आता राज्यात पुनावालांमुळे राजकारण…

गरज पडल्यास पुनावाला यांना राज्य सरकार व काँग्रेस सुरक्षा पुरवेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

133

कोविशिल्ड लसीच्या मागणीसाठी भारतातील बडे नेते आणि काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून गंभीर स्वरुपाचे फोन कॉल्स येत असल्याचा दावा, सिरमचे सर्वेसर्वा अदर पुनावाला यांनी केला. त्यानंतर आता राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. अदर पुनावाला यांना धमकावण्यात आल्याचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. पुनावाला यांनी स्वतःच लंडनमध्ये एका मुलाखतीत महत्वाच्या राजकीय व्यक्तीने धमकावल्याची माहिती दिली असून, त्यांना धमकी देणारा राजकीय व्यक्ती कोण आहे, याचा खुलासा पुनावाला यांनी करावा. पुनावाला यांनी देशहितासाठी लंडनमधून लवकरात लवकर भारतात येऊन लसींचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करावे आणि भारताची लसींची गरज भागवावी. गरज पडल्यास पुनावाला यांना राज्य सरकार व काँग्रेस सुरक्षा पुरवेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

केंद्राने न मागताच का सुरक्षा दिली

अदर पुनावाला यांनी राज्य वा केंद्र सरकारकडे सुरक्षा मागितलेली नसताना, केंद्र सरकारने त्यांना व्हाय दर्जाची सुरक्षा पुरवलेली आहे. एखाद्या व्यक्तीला सुरक्षा पुरवायची असेल, तर त्यांच्या जीवाला धोका आहे हे तपासून आणि संबंधित व्यक्तीने अर्ज केल्यानंतर त्यांना सुरक्षा पुरवली जाते. पण केंद्र सरकारने न मागताच पुनावाला यांना सुरक्षा दिली, यामागे काय राजकारण आहे? पुनावाला यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी सुरक्षा पुरवली आहे काय? याचा खुलासा पुनावाला व केंद्र सरकारने करावा, असे देखील नाना पटोले म्हणाले.

(हेही वाचाः लस रुसली आणि अन् आता खुदकन हसली!)

लसींमध्येही कमिशन हवे?

कोरोनावर मात करायची असेल तर सद्यस्थितीत लसीकरण हाच पर्याय आहे आणि जगभरातून तोच पर्याय वापरला जात आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांनीही वारंवार देशभर लसीकरणाची व्यापक मोहीम राबविली जावी, हीच भूमिका मांडली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही लसीकरणाचे महत्व ओळखून मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यासंदर्भात केंद्र सरकारला सूचना करुन, काँग्रेसच्या भूमिकेला एकप्रकारे दुजोराच दिलेला आहे. लसीकरण न झाल्याने कोरोना मृत्यू वाढत आहेत. पण केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे तसेच नियोजनशून्य कारभारामुळे, लसीकरण करण्यात अडचणी येत आहेत. लसींच्या किंमतीही समान असायला हव्या होत्या, पण एकाच लसीच्या तीन वेगवेगळ्या किंमती कशा काय, हे एक मोठे गुपित आहे, यात कमीशनचा मुद्दा तर नाही ना, अशी शंका घेण्यास जागा असल्याचे देखील नाना यावेळी म्हणाले.

नवाब मलिक यांचीही पुनावालांवर टीका

केंद्राला १५० रुपये, राज्याला आधी ४०० आणि नंतर ३०० रुपये, तर खाजगी हॉस्पिटलसाठी ७०० रुपये लस देण्याचे पुनावाला यांनी जाहीर केले. हा सगळा संशय निर्माण करणारा विषय असून, याला पुनावाला स्वतः जबाबदार आहेत. त्यांना कोणीही बदनाम करत नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे. सुरुवातीला राज्याला ४०० रुपयांनी लस देणार असल्याचे सांगितले, मग त्यांनी ३०० रुपये भाव स्वतः जाहीर केला. हे सगळं संशय निर्माण करणारे विषय आहेत. ज्या पध्दतीने ४०० रुपये किंमत ठरवतात आणि नंतर ट्वीट करुन ३०० रुपयाला द्यायला तयार आहेत असे सांगितल्याने, हा जो संशय निर्माण होतोय त्यामुळे देशातील जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.