नंदुरबारनंतर पालघर, नागपूरसाठी रेल्वे आली धावून!

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे, त्यासाठी रेल्वे प्रशासनाने राज्यात जिल्ह्यांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. 

134

वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे खाटांच्या अभावी रुग्णांवर उपचार करता येत नाही, म्हणून रेल्वे प्रशासन राज्याच्या मदतीला धावून आले आहे. मागच्या २ आठवड्यांपूर्वी मध्य रेल्वेने १६ डब्यांची ट्रेन कोविड विलगीकरण कक्षात रूपांतर करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात पाठवली होती, आता रेल्वेने पालघर आणि नागपूर या जिल्ह्यासाठी अशी ट्रेन पाठवली आहे.

रेल्वेने २ हजार रुग्णांची सोय करण्याची विनंती!

पालघर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ३ वर २१ डबे विलगीकरण कक्षात रूपांतर केलेली ट्रेन उभी करण्यात आली आहे, अजून हे काम सुरु असून ५ मे पासून ही ट्रेन कोविड विलगीकरण कक्ष म्हणून वापरात येऊ शकते पालघर जिल्हा प्रशासनाने रेल्वेला तशी विनंती केली होती, त्या विनंतीवरून रेल्वेने तात्काळ मदत केली. पालघर हा जिल्हा नव्यानेच आदिवासी जिल्हा म्हणून स्थापन करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात १७ हजार ५०० कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. रुग्णालयांतील सर्व खाटा भरल्या आहेत. त्यामुळे रेल्वेने किमान २ हजार रुग्णांची सोय करावी, त्यातील डहाणू, बोईसर, पालघर आणि वसई या तालुक्यातील प्रत्येकी ५०० रुग्णांची सोय होईल, असे पालघर जिल्ह्या प्रशासनाच्या पत्रात म्हटले आहे. त्याला प्रतिसाद म्हणून रेल्वे प्रशासनाने पालघर रेल्वे स्थानकाची पाहणी करून २१ डब्यांची रेल्वे पालघरला पाठवली असून सध्या ती फलाट क्रमांक ३ वर उभी करण्यात आली आहे. ही ट्रेन पालघर जिल्हा प्रशासनाला हस्तांतरित करण्यात आली असून प्रशासन या डब्यांचे कोविड विलगीकरण कक्षात रूपांतरित करण्याचे काम करत आहे, यासाठी रेल्वे प्रशासन वीज, पाण्याची सुविधा दिली आहे.

New Project 6 1

नागपूरसाठीची रेल्वे तयार! 

नागपूर जिल्ह्यातील अजनी रेल्वे स्थानकात ११ डब्यांची रेल्वे आता कोविड विलगीकरण कक्ष म्हणून तयार करण्यात आली आहे. त्यासाठी वैद्यकीय कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहेत. रविवार, २ मे रोजी ही रेल्वे नागपूर महापालिकेला हस्तांतरित करण्यात आली. यामध्ये एक अतिरिक्त डबा देण्यात आला आहे, त्यामध्ये वैद्यकीय साहित्य साठा ठेवणे आणि कपडे बदलण्यासाठी वापर करण्यात येईल. प्रत्येक डब्यात १६ रुग्णांची सोय होणार आहे. प्रत्येक डब्यात २ ऑक्सिजन बेड आहेत. या भागात कडाक्याचा उन्हाळा आहे, त्यामुळे डब्यांच्या खिडकीकडे नैसर्गिक गारवा निर्माण करणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.