मुंबईत मागील काही दिवसांपासून चार हजारांच्या खाली आलेली रुग्ण संख्या आता आणखी कमी होताना दिसत आहे. रविवारी मुंबईत दिवसभरात चक्क ३ हजार ६७२ रुग्ण आढळून आले. तर ७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
अशी आहे आकडेवारी
रविवार २ मे राजी दिवसभरात एकूण ५ हजार ५४२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर ३ हजार ६७२ नवे रुग्ण आढळून आले. रविवारपर्यंत ५७ हजार ३४२ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू होते. तर रविवारी दिवसभरात केवळ २८ हजार ६३६ एवढ्या चाचण्या करण्यात आल्या. दिवसभरात ७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ४५ रुग्ण हे दीर्घकालीन आजारी होते. मृतांमध्ये ४८ पुरुष व ३१ महिला रुग्णांचा समावेश आहे. यातील ४ रुग्ण हे ४० वयोगटाच्या खालील आहेत, तर ४३ रुग्णांचे वय हे ६० वर्षांवरील आहे. ४० ते ६० वयोगटातील मृतांचा आकडा हा ३२ एवढा आहे. मुंबईत मागील काही दिवसांपूर्वी रुग्ण दुप्पटीचा दर हा ४० दिवसांवर आलेला असताना, रविवारी हा दर १०३ दिवसांवर आला.
(हेही वाचाः राज्य सरकारचा नवीन आदेश… ‘या’ दोन राज्यांतून येणा-या प्रवाशांवर असणार नजर)
रुग्णसंख्या कमी झाल्याने सील करण्यात आलेल्या इमारतींची संख्या ९०३ एवढी झाली आहे, तर कंटेन्मेंट झालेल्या चाळी आणि झोपडपट्ट्यांची संख्याही कमी होऊन १०७ एवढी झाली आहे.
रविवारी झाले एवढे लसीकरण
मुंबईत ४५ वर्षांपुढील व्यक्तींचे लसीकरण बंद असले, तरी मुंबईतील पाच केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण सुरू आहे. पहिल्या दिवशी ९९२ व्यक्तींचे लसीकरण झाले असले, तरी दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी २ हजार ५३१ व्यक्तींचे लसीकरण पार पडले. यामध्ये ६३ जणांनी दुसरा डोस, तर उर्वरित सर्व हे १८ ते ४४ वयोगटातील आहेत. मात्र पुरेसा लससाठा नसल्याने सोमवारी लसीकरण केंद्र बंद राहील, असे महापालिकेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
Join Our WhatsApp Community