उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सोमवारी, २२ जानेवारी रोजी नाशिकच्या काळाराम मंदिरात गेले होते. तेव्हा त्यांनी भगवा कुर्ता घातला होता, तसेच गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातल्या होत्या. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे त्यांच्यावर टीका केली. केवळ वडिलांसारखी वस्त्रे घालून वारसा सांगता येत नाही. वडिलांसारखे नेतृत्व, कर्तृत्व, विचारधारा जपायची असते नव्हे तर ती अधिक पुढे न्यायची असते. मध्येच यू टर्न घेतला नसता तर अयोध्येत दर्शन घेण्यापासून तोंड लपवण्याची वेळ आली नसती, असे राणे म्हणाले.
(हेही वाचा Ayodhya Shri Ram Mandir : अयोध्या – आधुनिक भारताचा चैतन्य स्रोत)
संजय राऊत शूर्पणखा
नितेश राणे यांनी यावेळी संजय राऊत यांच्या नाशिक येथील भाषणाचाही समाचार घेतला. ज्यांनी प्रभू रामचंद्रांचा अवमान करून हिंदुत्ववादी भूमिका गुंडाळून ठेवली ते आज राम कोण? आणि रावण कोण? हे सांगत आहेत. संजय राऊत यांची भूमिका तर रामायणातील कपटी शूर्पणखेसारखी राहिली आहे. संजय राऊत यांनी यापूर्वीही अनेकवेळा नाक कापून घेतले पण शूर्पणखेप्रमाणे त्यांचा अहंकार काही संपला नाही. आजही नाशिकमध्ये बोलताना संजय राऊत यांनी अहंकाराची भाषा केली. पण राऊतांनी हे लक्षात ठेवावे शूर्पणखेचे नाक लक्ष्मणाने कापले होते. येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमच्या अहंकाराचे नाक कापल्याशिवाय राहणार नाही.
Join Our WhatsApp Community