकिता पाटील-ठाकरेंच्या नावाची चर्चा आहे. पाटील काँग्रेसमध्ये असताना आघाडी धर्म म्हणून त्यांनी लोकसभेत सुप्रिया सुळेंना सहकार्य केले आहे. आता ते भाजपवाशी झाले आहेत. तसेच अजित पवार दूर गेल्याने सुळेंना यंदाची लोकसभा सोपी असणार नाही, अशी चर्चा आहे. यातच पाटील आणि पवारांमध्ये झालेल्या संवादात बारामती लोकसभेसाठी काय गणित ठरते का, याचीही चर्चा सुरू आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.