सोमवारी, २२ जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) अयोध्येला (Ayodhya) राम ललाच्या (Ramlalla) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येला जाणार नाहीत, असे सांगण्यात आले.
शिंदे (CM Eknath Shinde), फडणवीस आणि अजित पवार २२ जानेवारीला अयोध्येला न जाता नंतर संपूर्ण मंत्रिमंडळासह राम मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले. मंत्रिमंडळासह ते राम मंदिर भेट आणि दर्शनाला जाण्याचा दिवस, वेळ अद्याप ठरली नसून लवकरच याबाबत सांगण्यात येईल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर माहिती देताना म्हटले आहे की, “अयोध्येत राम मंदीर उभारणीचे कोट्यवधी भारतीय आणि रामभक्त तसेच हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदीजी यांनी साकार केलं आहे. मोदीजींचे शतशः आभार… अयोध्येमध्ये सोमवारी श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या ऐतिहासिक आणि नेत्रदीपक सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण आहेच. देशवासीयांसाठी अभिमानास्पद अशा या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रीमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्री रामाचं दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत.”