मुंबईत मागील काही दिवसांपासून वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे अनेक इमारती सील केल्या जात आहेत. या सील केलेल्या इमारतींमुळे त्या भागाला मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे. मात्र, संपूर्ण मुंबईत अशाप्रकारे मायक्रो कंटेन्मेंट झोन असले, तरी बोरीवली आर-मध्य आणि वांद्रे ते सांताक्रुझ पश्चिम या एच-पश्चिम विभागात एकही मायक्रो कंटेन्मेंट झोन रविवारपर्यंत नव्हता. त्यामुळे या दोन्ही भागातील रहिवाशांसह मुंबईतील नागरिकांसाठीही ही आनंदाची बातमी आहे.
मुंबईतील विभागवार मायक्रो कंटेन्मेंट झोन
- मुंबईमध्ये रविवारपर्यंत ९०३ सील केलेल्या इमारती आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत.
- यातील सर्वाधिक मायक्रो कंटेन्मेंटची संख्या ही विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम, या के-पश्चिम विभागात आहे. या विभागात सर्वाधिक म्हणजे २६५ एवढे मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत.
- त्याखालोखाल मुंबई सेंट्रल,ताडदेव, मलबार हिल या डी-विभागात २३५ एवढे झोन आहेत.
- तिसऱ्या क्रमांकावर कुर्ला एल-विभाग आहे. याठिकाणी ६९ इमारती सील आहेत.
- त्यानंतर चेंबूर एम-पश्चिम आणि भायखळा, माझगाव या ई-विभागांचा समावेश आहे. या दोन्ही विभागांमध्ये अनुक्रमे ६९ व ५८ एवढे मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत.
- भेंडीबाजार, जे. जे. चा परिसर असलेल्या बी-विभागात व घाटकोपर एन- विभागात प्रत्येकी दोन अशाप्रकारे सर्वाधिक कमी मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत.
- महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमधील २२ विभागांमध्ये असे मायक्रो कंटेन्मेंट झोन असून, बोरीवली आणि वांद्रे, खार आणि सांताक्रुझ पश्चिम, या विभागांमध्ये एकही मायक्रो कंटेन्मेंट झोन नाहीत.
- या संपूर्ण ९०३ मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये १ लाख ३१ हजार घरांचा समावेश आहे. तर एकूण लोकसंख्या ही ४ लाख ९८ एवढी आहे.
- आतापर्यंत ६४ हजार ९५४ सील इमारती तथा मायक्रो कंटेन्मेंट झोन हे मुक्त करण्यात आले आहेत.
(हेही वाचाः मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत एप्रिल महिना ठरला ‘विक्रमवीर’! थक्क करणारी आकडेवारी)
९ हजार ५३३ इमारतींचे मजले सील
मुंबईत पाच पेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्यास, ती इमारत सील करण्यात येते किंवा तो भाग मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येतो. पण काही इमारतींमध्ये एखाद दुसरा रुग्ण आढळल्यास मजला सील करण्यात येत आहेत. अशाप्रकारे एकूण ९ हजार ५३३ इमारतींचे मजले सील करण्यात आले आहेत. त्यामध्ये एकूण ३ लाख ८१ हजार एवढी घरे असून, एकूण लोकसंख्या ही १३ लाख ५३ हजार एवढी आहे.
(हेही वाचाः ग्रामीण भागात कोरोनाचे थैमान… वाढतोय मृतांचा आकडा)
सर्वाधिक इमारतींचे मजले हे गोरेगाव पी-दक्षिण विभागात सील करण्यात आले आहेत. या विभागात एकूण १ हजार ९२७ इमारतींचे मजले सील करण्यात आले आहेत. तर त्याखालोखाल कांदिवली आर-दक्षिण विभागात १ हजार ७३४, मुलुंड टी-विभागात १ हजार ४४९, विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम या के-पश्चिम विभागात १ हजार ३०४ इमारतींचे मजले सील करण्यात आले आहेत. तसेच मायक्रो कंटेन्मेंट झोनमुक्त असलेल्या एच-पश्चिम विभाग व आर-मध्य विभागात अनुक्रमे १६ आणि ७८ इमारतींचे मजले सील करण्यात आले आहेत.