ज्या पश्चिम बंगाल निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते, त्याचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी भाजपला जोर का झटका दिला आहे. यामुळे आता ममता दिदींचे सर्वच स्तरांतून कौतुक होत असून, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील दिदींचे अभिनंदन केले आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
ममता बॅनर्जी या ‘बंगाली’ जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावे लागेल. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारे ममता दिदींच्या पराभवासाठी पश्चिम बंगालच्या भूमीवर एकवटली. त्या सर्व शक्तींची धूळधाण उडवत ममता दिदींनी विजय मिळवला. मी त्यांचे व हिंमतबाज पश्चिम बंगाली जनतेचे मनापासून अभिनंदन करतो. आता राजकारण संपले असेल, तर सगळ्यांनी मिळून कोरोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया, असा टोलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.
(हेही वाचाः पंढरपूरात भाजपला ‘समाधान’! राष्ट्रवादीचा टप्प्यात कार्यक्रम कुणी केला?)
राज ठाकरे यांच्याकडूनही कौतुक
पश्चिम बंगाल निवडणुकांमध्ये मिळालेल्या लक्षणीय यशासाठी ममता बॅनर्जींचं अत्यंत मनापासून अभिनंदन. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये कलासक्त वृत्ती आणि सामाजिक सुधारणांमध्ये खूपच समानता आहे. त्यामुळे राज्यांची स्वायत्तता आणि प्रांतिक अस्मिता ह्यांचं महत्त्व तुम्ही नक्कीच समजू शकता. राज्यांच्या स्वायत्ततेसाठीचा आग्रही आवाज तुम्ही बनाल आणि सर्वसमावेशक भूमिका घेत पश्चिम बंगालचा विकास साधाल अशी आशा मी व्यक्त करतो, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.